भारतीय चलनी नोटा आणि नाणी यासंबंधित कित्येक गोष्टी आपल्याला माहीत नाहीत. सध्या २०१६ मध्ये करण्यात आलेले ‘निश्चलनीकरण’ आणि त्याव्यतिरिक्त फार कमी गोष्टी आपल्याला माहीत आहेत. अर्थात भारतातील हे काही पहिले ‘निश्चलनीकरण’ नव्हते. याआधीदेखील जनता सरकारने १९७८ मध्ये १,०००, ५,००० आणि १०,००० रुपयांच्या चलनी नोटांवर बंदी घातली होती. म्हणजेच भारतातदेखील १९७८ मध्ये एवढ्या प्रचंड मूल्याच्या नोटा चलनात होत्या. आजदेखील रिझर्व्ह बँकेला १०,००० रुपयांपर्यंतच्या नोटा छापण्याची कायद्याने परवानगी आहे.

भारतात सुरुवातीच्या काळातील बँक ऑफ हिंदोस्तान किंवा बँक ऑफ बंगाल यांनी काही नोटा छापल्या होत्या. मात्र ईस्ट इंडिया कंपनीने काही त्याला मान्यता दिली नाही आणि या नोटा नंतर फारशा चलनात राहिल्या नाहीत. तसेच नंतर दोन्ही बँकादेखील दिवाळखोरीत निघाल्यामुळे त्यांनी चलनात आणलेल्या नोटांना काहीच अर्थ राहिला नाही. ब्रिटिशांनी १८६१ मध्ये पेपर करन्सी कायदा, १८६१ आणला आणि मग सरकारने राणी व्हिक्टोरिया हिच्या नावाने नोटा छापायला सुरुवात केली. त्यानंतर १९३६ साली रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आणि मग हे काम त्यांनी हातात घेतले ते आजतागायत सुरू आहे. १९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा तर सुरुवातीला पाकिस्तानात भारतीय नोटांवर चक्क ‘पाकिस्तान सरकार’ असा स्टॅम्प लावून अर्थव्यवस्था चालवायचे. नंतर एक वर्षाने पाकिस्तानने स्वतःचे चलन छापण्यास सुरुवात केली.

हेही वाचा – बाजारातील माणसं : चार्ल्स हेन्री डाऊ : निर्देशांकाचा जन्मदाता

भारतीय चलनाचे वैशिष्ट्य म्हणजे महात्मा गांधीजींचा फोटो. हा फोटो तुम्ही नीट निरखून पाहिलात तर लक्षात येईल की, जुन्या नोटांमध्ये तो उजवीकडे बघत असणारा असतो तर नवीन नोटांमध्ये तो डावीकडे बघणारा असतो. मला खात्री आहे, नक्कीच तुम्ही जुनी आणि नवीन नोट काढून बघितलीच असेल. हा फोटो लॉर्ड पेट्रिक लॉरेन्स यांच्या बरोबरच्या फोटोच्या मूळ प्रतीवरून घेतला आहे. जुन्या नोटांवर हा फोटो मूळ फोटोचे प्रतिबिंब म्हणून वापरला जातो तर सध्याच्या सर्व नोटांवर तो मूळ फोटो वापरला जातो.

हेही वाचा – पोर्टफोलियोसाठी शेअर्स निवडताना : कंपनीवरील कर्जभार दखलपात्रच !

पाणिनी राजवंशांत चांदीच्या नाण्याला रुप्य म्हणून संबोधायचे. त्याचेच पुढे रुपया असे नामकरण झाले. भारताने आपल्या रुपयाची वेगळी ओळख बनवली जेव्हा रुपयाचे चिन्ह जारी केले. हे चिन्ह देवनागरी लिपीतील ‘र’ आणि इंग्रजी मधील R यांचे मिश्रण आहे. यामध्ये र वर असणारी शिरोरेखा हे त्याचे वैशिष्ट्य. २०१० पर्यंत भारतीय रुपिया किंवा रुपयाला स्वतःचे असे चिन्ह नव्हते पण नंतर आंतरराष्ट्रीय समूहाने हे चिन्ह मान्य करून त्याचा वेगळा संगणकीय फॉन्ट बनवला. हे चिन्ह बनवण्याचे श्रेय उदय कुमार यांना जाते, ज्यांनी सरकारच्या खुल्या स्पर्धेतून ते देशाला दिले. भारतीय चलन नोटा आणि नाणी याविषयी पुढील भागात आणखी माहिती घेऊया.