जेपी मॉर्गन चेज अँड कंपनीचे विशेष कार्यकारी अधिकारी (CEO) जेमी डिमॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात अविश्वसनीय पद्धतीने काम केले असल्याचे सांगितले. तसेच पंतप्रधान मोदी सर्व आव्हानांचा खंबीरपणे सामना करत आहेत. अमेरिकेतही पंतप्रधान मोदींसारख्या नेत्याची गरज आहे, असेही जेमी डिमॉन म्हणाले.
इकॉनॉमिक क्लब ऑफ न्यूयॉर्क द्वारे आयोजित कार्यक्रमात बोलत असताना जेमी डिमॉन यांनी पंतप्रधान मोदींनी आखलेल्या धोरणांचे कौतुक केले. मोदींनी ४० कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले. तसेच पंतप्रधान मोदी यांनी ७० कोटी लोकांचे बँक खाते तयार करून त्यांच्या खात्यात थेट लाभ वितरीत केल्याबद्दलही त्यांनी गौरवोद्गार काढले.
“देशात नवीन पुतिन…”, शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका; म्हणाले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशासकीय अडथळे दूर केल्याचेही डिमॉन यांनी सांगितले. ते म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे भारतात २९ किंवा त्याहून अधिक राज्ये आहेत. युरोपएवढे मोठे राष्ट्र असताना वेगवेगळ्या कर रचनेमुळे भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात होते. पंतप्रधान मोदींनी हा भ्रष्टाचार मोडीत काढला. आपल्याकडेही अशा नेतृत्वाची गरज आहे, असेही ते म्हणाले.
डिमॉन पुढे म्हणाले की, आपल्याकडे माध्यमांना स्वातंत्र आहे, हे मी जाणतो. आपल्याकडील माध्यमे त्यांच्यावर टीकेची झोड उठवत असतात. पण मोदींनी नोकरशाहीमध्ये जी सुधारणा आणली त्यासाठी त्यांची प्रशंसा केली पाहीजे. मला वाटतं अमेरिकेलाही याची थोडी गरज आहे.
देशात लोकसभेच्या निवडणुका होत असताना डिमॉन यांचे विधान समोर आले आहे. दुसऱ्या टप्प्याचे मतदान २६ एप्रिल रोजी होत आहे. तर शवेटच्या टप्प्याचे मतदान १ जून रोजी संपन्न होईल. त्यानंतर ४ जून रोजी निवडणुकांचा निकाल लागेल.