लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : देशात व परदेशात इलेक्ट्रिकल पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी सर्वसमावेशक इंजिनीयरिंग (ईपीसी) सेवा पुरविण्यात विशेषज्ज्ञता असलेली मुंबईस्थित कोनस्टेलेक इंजिनीयर्स लिमिटेड कंपनी चालू महिन्याच्या उत्तरार्धात प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून २५ कोटी रुपयांची भांडवल उभारणी प्रस्तावित केली आहे. भाग विक्रीपश्चात कंपनीचे समभाग एसएमई कंपन्यांसाठी स्थापित ‘एनएसई इमर्ज’ या बाजारमंचावर सूचिबद्ध करण्याची योजना आहे.
तेल व वायू, रिफायनरी, स्टील, सिमेंट, औषधनिर्मिती, आरोग्य सेवा इत्यादी महत्त्वाच्या उद्योग क्षेत्रांना कोनस्टेलेक इंजिनीयर्सकडून सेवा प्रदान करण्यात येते आणि या उद्योगांतील रिलायन्स, इंजिनीअर्स इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील, इंडियन ऑइल, बीपीसीएल, एचपीसीएल, एमआरपीएल, इस्रो, एसीसी, बीएआरसी, अदानी, टाटा स्टील आणि आयजीपीएल यांसारख्या नामांकित कंपन्या तिच्या या सेवांचे ग्राहक आहेत. कंपनीकडे सध्या ५० मोठ्या प्रकल्पांद्वारे, सुमारे ५६५ कोटी रुपये मूल्याचे कार्यादेश आहेत. भारत व परदेशांतील हे सर्व प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर आहेत.
प्रारंभिक भाग विक्रीत कंपनीचे १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या ४१ लाख समभागांची बुक-बिल्ड प्रक्रियेने निर्धारित केल्या जाणाऱ्या किमतीला विक्री केली जाणार आहे. बीलाइन कॅपिटल ॲडव्हायझर्स हे भाग विक्रीचे व्यवस्थापन पाहणार आहेत, तर स्कायलाइन फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे या भाग विक्रीसाठी निबंधक असतील. यातून उभारल्या जाणाऱ्या निधीचा उपयोग आपल्या दीर्घकालीन प्रकल्पांसाठी उच्च दर्जाची सामग्री घेण्यासाठी तसेच खेळत्या भांडवलाच्या पूर्ततेसाठी करण्यात येणार आहे.