गेल्या आठवड्यात भारतीय चलन, नोटा व नाणी याविषयी रंजक माहिती जाणून घेतली, तशाच रंजक कथा, गोष्टी आणि माहिती जगातील इतर देशांच्या चलनांच्या बाबतीतदेखील आहे. आपण महात्मा गांधी यांचे छायाचित्र आपल्या चलनी नोटेवर छापतो, तसेच जगातील बरेचसे देश त्यांच्या देशातील महापुरुषांचे किंवा महत्त्वाच्या व्यक्तीचे छायाचित्र चलनावर छापतात. मागील वर्षी दिवंगत झालेल्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे छायाचित्र बहामा, कॅनडा, पूर्वीय कॅरेबियन, जिब्राल्टर, गुआरानी, जर्सी, न्यूझीलंड, इंग्लंड, स्कॉटलंड अशा तब्बल ९ देशांच्या नोटांवर आहे. जसे भारतीय चलनाला आपण रुपया म्हणतो तसे सुमारे १४ देशांच्या चलनाला ‘डॉलर’ असे म्हटले जाते तर सुमारे ६ देशांच्या चलनाला पाउंड असे म्हटले जाते. रुपयादेखील यात मागे नाही. भारताव्यतिरिक्त श्रीलंका, पाकिस्तान, मॉरिशस आणि इंडोनिशिया या देशांमधील चलनाला रुपया म्हणूनच ओळखले जाते.                       

नोटांवर किंवा नाण्यांवर फोटो येण्याचे भाग्य मुख्येत्वेकरून त्या-त्या देशाच्या मोठ्या नेत्यालाच लाभले आहे, पण तरीही काही देशांमधील इतर कर्तृत्ववान लोकांनाही ते मिळाले आहे. क्रिकेटर सर फ्रॅंक वॉरेल हे बार्बाडोसच्या, बेन रायेन रग्बीचे प्रशिक्षक फिजीच्या, ग्रँडमास्टर आणि बुद्धिबळ विश्वविजेता पेट्रोसिअन अर्मेनियाच्या नोटांवर आहेत. जॉर्जियाच्या नोटांवर तर बरेचसे कलाकार, इंग्लंड अँड वेल्स आणि स्कॉटलंडच्या नोटेवर अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांचे छायाचित्र आहे. उत्तरी आयर्लंडमध्ये एअर कंडिशनर विकसित करणारे सर सॅम्युअल डेव्हिडसन, न्यूझीलंडच्या नोटांवर सर एडमंड हिलरी ज्यांनी सगळ्यात पहिले माऊंट एव्हरेस्ट सर केले, युरोपातील कित्येक देशांमध्ये संगीतकार, वाद्य वाजवणारे, चित्रपटाशी संबंधित व्यक्ती किंवा कवी आणि लेखक यांना स्थान मिळाले आहे. काही देशांमध्ये तर सध्याच्या शासकांचे किंवा राजांचे छायाचित्र त्यांच्या नोटांवर आहेत.

जे भाग्य माणसांना नोटेवर असण्याचे आहे, तसेच भाग्य प्राणी आणि पक्ष्यांनादेखील लाभले आहे. जगात सगळ्यात जास्ती नोटांवर येण्याचे भाग्य गरुड पक्षाला आहे. किंगफिशर, कबुतर, मोर आणि चक्क पोपटालाही नोटांवर स्थान आहे. प्राण्यांमध्ये कुत्रे, उंट, वाघ, सिंह व सापदेखील आपापली जागा राखून आहेत. विशेष म्हणजे ट्युनिशियाच्या जुन्या नोटेवर चक्क गाढवालाही जागा आहे. आपल्या देशातील नोटा आपण निरखून बघितल्या तरी कित्येक प्राणी आपल्याला आढळतील. विशेषतः ज्या देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे, त्यांनी आपल्या देशातील वन्य जीवांना नोटांवर स्थान दिले आहे. भारतासहित कित्येक देश एखाद्या व्यक्तीच्या किंवा घटनेच्या स्मरणार्थ नोटा आणि नाणीदेखील जारी करत असतात. मात्र ते मर्यादित स्वरूपात छापले जात असल्याने फारसे चलनात येत नाही. म्हणून अशी नाणी किंवा नोटा दुर्मीळ असल्याने त्याच्या मूल्यापेक्षा अधिक किमतीने त्या विकल्या जातात. बऱ्याचदा दुर्मीळ नाणी आणि नोटा यांच्या खरेदीसाठी बोली लावली जाते.