-आशिष थत्ते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरदार वल्लभ भाई पटेल यांना भारताचे लोह पुरुष म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे टी. टी. कृष्णमचारी यांची पोलाद पुरुष म्हणून ओळख आहे. कारण भारताच्या पोलाद म्हणजे स्टील उद्योगाला सक्षम करण्याचे कार्य त्यांनी केले. तत्कालीन अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर भारताचे अर्थमंत्री तिरुवेल्लोर थत्ताई कृष्णमचारी अर्थात टी. टी. कृष्णमचारी यांची नेमणूक झाली. त्यांनी पहिल्यांदा १९५६ ते १९५८ आणि नंतर १९६४ ते १९६६ अशी दोन वेळा अर्थमंत्रीपदाची धुरा सांभाळली.

वर्ष १९६२ मध्ये ते मंत्री झाले तेव्हा बरेच दिवस त्यांच्याकडे कोणत्याही खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली नव्हती. मात्र नंतर त्यांच्याकडे अर्थ आणि संरक्षण अशा महत्त्वाच्या खात्यांच्या समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली. पुढे वर्ष १९६६ मध्ये ते पुन्हा अर्थमंत्री झाले. आपल्या प्रत्येक अर्थसंकल्पात त्यांनी पोलाद उद्योगाला चालना दिली. उद्योग मंत्रालयाची देखील जेव्हा जबाबदारी त्यांच्यावर आली, तेव्हा पोलाद उद्योगाच्या अनुकूल धोरणे आणि सुलभ अर्थपुरवठा करण्यास त्यांनी प्राधान्य दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान निर्मितीसाठी असलेल्या मसुदा समितीमध्ये ते सहभागी होते. पहिल्यांदा ते मद्रास विधानसभेवर स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडून गेले नंतर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले.

आणखी वाचा-शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ

राजकारणात येण्याआधी त्यांची एक यशस्वी उद्योगपती म्हणून ओळख होती. त्यांनी स्थापन केलेली कंपनी अजूनही कार्यरत आहे. जर कधी प्रसिद्ध ‘ग्राईप वॉटर’ची जाहिरात बघितली तर ती टीटीके कंपनीची असते, जिची स्थापना कृष्णमचारी यांनी केली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, परदेशातील कित्येक नवीन वस्तूंची खरेदी-विक्री आणि उत्पादन त्यांनी सुरू केले.

आणखी वाचा-सुभाष चंद्र गर्ग – पुस्तक वादंग

कृष्णमचारी यांच्या कारकीर्दीत त्यांनी देशात तीन मोठे पोलाद उद्योग उभारले. तसेच आयडीबीआय, यूटीआय आणि आयसीआयसीआय या विकास बँका स्थापन करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. टीटीके यांनी निवृत्तिवेतन योजनेत मृत सरकारी कर्मचाऱ्यांच्या वारसाला सामील करून घेणारी योजना सादर केली. त्यांनी अर्थमंत्री असताना मोठ्या कर सुधारणा केल्या, ज्या त्या काळात अतिशय नवीन होत्या. राजस्थान कालवा योजना, दंडकारण्य आणि दामोदर व्हॅली योजना देखील त्यांच्याच प्रेरणेतून साकारल्या गेल्या. त्यांना संगीताची खूप आवड होती. मद्रासमधील प्रसिद्ध संगीत अकादमीचे संस्थापक सदस्य आहेत. २६ नोव्हेंबर १८९९ ला जन्मलेले टी टी कृष्णमचारी यांनी ९ मार्च १९७४ ला जगाचा निरोप घेतला.

ashishpthatte@gmail.com

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias men of steel t t krishnamachari print eco news mrj
First published on: 15-10-2023 at 12:04 IST