एसीसी लिमिटेड (बीएसई कोड ५००४१०)

संकेतस्थळ : www.acclimited.com

प्रवर्तक: अंबुजा सिमेंट लिमिटेड, अदानी समूह

बाजारभाव: रु.१,८४५/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: सीमेंट

भरणा झालेले भाग भांडवल: रु. १८७.९९ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ५६.६९

परदेशी गुंतवणूकदार ५.०४

बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार २२.७०

इतर/ जनता १५.५७

पुस्तकी मूल्य: रु. १०६१

दर्शनी मूल्य: रु. १०/-

लाभांश: ७५%

प्रति समभाग उत्पन्न: रु. १७७.७२

किंमत उत्पन्न गुणोत्तर: १०.७

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३६.१

डेट इक्विटि गुणोत्तर: ०.०२

इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: ३६.०९

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (आरओसीई): १७.४४%

बीटा: ०.९

बाजार भांडवल: रु. ३४,५९७ कोटी (लार्ज कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: २,३६७/१,७७५

गुंतवणूक कालावधी : २४ महिने

अदानी समूहाची सदस्य असलेली एसीसी लिमिटेड ही १९३६ मध्ये स्थापन झालेली मूळची टाटा समूहाची कंपनी होती. अदानी समूहाने अंबुजा सिमेंट अधिग्रहण करून त्याद्वारे एसीसी, पन्ना सिमेंट, सांघी इंडस्ट्रीज तसेच ओरिएंट सिमेंट या कंपन्या ताब्यात घेतल्या आहेत. अंबुजा सिमेंटचा एसीसीमध्ये ५०.०५ टक्के हिस्सा आहे. एसीसी प्रामुख्याने सिमेंट आणि रेडी मिक्स काँक्रीटचे उत्पादन आणि विक्री करण्याच्या व्यवसायात आहे. कंपनीकडे संपूर्ण भारतात उत्पादन सुविधा असून ती प्रामुख्याने देशांतर्गत बाजारपेठेला सेवा देते. एसीसीचे अंबुजा सिमेंटसोबत (प्रमोटर ग्रुप) मुख्य पुरवठा करार आहे, ज्याचा फायदा संपूर्ण समूहाला होतो. कंपनीच्या वितरण जाळ्यामध्ये १३,००० हून अधिक भागीदार आणि जवळपास ४०,००० किरकोळ विक्रेते/उप-विक्रेते आहेत.

एसीसी ही भारतीय सिमेंट आणि बांधकाम साहित्य उद्योगातील एक मोठी आणि प्रतिष्ठित उत्पादक आहे. जवळजवळ नऊ दशकांच्या समृद्ध वारशात, कंपनीने एक उत्तम नाममुद्रा म्हणून उदयास येण्यासाठी तीन पिढ्यांचा विश्वास मिळवला आहे. अंबुजा सिमेंट लिमिटेडची उपकंपनी म्हणून, २०२८ पर्यंत अदानी समूहाच्या १४० एमटीपीए सिमेंट क्षमतेच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टात महत्त्वपूर्ण योगदान देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

व्यवसाय विभाग

१) सिमेंट: कंपनी गोल्ड आणि सिल्वर अशा दोन उत्पादन श्रेणीमध्ये पुरवठा करते. गोल्ड श्रेणीमध्ये एसीसी गोल्ड वॉटर शील्ड, एसीसी एफ२आर सुपरफास्ट इत्यादी प्रीमियम सिमेंट उत्पादनांचा समावेश आहे. तर एसीसी सुरक्षा पॉवर, एसीसी एचपीसी लाँग लाइफ, एसीसी सुरक्षा पॉवर इत्यादी परवडणारी सिमेंट उत्पादने देणारी सिल्व्हर श्रेणीत समाविष्ट आहेत.

२) रेडी मिक्स काँक्रीट-आरएमसी : कंपनी आपल्या विविध प्रकल्पासह आरएमसी पुरवठा करते. ती एसीसी इकोमॅक्सएक्स, एसीसी एरोमॅक्सएक्स इत्यादी नाममुद्रेअंतर्गत मूल्यवर्धित उत्पादने, किरकोळ तसेच कॉर्पोरेट ग्राहकांसाठी ड्राय मिक्स उत्पादने आणि बांधकाम रसायनांचा पुरवठा करते.

उत्पादन सुविधा

कंपनी २० सिमेंट उत्पादन सुविधा, ११ एकात्मिक युनिट, ९ ग्राइंडिंग युनिट आणि ८६ हून अधिक रेडी-मिक्स कॉंक्रिट प्रकल्प चालवते. तिची एकूण वार्षिक सिमेंट उत्पादन क्षमता ३८.५५ मेट्रिक टन आहे. कंपनीचे ११ कॅप्टिव्ह ऊर्जा प्रकल्प असून तिच्या गरजांपैकी ६० टक्के गरज पूर्ण होते. आर्थिक वर्ष २०२८ पर्यंत १००० मेगावॅट अक्षय्य क्षमता जोडण्यासाठी कंपनीने १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली आहे.

कंपनीची सध्याची क्षमता ४०.४ एमटीपीए आहे. कळंबोली प्रकल्पाच्या विस्तारामुळे तिसऱ्या तिमाहीत ही क्षमता ४३.७ एमटीपीएपर्यंत वाढेल. याव्यतिरिक्त, प्रकल्पातील अडथळे दूर केल्याने २४ महिन्यांत ५.६ एमटीपीएची क्षमता देखील वाढेल. अंबुजामधील आगामी सुमारे ३० एमटीपीए क्लिंकर समर्थित क्षमता एमएसएअंतर्गत एसीसीसाठी देखील उपलब्ध असतील, ज्यामुळे त्यांच्या दुहेरी-अंकी उत्पादन वाढीच्या गतीला मदत होईल.

अत्यल्प कर्ज असलेल्या एसीसीचे दुसर्या तिमाहीचे आर्थिक निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. अपेक्षेप्रमाणे कंपनीने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. सप्टेंबर २०२५ अखेर सरलेल्या तिमाहीसाठी कंपनीने ५,९३२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १,११९ कोटी रूपयांचा नक्त नफा कमवला आहे. मागणीत वाढ झाल्याने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सिमेंट क्षेत्र १० वर्षांच्या सरासरी नफ्याच्या पातळीवर परत येण्याची अपेक्षा आहे. ग्रामीण भागातील मागणीत सुधारणा आणि मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा फायदा क्षेत्राला होईल. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मागणी ७ टक्के ते ८ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा असून एकत्रित सिमेंट उद्योगासाठी आगामी कालावधी देखील उत्तम राहणार आहे. दोन वर्षांच्या कालावधीसाठी एसीसीमधील गुंतवणूक फायद्याची ठरावी.

शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो. म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्याटप्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

अजय वाळिंबे

Stocksandwealth@gmail.com

• हा लेख गुंतवणूक सल्ला नव्हे तर अभ्यासपूर्ण विवेचन आहे.

• प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहिती प्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनी कडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तु घेतलेली नाही.

• लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअर मधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.