Indian Textile Market In Danger Due To Donald Trump’s Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादल्याचे परिणाम आता दिसू लागले आहे. भारतातील कापड उद्योगात यामुळे चिंतेचे वातावरण आहे. भारतीय निर्यातदारांना ऑर्डर मिळणे बंद झाले असून, पूर्वी मिळालेले ऑर्डर देखील रद्द करण्यात येत आहेत.

पाकिस्तान, बांगलादेशला फायदा

निटवेअरचा (विणलेल्या कपड्यांचा) विचार केला जातो तेव्हा तमिळनाडू व्यतिरिक्त, बांगलादेश, पाकिस्तान आणि व्हिएतनाम ही देखील या कपड्यांसाठी चांगली बाजारपेठ मानली जाते, त्यामुळे भारताला पूर्वी मिळालेल्या ऑर्डर आता कमी शुल्कामुळे या देशांना मिळू लागल्या आहेत. प्रत्यक्षात, अमेरिकेने या देशांवर १९ ते ३६ टक्के शुल्क लादले आहे, जे भारतावर लादलेल्या ५० टक्के शुल्कापेक्षा खूपच कमी आहे.

हा भार एका रात्रीत दुप्पट झाला

तमिळनाडूतील तिरुप्पुरमधील एका निर्यातदाराने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, त्यांची नियमित अमेरिकन शिपमेंट पाकिस्तानकडे वळवण्यात आली आहे. दुसऱ्याने सांगितले की त्यांच्या अमेरिकन खरेदीदाराने त्यांना उन्हाळी ऑर्डरची निर्यात करण्यापूर्वी “थांबा” असे सांगितले आहे. तिसऱ्या निर्यातदाराने स्पष्ट केले की, “खरेदीदार पूर्वी निर्यातदारांनी २५% कर टॅरफी वाढ सोसावी अशी मागणी करत होते, हा भार आता एका रात्रीत दुप्पट झाला आहे.”

दरवर्षी ४५,००० कोटी रुपयांच्या कपड्यांची निर्यात

गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूचा कापड उद्योगाचा पट्टा अमेरिकेतील ऑर्डरमध्ये पुन्हा वाढ करण्याची तयारी करत होता, अशा वेळी त्यांना ट्रम्प यांच्या टॅरिफचा धक्का बसला आहे. तिरुप्पूर, कोइम्बतूर आणि करूर येथे एकत्रितपणे १.२५ दशलक्षाहून अधिक कामगार काम करतात आणि दरवर्षी ४५,००० कोटी रुपयांचे कपडे निर्यात करतात.

यंत्रसामग्रीमध्ये गुंतवणूक

काही आठवड्यांपूर्वीच, भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार आणि चीनवरील वाढीव टॅरिफ (१२५%-१४५%) आणि म्यानमार (४०%) यामुळे भारतीय वस्तूंमध्ये अमेरिकेची वाढती मागणी यामुळे आशावाद वाढला होता. तामिळनाडूतील अनेक निर्यातदारांनी अपेक्षित वाढीला पुरवठा करण्यासाठी नवीन यंत्रसामग्रीमध्ये गुंतवणूक केली होती. ही आशा आता प्रतिशोधात्मक टॅरिफच्या ओझ्याखाली निराशेत बदलत आहे.

“हा एक मोठा धक्का आहे”, असे तिरुप्पुर एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष के एम सुब्रमण्यम म्हणाले. “स्वतंत्र निर्यातदार कंपन्यांना पहिला फटका बसेल. खरेदीदार आधीच आम्हाला टॅरिफचा काही भार सोसावा असे सांगत आहेत. आमचा नफा फक्त ५% ते ७% आहे, आम्ही हा खर्च कसा वाटून घेऊ शकतो?”, असे ते पुढे म्हणाले.

दोना लाख नोकऱ्या धोक्यात

कापड उद्योग हे कामगार-केंद्रित क्षेत्र आहे आणि या वाढवलेल्या टॅरिफमुळे नोकऱ्या जाण्याची चिंता आहे. ऑर्डर कमी झाल्यामुळे निर्यात १०-२०% कमी झाली तर पुढील काही महिन्यांत तिरुपूर, करूर आणि कोइम्बतूर या तीन केंद्रांमध्ये एकत्रितपणे एक ते दोन लाख कापड आणि वस्त्रोद्योग नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात.

४०-५०% निर्यात घटण्याचा अंदाज

केवळ तिरुप्पूरचे निटवेअर निर्यातीत ४०,००० कोटी रुपयांचे योगदान आहे. जे वॉलमार्ट, जीएपी आणि कॉस्टको सारख्या जागतिक दिग्गज कंपन्यांना पुरवठा करते आणि हे देशाच्या निटवेअर निर्यातीपैकी ५५% आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात या भागातून १०-१५% ने निर्यात वाढण्याची अपेक्षा होती. आता, परिस्थिती गंभीर आहे, विश्लेषकांनी अमेरिकेला जाणाऱ्या ऑर्डरमध्ये, विशेषतः कापूस आणि निटवेअर विभागांमध्ये ४०-५०% घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे.