L&T Chairman S N Subrahmanyan: लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एसएन सुब्रह्मण्यम यांनी या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीतील कर्मचाऱ्यांना संबोधित करत असताना आठवड्यातून ९० तास आणि रविवारीही काम करावे, असे म्हटले होते. “रविवारी पत्नीकडे किती वेळ पाहत बसणार त्यापेक्षा काम करा”, असे विधान केल्यामुळे सुब्रह्मण्यम यांच्यावर जोरदार टीका झाली होती. आता या विधानावर सुब्रह्मण्यम यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
सदर विधान का केले?
सुब्रह्मण्यम यांनी मनीकंट्रोलला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या जुन्या विधानाबद्दल स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “त्यावेळी माझ्या डोक्यात अनेक प्रश्न होते. पाच ते सहा क्लाईंट आणि त्यातही काही हाय प्रोफाइल क्लाईंट्सनी मला व्यक्तिशः फोन करून आणि ईमेलद्वारे त्यांच्या कामाच्या प्रगतीबद्दल विचारणा केली होती.”
सुब्रह्मण्यम पुढे म्हणाले, “माझा सहभाग असूनही आम्हाला मजूर आणि कर्मचारी काही प्रकल्पांकडे वळविण्यात अपयश येत होते. प्रकल्प पुढे सरकत नव्हते. अशावेळी मला प्रश्न विचारले जाणे, हे माझ्यासाठी आणि संस्थेसाठी चांगले नव्हते.”
मनाई करूनही रेकॉर्डिंग केले गेले
सुब्रह्मण्यम म्हणाले, “कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना एका व्यक्तीच्या प्रश्नाचे उत्तर देत असताना मी सहज ते विधान बोलून गेलो. पण मनाई केल्यानंतरही तो संवाद रेकॉर्ड करण्यात आला होता. “बैठकीत एका व्यक्तीने मला प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर देताना मी सहज बोलून गेलो. पण रेकॉर्डिंग आमच्या मनाईनंतरही केले गेले. आता मागे वळून बघतो तेव्हा वाटते की, मी वेगळ्या पद्धतीने बोलू शकलो असतो.”
पत्नीला काय वाटले?
“मी नेहमी सोप्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करत असतो. माझी शैली सोपी मांडणी करण्याची आहे. पण माझी पत्नी नाहक यात ओढली गेल्यामुळे तिलाही वाईट वाटले”, असेही सुब्रह्मण्यम म्हणाले.