ITR 2 And ITR 3 Filing Forms Delay: जुलै महिना सुरू आहे आणि दरवर्षी याच कालावधीत, करदात्यांना त्यांचे आयकर रिटर्न किंवा आयटीआर दाखल करण्यासाठी लागणारी कागदपत्रे गोळा करण्यासाठी धावपळ करावी लागते. पण आयटीआर-२ किंवा आयटीआर-३ दाखल करण्यासाठी आयकर विभागाकडून अद्याप फॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. याचबरोबर आयकर विभागाने याबाबत अद्याप ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.

पण करदात्यांनी काळजी करण्याचे फारसे कारण नाही, कारण या वर्षी आयकर विभागाने आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलैवरून १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे.

तज्ज्ञांच्या मते, आयकर रिटर्न फॉर्ममध्ये मोठ्या प्रमाणात झालेले बदल आणि आयटीआर-२ व आयटीआर-३ ची गुंतागुंत यामुळे आयकर विभागाकडून ते फॉर्म अद्याप उपलब्ध करून देण्यात विलंब झाला असावा.

टॅक्स, ईवाय इंडियाचे सोनू अय्यर यांच्या मते, “हे फॉर्म सोप्या आयटीआर-१ आणि आयटीआर-४ फॉर्मपेक्षा अधिक तपशीलवार आहेत. त्यामुळे आयटीआर-२ आणि आयटीआर-३ च्या ई-फायलिंगसाठी फॉर्म जारी करण्यात विलंब झाला असल्याची शक्यता आहे.”

आयटीआर-२ कोणाला भरावा लागतो?

आयटीआर-२ वैयक्तिक आणि अविभाजित हिंदू कुटुंबांतील करदात्यांसाठी आहे. हा फॉर्म अशा व्यक्ती आणि हिंदू अविभाजित कुटुंबांना भरावा लागतो, ज्यांना पगार/पेन्शन, अनेक निवासी मालमत्तेतून मिळणारे भाडे आणि परदेशातील उत्पन्न मिळते किंवा परदेशात मालमत्ता असते.

आयटीआर-३ कोणाला भरावा लागतो?

स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती, स्वतंत्र कंत्राटदार आणि फर्म भागीदारांसाठी आयटीआर-३ लागू आहे.

खालील माध्यमातून उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्ती किंवा हिंदू अविभाजित कुटुंबांना आयटीआर-३ अनिवार्य आहे:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • मालकी हक्क उपक्रम किंवा व्यावसायातून मिळणारे उत्पन्न
  • भागीदारी उत्पन्न (मर्यादित दायित्व भागीदारी वगळता)
  • भांडवली नफा उत्पन्न
  • सूचीबद्ध नसलेल्या इक्विटी शेअर्सची मालकी
  • डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगमधून मिळणारा नफा किंवा तोटा

जेव्हा एखादा करदाता आयटीआर-१, आयटीआर-२ किंवा आयटीआर-४ साठी अपात्र ठरतो, तेव्हा त्याला आयटीआर-३ दाखल करावा लागतो.