scorecardresearch

बाजारातली माणसं : प्रगतीसाठी संघर्ष.. हर्ष मारीवाला

हर्ष मारीवाला यांचा एका व्यापारी कुंटुंबात जन्म झाला होता. मात्र पुढे हर्ष मारीवाला यांनी उत्पादन क्षेत्रात पाऊल टाकले. कोणे होते ते? जाणून घ्या त्यांची संघर्षगाथा.

Marico founder Harsh Mariwala
बाजारातली माणसं : प्रगतीसाठी संघर्ष.. हर्ष मारीवाला (image – indian express)

प्रगती करायची तर संघर्ष करावा लागतो. पहिला संघर्ष स्वतःच्या विचारसरणीबरोबर तर दुसरा संघर्ष कुटुंबातल्या जेष्ठ व्यक्तीबरोबर. अशा वेळेस अर्जुनासारखी अवस्था होते. तिसरा संघर्ष समभाग बाजारात सूचिबद्ध करताना अधिमूल्य किती ठेवावे याबाबत मर्चंट बँकशी संघर्ष आणि मग समभागविक्री यशस्वी झाली की, त्यानंतर बाजारात आपले स्थान टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. बाजारात मोठ्या कंपन्या लहान कंपन्यांना गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतात. यानंतरचा मोठा संघर्ष म्हणजेच फक्त भारतीय कंपनी म्हणून आपले अस्तित्व ठेवायचे की बहुद्देशीय भारतीय कंपनी व्हायचे. या प्रत्येक टप्प्यातील संघर्षाची गोष्ट म्हणजे मॅरिकोचे संस्थापक हर्ष मारीवाला यांची कथा.

हर्ष मारीवाला यांचा एका व्यापारी कुंटुंबात जन्म झाला होता. मात्र पुढे हर्ष मारीवाला यांनी उत्पादन क्षेत्रात पाऊल टाकले. बॉम्बे ऑईल इंडस्ट्रीज ही कंपनी स्थापन झालेली होती, मात्र ही खासगी कंपनी होती. या कंपनीने २७ जानेवारी १९९० ला मॅरिको या कंपनीला जन्म दिला. मार्च १९९६ मध्ये कंपनीच्या समभागांची विक्री झाली. कोटक आणि इनाम यांनी समभाग विक्री सांभाळण्याचे काम केले. दहा रुपये दर्शनी किमतीचा समभाग १६५ रुपये अधिमूल्य घेऊन विकण्यात आला. नव्या समभागाच्या विक्रीबरोबर प्रवर्तकांकडे असलेले काही समभागदेखील विक्री करण्यात आले आणि कंपनीचा पुढील प्रवास सुरू झाला.

हेही वाचा – जागतिक प्रतिकूलतेपायी सेन्सेक्सची ९२७ अंशांची आपटी

प्रथम कुटुंबातल्या जेष्ठ व्यक्तींना समभागाची बाजारात कशासाठी नोंदणी करायची याबाबत त्यांचे मत परिवर्तन करण्याचे खूप प्रयत्न करावे लागले. त्यानंतर मग पुढचा महत्त्वाचा प्रश्न होता, तो म्हणते प्रत्येकाकडे असलेल्या समभागाचे मूल्यांकन. कारण एकत्र कुटुंब पद्धतीत घरातील प्रमुख व्यक्ती गुंतवणुकीबाबत निर्णय घेत होते. ते घेताना कुटुंब व्यवस्था कायम राहावी, असे प्रयत्न केलेले असतात. त्यामुळे व्यवहार अधिक गुंतागुंतीचे बनतात. शिवाय स्थावर मालमत्ता मूल्यमापन आणि वाटण्या हे आणखी त्रासदायक असते. यात पुन्हा बॉम्बे ऑईल इंडस्ट्रीजमधून मॅरिको ही नवीन कंपनी जन्माला आली होती. जुन्या व्यवस्थेमध्ये ज्या ज्या व्यक्तींनी वर्षानुवर्षे कंपनी वाढवण्यासाठी मदत केलेली असते त्यांना बाजूला करणे फार अवघड असते. मात्र जर कंपनी मोठी करायची असेल तर असे कठीण निर्णय घ्यावेच लागतात. या सर्व काळात हर्ष मारीवाला यांनी प्रचंड मानसिक ताण सहन केला. कधी कधी तर कशासाठी आपण असे निर्णय घेतले असाही प्रश्न पडला. मात्र या कठीण समयी उदय कोटक यांनी मारीवाला यांना मदत केली.

पॅराशूट हेअर ऑइल या नाममुद्रेने तेल बाजारात प्रसिद्ध झाले. पाठोपाठ सफोला आणि त्यांनतर मग वेगवगेळ्या देशात प्रकल्प सुरू करून मॅरिको ही बहुउद्देशीय भारतीय कंपनी म्हणून उदयास आली. मोठ्या कंपन्या लहान कंपन्यांना गिळंकृत करण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करतात. मॅरिकोच्या बाबतीतदेखील हे घडणार होते. मात्र त्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावून कंपनी सांभाळली. नुसतीच सांभाळली नाही, तर २१६ कोटी रुपयांना हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीकडून निहार ही नाममुद्रा खरेदी केली. बहुउद्देशीय कंपन्यांसमोर हार मानायची नसते हे सिद्ध करून दाखवले. कंपनीचे बाजार भांडवल आज सुमारे ६४००० कोटींच्या घरात आहे. मारीवाला यांनी केलेला संघर्षमय प्रवास हा मोठा अभ्यासाचा विषय आहे.

हेही वाचा – इतना सन्नाटा क्यों हैं भाई?

बाजारात समभागांची नोंदणी का करायची? तर प्रवर्तकांकडे नोटा छापण्याचे यंत्र उपलब्ध होते. मात्र त्याचबरोबर कंपनीशी एकनिष्ठ राहिलेले भागधारकदेखील श्रीमंत होतात. केवळ साडेसतरा हजार रुपयांची गुंतवणूक आणि त्यानंतर १४/०८/२००२ ला एकास एक, पुन्हा ६/०५/२००४ या वर्षात एकास एक आणि २२/१२/२०१५ मध्ये पुन्हा एकास एक असे बक्षीस समभागांचे वाटप केले. दरम्यान १२/०१/२००६ ला दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या समभागांची १ रुपया दर्शनी मूल्याच्या दहा भागांत विभागणी केली. हे सर्व विचार घेतले तर त्यावेळी केलेली साडेसतरा हजार रुपयांची गुंतवणूक आज १ कोटी रुपयांहून अधिक झाली आहे.

मॅरिकोसारख्या अनेक कंपन्या भारतीय भांडवली बाजारात समभागांची नोंदणी करण्यासाठी आल्या पाहिजे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी फेरा कायदा आणला म्हणून अनेक भारतीय गुंतवणूकदारांना परदेशी कंपन्यांचे समभाग मिळाले. त्यामुळे भांडवली बाजार अधिक प्रगत होण्यास मदत झाली. परदेशी कंपन्यांबरोबर भारतीय उद्योजकांनी सुरू केलेल्या अनेक मोठ्या कंपन्या अजूनही बाजारात नोंदणी करण्यासाठी पुढे आलेल्या नाहीत. मॅरिको ही बांगलादेश, दक्षिण आशियातील देश, दक्षिण आफ्रिका आणि आणखी काही देशात कारखाने सुरू करून बहुउद्देशीय कंपनी झाली.

प्रमोद पुराणिक

(लेखक नाशिकस्थित अर्थ-अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार)

मराठीतील सर्व बाजार ( Market ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-02-2023 at 17:57 IST