लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: मूलभूतपणे मजबूत स्थिती परंतु तरी मूल्य कमी असलेल्या कंपन्यांची निवड करून त्यात गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवलवृद्धीचे उद्दिष्ट असलेली नवीन मुदतमुक्त योजना ‘महिंद्र मनुलाइफ व्हॅल्यू फंड’ नावाने दाखल झाली आहे. योजनेत शुक्रवार २१ फेब्रुवारी हा गुंतवणुकीसाठी खुला असलेला शेवटचा दिवस आहे.

अंगभूत मूल्यापेक्षा कमी किंमत असलेल्या समभागांवर केंद्रित असलेल्या या योजनेत समभागांचे नजीकच्या काळात संभाव्य पुनर्मूल्यांकन आणि कमाई वाढण्याची क्षमता हे या व्हॅल्यू फंडासाठी समभाग निवडीचे प्रमुख निकष आहेत. नवीन फंड प्रस्ताव (एनएफओ) २१ फेब्रुवारी २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, या योजनेचे युनिट्स ५ मार्च २०२५ पासून निरंतर विक्री आणि पुनर्खरेदीसाठी पुन्हा खुले होणे अपेक्षित आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किमान ५,००० रुपयांच्या गुंतवणुकीसह अथवा त्यानंतर १ रुपयाच्या पटीत अतिरिक्त गुंतवणूक या योजनेत गुंतवणूकदारांना करता येईल. ही योजना ‘निफ्टी ५०० व्हॅल्यू ५० इंडेक्स’ या निर्देशांकावर बेतलेली आहे. फंडाचे निधी व्यवस्थापन हे महिंद्र म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी (समभाग) कृष्णा संघवी आणि विशाल जाजू हे करतील. दोघांकडे भांडवली बाजारातील व्यवहाराचा ३० वर्षांहून अधिक अनुभव आहे.