Oracle Layoff in India: जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक असलेल्या ओरॅकल कॉर्पोरेशनने भारतातील जवळपास १० टक्के कर्मचारी वर्ग कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सुविधेसाठी कंपनीला गुंतवणूक वाढवायची असल्यामुळे कर्मचारी वर्गाची पुनर्रचना करण्यात येत असल्यामुळे ही कपात होत असल्याची माहिती मिळत आहे.
ओरॅकलने नुकताच ओपनएआय कंपनीशी एक मोठा करार केला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी उच्चस्तरीय चर्चा झाल्यानंतर ही कर्मचारी कपातीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे कंपनीकडून पुनर्रचनेचे कारण देण्यात येत असले तरी यामागे ट्रम्प यांचे धोरण कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
ओरॅकलसाठी कुशल मनुष्यबळ पुरविणारा भारत हा मुख्य स्त्रोत राहिला आहे. गेल्या काही वर्षात कंनपीने बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, मुंबई, पुणे, नोएडा आणि कोलकाता येथे जवळपास २८,८२४ लोकांना नोकरी दिली. डेटा सेंटर डायनॅमिक्सने दिलेल्या वृत्तानुसार, या नवीन कपातीमुळे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, क्लाउड सेवा आणि कस्टमर सपोर्ट विभागातील कर्मचाऱ्यांना या नोकरकपातीचा मोठा फटका बसणार आहे.
ओरॅकल अधिकारी आणि ट्रम्प यांची भेट
७ ऑगस्ट रोजी ओरॅकलचे सीईओ लॅरी विल्सन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. तसेच ओरॅकल आणि ओपनएआय यांच्यात एक मोठा करारही झाला होता. विशेष म्हणजे या करारानंतर अमेरिकेच्या व्हर्जिनिया येथील कार्यालयात कंपनीकडून मोठी नोकरभरती केली जात आहे. मात्र दुसरीकडे भारतासारख्या देशातून कर्मचारी काढले जात आहेत.
डेटा सेंटर डायनॅमिक्सच्या बातमीनुसार, कॅनडातूनही अनेक कर्मचाऱ्यांना काढण्यात आले आहे. तसेच इतर देशांमधील कर्मचाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. तसेच मेक्सिकोमधील कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या देशांमध्येही भारतासारखी कपात करण्यात येईल, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.