Tata Trusts Controversy : भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहापैंकी एक असलेल्या टाटा समूहात मागील काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. रतन टाटा यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे मेहली मिस्त्री यांची टाटा ट्रस्ट्सच्या संचालक मंडळातून २८ ऑक्टोबर रोजी हकालपट्टी झाली. त्यामुळे टाटा समूहात एकच खळबळ उडाली.

टाटा ट्रस्ट्सच्या अखत्यारीतील सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट या दोन विश्वस्त मंडळांवर मेहली मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीस बहुसंख्य विश्वस्तांनी विरोध केला होता. त्यानंतर अखेर मेहली मिस्त्री यांच्या गच्छंतीवर शिक्कामोर्तब झालं. त्यानंतर मेहली मिस्त्री हे या निर्णयाला आव्हान देतील अशी शक्यता व्यक्त होत असतानाच मिस्त्री यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

टाटा ट्रस्टमधील हकालपट्टीनंतर मिस्त्री यांनी आता कायदेशीर लढाईचा मार्ग स्वीकारत मुंबईमधील धर्मादाय आयुक्तांकडे विश्वस्तांच्या विरोधात ‘कॅव्हेट’ दाखल केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता टाटा ट्रस्ट आणि मेहली मिस्त्री यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भातील वृत्त सीएनबीसी टीव्ही १८ च्या हवाल्याने फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिलं आहे.

दरम्यान, टाटा ट्रस्ट्सच्या विश्वस्तांच्या यादीत कोणताही बदल करण्यापूर्वी त्यांचं म्हणणे ऐकून घ्यावं अशी मागणी मेहली मिस्त्री यांनी मुंबईतील धर्मादाय आयुक्त कार्यालयात कॅव्हिट दाखल करत केली असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. त्यामुळे मिस्त्री यांची बाजू धर्मादाय आयुक्त ऐकण्याची शक्यता आहे.

मेहली मिस्त्री कोण?

मेहली मिस्त्री हे दिवंगत सायरस मिस्त्री यांचे मावसबंधू होत. तरी देखील मिस्त्री आणि टाटा यांच्या वादामध्ये त्यांनी टाटांची पाठराखण केली. शापूरजी पालनजी उद्योगसमूहाची मालकी असलेल्या कुटुंबाशी निगडित असूनही मेहली मिस्त्री यांनी एम. पालनजी या कंपनीच्या माध्यमातून वेगळी वाट चोखाळली. औद्योगिक रंगकाम, जलखोदाई, जहाजबांधणी, मालवाहतूक, वाहन वितरण, विमा अशा क्षेत्रांमध्ये एम. पालनजी समूह कार्यरत आहे. त्यांचे आणि रतन टाटा यांचे विशेष जिव्हाळ्याचे संबंध होते. रतन टाटांना ते प्रेरक (मेंटॉर) मानत. त्यामुळे सायरस मिस्त्री यांची २०१६मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली, त्यावेळी टाटा विरुद्ध मिस्त्री असा वादात मेहली मिस्त्री मात्र रतन टाटांच्या बाजूने उभे राहिले होते. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या अलिबागमधील बंगल्याचा ताबा मेहली मिस्त्रींकडे आला.

वाद कशामुळे?

नोव्हेंबर २०२२मध्ये मेहली मिस्त्री यांची टाटा ट्रस्ट्सच्या मंडळांवर नियुक्ती झाली. या नियुक्तीची मुदत २८ ऑक्टोबर रोजी संपत होती. नियुक्तीला मुदतवाढ मिळती, तर मेहली मिस्त्री हयात संचालक म्हणून कार्यरत राहू शकले असते. पण टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष; तसेच रतन टाटांचे उत्तराधिकारी नोएल टाटा, टीव्हीएस समूहाचे वेणू श्रीनिवासन आणि माजी संरक्षण सचिव विजय सिंग या ट्रस्टच्या तीन संचालकांनी मिस्त्री यांच्या फेरनियुक्तीस नकार दिला. तर प्रमित जव्हेरी, दारियस खंबाटा आणि जहांगीर एच. सी जहांगीर या इतर तीन संचालकांनी नियुक्तीस अनुमोदन दिले. पण टाटा ट्रस्ट्सच्या नियमानुसार, नियुक्ती किंवा फेरनियुक्ती एकमताने होणे अनिवार्य असते.