अजय वाळिंबे
किंग्फा सायन्स अँड टेक्नॉलॉजी (इंडिया) लिमिटेड ही चीनमधील किंग्फा कंपनीची उपकंपनी आहे. कंपनी ऑटोमोटिव्ह, ग्राहक उत्पादने आणि वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणांसाठी (मास्क आणि हातमोजे) उच्च-गुणवत्तेच्या सुधारित प्लास्टिक संयुगे उत्पादन आणि पुरवठा करण्याच्या व्यवसायात आघाडीवर आहे. कंपनीच्या उत्पादनांमध्ये मॉडिफाइड पॉलीप्रोपायलीन कंपाऊंड, इंजिनीअरिंग प्लॅस्टिक कंपाऊंड आणि मास्क आणि ग्लोव्हजसारख्या वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट पीपीई) यांचा समावेश आहे. पीपीई विभागाने थ्री-प्लाय, फोल्डेबल मास्क आणि विविध प्रकारांसाठी सुविधांसाठी नवीन उत्पादन शृंखला उभारली.
कंपनीचे पुणे, पुद्दुचेरी आणि मानेसर येथे उत्पादन प्रकल्प असून, प्रमुख ऑटो हब आणि औद्योगिक पट्ट्यांमध्ये विपणन कार्यालये आणि गोदामे आहेत. पुण्याजवळील चाकण येथे नवीन ग्रीन फील्ड उत्पादन सुविधा नुकतीच कार्यान्वित करण्यात आली आहे. कंपनीची उत्पादने भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असून कंपनी आपली उत्पादने अमेरिका, दक्षिण आफ्रिका, थायलंड आणि चीनला निर्यात करते. दोन वर्षांपूर्वी कंपनीने चाकण प्रकल्पामध्ये इंजिनीअरिंग प्लास्टिक्सचे वाढीव क्षमतेसह उत्पादन सुरू केले असून ओईएमसाठी चीनमधून मंजुरी घेण्यात आली आहे.
हेही वाचा >>>Money mantra: वित्तरंजन:‘पॉन्झी’ म्हणजे काय (कोण) रे, भाऊ? (भाग १)
कंपनीने विद्युत दुचाकी (ईव्ही टू व्हीलर) विभागांसाठी फ्लेम रिटार्डंट कंपाऊंड्सचे यशस्वीपणे उत्पादन करून व्यापारीकरण केले आहे. पीव्हीसाठी ओईएमसह काम सुरू आहे. कंपनीच्या इतर उत्पादनांमध्ये उदा, इलेक्ट्रिकल, पॉवरटूल्स, उपकरणे, बॅटरी यांचा समावेश होतो, तर अभियांत्रिकी प्लास्टिकसारख्या मूल्य शृंखलेमध्ये उच्च प्रतीचे उत्पादने करणे हे कंपनीचे धोरण आहे.
कंपनी सातत्याने उत्तम कामगिरी करत असून कंपनीने डिसेंबर २०२३ अखेर सरलेल्या तिमाहीत अपेक्षित कामगिरी करून दाखवली आहे. कंपनीच्या उलाढालीत १६ टक्के वाढ होऊन ती ३९४ कोटींवर गेली आहे; तर नक्त नफ्यात २० टक्के वाढ होऊन तो २४.३ कोटींवर गेला आहे. करोनापश्चातही सावध झालेल्या आणि जनजागृतीमुळे पीपीई किट्सना वाढती मागणी असून एक सर्वाधिक विकली जाणारी वस्तू म्हणून त्याचे वर्गीकरण करता येईल. तसेच बदलत्या मागणीनुसार कंपनी इलेक्ट्रिक वाहनासाठी उत्तम गुणवत्तेचे इंजिनीयरिंग प्लास्टिक उत्पादन करते आहे. आगामी कालावधीत कंपनीच्या उत्पादनांना वाढीव मागणी राहील अशी अपेक्षा आहे. सध्या २,००० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर एक मध्यमकालीन गुंतवणूक म्हणून योग्य वाटतो.
हेही वाचा >>>बाजारातली माणसं- छोट्या फंड घराण्याचा मोठा माणूस : आशीष सोमय्या
किंग्फा सायन्स अँड टेक्नॉलॉजी (इंडिया) लिमिटेड
(बीएसई कोड ५२४०१९)
प्रवर्तक: किंग्फा सायन्स अँड टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेड, चीन
वेबसाइट: kingfaindia.com
बाजारभाव: रु. २,०१६/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: प्लॅस्टिक मोल्डिंग/ पीपीई किट्स
भरणा झालेले भाग भांडवल: रु. १२.११ कोटी
बाजार भांडवल: रु. २,४२३ कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: २,५९५ / १,२४३
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ७४.९९
परदेशी गुंतवणूकदार ६.३६
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार —
इतर/ जनता १८.६५
पुस्तकी मूल्य: रु. ४३८.२
दर्शनी मूल्य: रु. १०/-
लाभांश: –%
प्रति समभाग उत्पन्न: रु. १०३.७
किंमत उत्पन्न गुणोत्तर: १९.३
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३२
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.०५
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: २८.७
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड (आरओसीई): २४.७
बीटा : ०.९
Stocksandwealth@gmail.com
हा लेख एक अभ्यासपूर्ण विवेचन असून गुंतवणूक सल्ला नव्हे.
प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.