JPMorgan Chase CEO Jamie Dimon Against Work From Home: जेपी मॉर्गन चेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी डायमन, गोल्डमन सॅक्सचे डेव्हिड सोलोमन आणि ब्लॅकरॉकचे लॅरी फिंक यांच्यासोबत एका कार्यक्रमात बोलत होते, तेव्हा त्यांनी वर्क फ्रॉम होमला विरोध आणि वर्क फ्रॉम ऑफिसला ते का महत्त्व देतात याबाबत आपली भूमिका पुन्हा मांडली.
“मी झूमची खिल्ली उडवत नाही, पण वर्क फ्रॉम होममुळे तरुण मागे पडत आहेत. मार्गदर्शन, सेल्स प्रशिक्षण आणि एरर मॅनेजमेंट हे व्यावसायिक शिक्षण प्रक्रियेचे भाग आहेत आणि वर्क फ्रॉम होममुळे तरुणांना हे शिकायला मिळत नाही”, असे जेपी मॉर्गनचे मुख्य कार्यकारी जेमी डायमन यांनी फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्हमध्ये म्हटले.
जेमी डायमन पुढे म्हणाले की, “जर तुम्ही तुमच्या कारकिर्दीकडे मागे वळून पाहिले तर लक्षात येईल की तुम्हाला अप्रेंटिस सिस्टीममधून काहीतरी शिकायला मिळाले आहे. जेव्हा तुम्ही तरुण होता, तेव्हा तुमच्या वरिष्ठाने तुम्हाला सेल्स कॉलवर नेले असेल, तेव्हा त्याने तुम्हाला चुका कशा हाताळायच्या किंवा इतर गोष्टी कशा करायच्या हे सांगितले असेल. पण तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असता, तेव्हा झूम कॉलवर तुम्हाला अशा गोष्टी शिकायला मिळत नाहीत.”
गेल्या काही वर्षांपासून जेपी मॉर्गन चेसमध्ये हायब्रिड वर्क मॉडेल (काही दिवस वर्क फ्रॉम होम, काही दिवस वर्क फ्रॉम ऑफिस) अस्तित्वात होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम ऑफिस बंधनकारक केले. त्यानंतर कंपनीच्या २००० कर्मचाऱ्यांनी हायब्रिड वर्क मॉडेलची मागणी करण्यासाठी पत्र लिहिले. यानंतर काही दिवसांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी डायमन यांनी हे वक्तव्य केले.
जानेवारीमध्ये २००० कर्मचाऱ्यांनी हायब्रिड वर्क मॉडेलसाठी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, या निर्णयामुळे “कर्मचारी, ग्राहक, भागधारक आणि कंपनीची प्रतिष्ठा” खराब होईल.
या वर्षी फेब्रुवारीमध्ये जेमी डायमन यांनी हे पत्र फेटाळून लावले आणि म्हटले, “किती कर्मचाऱ्यांनी पत्रावर स्वाक्षरी केली आहे याची मला पर्वा नाही आणि ज्यांना वर्क फ्रॉम ऑफिस नको आहे ते दुसरी नोकरी शोधू शकतात.”
कोण आहेत जेमी डायमन?
जेमी डायमन हे जेपी मॉर्गन चेसचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ते २००४ मध्ये अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कंपनीत रुजू झाले. त्यांनी गेल्या काही वर्षांत त्यांच्या कारकिर्दीत मोठी प्रगती केली आहे. जेपी मॉर्गन चेसमध्ये येण्यापूर्वी, जेमी डायमन यांनी बँक वनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून चार वर्षांहून अधिक काळ काम केले आहे.
