प्रसिद्ध उद्योगपती आणि रेमंड इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांच्या घटस्फोटाची देशभर चर्चा चालू आहे. गौतम सिंघानिया लग्नाच्या ३२ वर्षांनंतर पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांना घटस्फोट देणार आहेत. त्यांच्या पत्नीने घटस्फोटासाठी मोठ्या अटीदेखील ठेवल्या आहेत. नवाज मोदी यांनी गौतम सिंघानिया यांच्याकडे त्यांच्या एकूण संपत्तीपैकी ७५ टक्के रक्कम मागितली आहे. दरम्यान, नवाज मोदी यांनी गौतम सिंघानिया यांच्यावर मारहाणीचे आरोप केले आहेत. नवाज मोदी यांनी सांगितलं की, आतापर्यंत तीन वेळा गौतम सिंघानिया यानी त्यांना जबर मारहाण केली आहे.
रेमंडचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांची पत्नी नवाज मोदी यांनी इकोनॉमिक्स टाईम्सशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या पतीने म्हणजेच गौतम सिंघानिया यांनी त्यांना रागाच्या भरात बराच वेळ लाथा-बुक्क्यांनी मारलं होतं. त्यांची मुलगी त्यावेळी तिथेच होती. सिंघानिया यांनी त्यावेळी त्यांच्या मुलीलाही मारहाण केली. ही ९ सप्टेंबरची घटना असल्याचं नवाज मोदी यांनी म्हटलं आहे.
नवाज मोदी म्हणाल्या, “९ सप्टेंबर रोजी त्याने मला तिसऱ्यांदा मारहाण केली. तब्बल १५ मिनिटं तो मला मारत होता. त्यानंतर माझ्या मुलीलाही त्याने मारलं.” दरम्यान, गौतम सिंघानिया यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सिंघानिया म्हणाले, या आरोपांविरोधात मी कायदेशीर लढाई लढेन.
दरम्यान, माध्यमांनी याविषयी गौतम सिंघानिया यांच्याकडे विचारणा केली. त्यावर सिंघानिया म्हणाले, मी माझ्या मुली आणि कुटुंबाचा सन्मान राखण्यासाठी या आरोपांवर कोणतीही टिप्पणी करणार नाही. कृपया माझ्या खासगी आयुष्याचा आणि गोपनियतेचा आदर करा.
नवाज मोदींनी मागितले ८,७४५ कोटी रुपये
गौतम सिंघानिया यांची एकूण संपत्ती १.४ अब्ज डॉलर्स (तब्बल ११,६६० कोटी रुपये) इतकी आहे. तर नवाज मोदी यांनी गौतम सिंघानिया यांच्याकडे घटस्फोटाच्या बदल्यात तब्बल ८,७४५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. नवाज मोदी सिंघानिया यांनी ही रक्कम स्वतःसाठी आणि त्यांच्या दोन मुली निहारिका आणि नीसा यांच्यासाठी मागितली आहे.
