लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : विक्रमी भाव तेजीसह मुंबईच्या सराफा बाजारात २४ कॅरेट शुद्धतेचे सोने बुधवारी प्रति १० ग्रॅम ७०,००० रुपयांच्या अभूतपूर्व पातळीवर गेले. सोन्याचे किरकोळ दर आता करांसह १० ग्रॅमसाठी ७०,७०० रुपयांवर गेले असून, खरेदीदारांची मागणी आणि पसंती पाहता, पाडव्याआधीच सोने ७२ हजारांपुढची पातळी गाठेल, असा जाणकारांचा होरा आहे.

Sanjay Nirupam
मोठी बातमी! काँग्रेस पक्षातून संजय निरुपम यांची हकालपट्टी, पक्षविरोधी वक्तव्यं केल्याने कारवाई
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
pm narendra modi interview marathi (1)
Video: तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत नरेंद्र मोदींना थेट प्रश्न; उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले…
raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”

जागतिक भू-राजकीय घडामोडी, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची व्याजदर कपातीचे संकेत आदींमुळे जागतिक पातळीवर सोने उच्चाकी पातळीवर पोहोचले आहे आणि त्याचे पडसाद भारतातही किमतीत उमटले आहे. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याने नवा उच्चांक स्थापित करत ७० हजार रुपयांच्या पातळीजवळ पोहोचले आहे. मुंबईच्या सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचे घाऊक दर बुधवारी तोळ्यासाठी (१० ग्रॅम) ६९,८७० रुपयांवर गेले. मंगळवारच्या तुलनेत त्यात ७६० रुपयांची वाढ झाली. ९९.५ टक्के शुद्धतेच्या स्टँडर्ड सोन्याचा बुधवारी झव्हेरी बाजारात घाऊक दर ६९,०९० रुपयांवर स्थिरावला.

सोन्यात आलेल्या तेजीबाबत बोलताना पीएनजी सन्सचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कमोडिटी तज्ज्ञ अमित मोडक म्हणाले, ‘सकाळी ऑस्ट्रेलिया- हाँगकाँग मार्केट उघडताना तेथील बाजारात मार्जिन कॉलमुळे सोने प्रति औंस (३१.१० ग्रॅम) २,२३४ डॉलर पातळीपासून २,२७८ डॉलरपर्यंत पोहोचले. सोन्यात प्रामुख्याने २,२३४ ते २,२६५ डॉलर पर्यंत तेजी आली. तसेच, डॉलरच्या तुलनेत रुपया दहा पैशांनी कमकुवत झाला. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून सोन्यात तेजीचे वातावरण निर्माण झाले. जागतिक पातळीवर सध्या वायदे बाजार हा तेजीवाल्यांच्या ताब्यात गेल्याने ही नजीकच्या काळात ही तेजी ओसरण्याची चिन्हे नाहीत. या आठवड्यात अमेरिकी बाजारात विविध आर्थिक आकडेवारी जाहीर होणार असून त्याचाही परिणाम सोन्याच्या भावावर पडू शकतो.’

हेही वाचा >>>बाजारातली माणसं- जिद्दी, हरहुन्नरी

गेल्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस भारतात सोने प्रति दहा ग्रॅम ६१ हजार रुपयांच्या पातळी जवळ होते. त्यानंतर सोन्यात वर्षभरात प्रतिकूल बनलेल्या जागतिक भू-राजकीय परिस्थितीमुळे विविध काळात परिणाम झाले. त्यामुळे सोने आर्थिक वर्षाच्या अखेरीस ६६ हजार रुपयांच्या पातळीच्या पुढे गेले होते. जागतिक पातळीवर सोन्यावर असणारा विश्वास सातत्याने वाढत असून, मध्यवर्ती बँकांकडूनही मोठ्या प्रमाणात सुरू असलेली खरेदी ही सोन्यातील तेजीला इंधन पुरवत असल्याचे दिसत आहे.

मार्च महिना सर्वोत्तम किंमत लकाकीचा!

मुंबईच्या सराफ बाजारात १० दिवसांपूर्वी शुद्ध सोन्याचे घाऊक दर ६८,०५० रुपये प्रति १० ग्रॅम होते. या दिवसांत त्यात जवळपास दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. सरलेल्या १ मार्चला ६३,१६० रुपयांवर असलेले सोन्याचे घाऊक दर २९ मार्चपर्यंत ६८,७३० रुपयांवर म्हणजेच तब्बल ५,५७० रुपयांनी कडाडले आहेत. महिनाभराच्या काळात सोन्याने दाखवलेली ही अलिकडच्या काळातील सर्वोत्तम किंमत लकाकी आहे.

जागतिक पातळीवर सध्या वायदे बाजार हा तेजीवाल्यांच्या ताब्यात गेल्याने ही नजीकच्या काळात ही तेजी ओसरण्याची चिन्हे नाहीत. या आठवड्यात अमेरिकी बाजारात विविध आर्थिक आकडेवारी जाहीर होणार असून त्याचाही परिणाम सोन्याच्या भावावर पडू शकतो. जूनमध्ये अमेरिकेत व्याजदर कपातीनंतर सोने अस्मान गाठताना दिसल्यास नवल ठरू नये.- अमित मोडक, मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएनजी सन्स

सामान्यत: जेव्हा अमेरिकेत फेडकडून व्याजदर कपात होते तेव्हा सोन्याच्या किमती वाढतात. जगभरात व देशात सोन्याची मागणी इतकी मजबूत आहे की, किमती वाढूनही, ग्राहक विक्रीसाठी सरसावलेले दिसत नाही. उलट नवीन ग्राहक बाजारात प्रवेश करत आहेत. सोने ही मूलभूतपणे एक मजबूत आणि विश्वासार्ह मालमत्ता आहे आणि एखाद्याने दीर्घकालीन गुंतवणूक करत राहणे आवश्यक आहे. तथापि सद्यःस्थितीत ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी, असेच मी सुचवेन.- डॉ. सौरभ गाडगीळ, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स