Nestle CEO Laurent Freixe Fired: कनिष्ठ कर्मचाऱ्याशी गुप्तपणे प्रेमसंबंध ठेवल्याबद्दल नेस्लेच्या सीईओंवर कारवाई करण्यात आली आहे. कंपनीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नेस्लेने सीईओ
लॉरेंट फ्रीक्स यांची हकालपट्टी केली आहे. स्विस बहुराष्ट्रीय कंपनीने आता फ्रीक्स यांच्याजागी फिलिप नवरातिल यांची सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे.
लॉरेंट फ्रीक्स कोण आहेत?
६३ वर्षीय फ्रेंच बिझनेस एक्झिक्युटिव्ह लॉरेंट फ्रीक्स यांची वर्षभरापूर्वी नेस्लेचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. १ सप्टेंबर २०२४ रोजी फ्रीक्स यांनी तत्कालीन सीईओ उल्फ मार्क श्नाइडर यांच्याकडून पदभार स्वीकारला होता. मात्र बरोबर एका वर्षानंतर कनिष्ठ कर्मचाऱ्याशी असलेले प्रेमसंबंध ठेवल्याची चौकशी झाल्यानंतर त्यांना काढून टाकण्यात आले आहे.
फ्रीक्स हे नेस्लेमध्ये ४० वर्षांपासून काम करत होते. किराणा दुकानदारांशी करार करून त्यांनी नेस्लेमधील कारकिर्दीची सुरुवात केली होती.
नेस्लेने हकालपट्टीनंतर काय म्हटले?
नेस्लेचे अध्यक्ष पॉल बुल्के आणि प्रमुख स्वतंत्र संचालक पाब्लो इस्ला यांच्या नेतृत्वाखालील समितीने चौकशी केल्यानंतर लॉरेंट फ्रीक्स यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात आली.
कंपनीने एका निवेदनात म्हटले, फ्रीक्स यांचे गुप्त प्रेमसंबंध हे नेस्लेच्या आचारसंहितेचे उल्लंघन आहे. त्यामुळे त्यांना पदापासून दूर करण्यात आले आहे. हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. नेस्लेची मुल्ये आणि उत्तम प्रशासन हा आमच्या कंपनीचा मजबूत पाया आहे. फ्रीक्स यांच्या सेवेबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.
प्रेमसंबंध कसे उघड झाले?
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीच्या व्हिसलब्लोइंग चॅनेलद्वारे ही गुप्त माहिती बाहेर आली. फ्रीक्स यांनी कनिष्ठ सहकाऱ्याशी प्रेमसंबंध ठेवल्याचे समजल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. मात्र संबंधित कर्मचाऱ्याचे नाव उघड करण्यात आले नाही. तसेच प्रेमसंबंध असलेली व्यक्ती कार्यकारी मंडळाचा सदस्य नाही, असेही सांगण्यात आले.