मुंबई : कमकुवत जागतिक संकेतांपायी निफ्टी २०,११० या ऐतिहासिक उच्चांकी पातळीपासून माघारी फिरला आणि नकारात्मक पातळीवर स्थिरावला. दुसरीकडे सेन्सेक्समध्ये सलग आठव्या सत्रात तेजीची दौड कायम आहे. मंगळवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ९४.०५ अंशांनी वधारून ६७,२२१.१३ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ४१२.०२ अंशांची भर घालत ६७,५३९.१० ही सत्रातील उच्चांकी पातळी गाठली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३.१५ अंशांची किरकोळ घसरण झाली आणि तो १९,९९३.२० पातळीवर स्थिरावला. दिवसभरातील व्यवहारांत तो ११४ अंशांनी वधारून २०,११०.३५ या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता.
बाजार मूल्यांकन वाढत असल्याने गुंतवणूकदारांनी सावधतेचा पवित्रा अवलंबत नफावसुलीला प्राधान्य दिले. लार्ज कॅप कंपन्यांमधील तेजीबरोबरच व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मिडकॅप कंपन्यांच्या समभागांमध्येदेखील वाढ कायम आहे. अल्प कालावधीसाठी बाजारात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र देशांतर्गत अर्थव्यवस्थेबाबत वाढती सकारात्मकता, कंपन्यांची वाढती तिमाही कमाई आणि गुंतवणुकीच्या पद्धतीत होत असलेल्या बदलामुळे दीर्घावधीत बाजारातील वातावरण आशादायी राहण्याची शक्यता आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा : गेल्या चार वर्षांत दर मिनिटाला २५ जणांना नोकऱ्या मिळाल्या, SBIच्या अहवालातून मोठा खुलासा
सेन्सेक्समध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, लार्सन अँड टुब्रो, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, नेस्ले, आयटीसी आणि सन फार्मा यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर पॉवर ग्रिड, एनटीपीसी, टाटा मोटर्स, टाटा स्टील, महिंद्र अँड महिंद्र आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात घसरण झाली.
सेन्सेक्स ६७,२२१.१३ ९४.०५ ०.१४ .
निफ्टी १९,९९३.२० – ३.१५ -०.०२
डॉलर ८२.९४ ९
तेल ९१.३१ ०.७४