Home loan and new income tax regime जुन्या करप्रणाली अंतर्गत करदात्यास उत्पन्नातून कलम ८० अंतर्गत मिळणाऱ्या वजावटी मिळू शकतात व त्यामुळे करदात्याचे करपात्र उत्पन्न कमी होवून करबचत होऊ शकते. या खेरीज घराच्या खरेदीसाठी काढलेले कोणतेही गृहकर्ज अजूनही देय असेल व त्यावर व्याज देय असेल तर करदाता सदर गृह कर्जावर दिलेल्या व्याजाचा तोटा इतर उत्पन्नाबरोबर समायोजन म्हणजे ‘सेट ऑफ’ करू शकतो. आणि उर्वरीत रक्कमेवर प्राप्तिकर आकारला जातो. तथापि, कलम ११५बीएसी नुसार, चालू वर्षाच्या घराच्या मालमत्तेच्या नुकसानीचा सेट-ऑफ नवीन कर प्रणाली अंतर्गत उत्पन्नाच्या इतर कोणत्याही उत्पन्न शीर्षावर उपलब्ध होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

प्राप्तिकराचा बोजा कमी करावयाचा असल्यास…

करदात्यास गृहकर्ज देणे असल्यास आणि एकंदर प्राप्तिकराचा बोजा कमी करावयाचा असल्यास, घराच्या कर्जासाठी द्याव्या लागणाऱ्या व्याजाच्या नुकसानीचा दावा करणे उचित आहे. असे केल्याने, द्याव्या लागणाऱ्या व्याजाने होणारे आर्थिक नुकसान इतर मिळकतींच्याद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातून वजा करून हा तोटा भरून काढता येऊ शकतो. यामुळे करदात्याचे एकूण करपात्र उत्पन्न कमी झाल्याने एकूण प्राप्तिकर भार देखील कमी होऊ शकतो.

तथापि, जर करदात्याला घराच्या मालमत्तेचे नुकसान इतर उत्पन्नाबरोबर समायोजित न करता पुढील वर्षाच्या त्याच स्त्रोताखाली समायोजित करण्यासाठी पुढील वर्षासाठी ओढायचे असेल किंवा चालू वर्षीच आर्थिक नुकसान भरून काढायचे असेल तर काही अटी पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.

करपात्र उत्पन्न कमी करण्यासाठी घरासाठी घेतलेल्या कर्जावर द्याव्या लागणाऱ्या व्याजापोटी होणारे आर्थिक नुकसान इतर उत्पन्नांतून करदाता कधी सेट-ऑफ करू शकतो?

करदात्याला घराच्या मालमत्तेतून होणाऱ्या आर्थिक नुकसानीचा तोटा इतर घराच्या मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नातून सेट-ऑफ करण्यासाठी कोणतीही आर्थिक मर्यादा प्राप्तिकर कायद्यात नाही, तथापि जेव्हा करदाता इतर स्त्रोत असणाऱ्या उत्पन्नातून (उत्पन्नाचे वेगवेगळे शीर्षक) घराच्या मालमत्तेचे आर्थिक नुकसान सेट ऑफ करतो त्यावेळी सेट ऑफची महत्तम मर्यादा रु. दोन लाख कायद्यानुसार ठरविण्यात आली आहे.

home loan
होम लोन घेताय? (image credit – pixabay/representational image)

शिवाय, जर घराच्या मालमत्तेचे झालेले आर्थिक नुकसान एका आर्थिक वर्षात दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असेल व करदात्याने जुन्या कर प्रणालीचा स्वीकार केला असल्यास जास्तीचे नुकसान ८ वर्षांपर्यंत पुढे ओढले जाऊ शकते . तथापि, कलम ११५बीएसी नुसार नवीन कर प्रणाली अंतर्गत, करदाता इतर कोणत्याही उत्पन्नाच्या रक्कमेतून स्व-व्याप्त घराच्या मालमत्तेचे आर्थिक नुकसान सेट ऑफ करू शकत नाही किंवा कोणतेही नुकसान पुढे नेऊ किंवा ओढू शकत नाही. थोडक्यात -व्याप्त मालमत्तेच्या संदर्भात, गृहकर्जावर भरलेल्या व्याजाची वजावट अनुज्ञेय नाही. तथापि, भाड्याने दिलेल्या घरासंबंधी असे कोणतेही निर्बंध नाहीत.

उदाहरणार्थ: डॉ इरा यांच्या मालकीची दोन घरे आहेत. एका घरात त्या स्वतः राहतात तर दुसरे घर भाड्याने दिले आहे. स्वव्याप्त घरासाठी काढलेल्या कर्जावर त्यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये रु २ लाख व्याज दिले आहे तर भाड्याने दिलेल्या मोठ्या घरावर रु. ६ लाखाचे व्याज दिले आहे. भाड्याच्या घरापासून त्यांना २० लाख भाडे मिळत आहे.

जुनी करप्रणाली

वर्षभराचे भाडे रु. २० लाख वजा ३०% प्रमाणित वजावट मिळाल्यानंतर उर्वरीत रु १४ लाख उत्पन्नातून स्वव्याप्त घराचे रु २ लाख व भाड्याच्या घराच्या व्याजाचे र ६ लाख वजावटीसाठी पात्र ठरून कर पात्र उत्पन्न रु ६ लाख असेल.

नवी कर प्रणाली

नवीन कर प्रणालीमध्ये, भाड्याने दिलेल्या घराच्या करपात्र भाड्याची मिळालेली रक्कम विचारात न घेता स्वव्याप्त घरापासून गृहकर्जावरील दिलेल्या व्याजामुळे होणारे आर्थिक नुकसान जुन्या कर प्रणालीप्रमाणे समयोजित करता येणार नाही व त्यामुळे रु २ लाख (स्वयं-व्याप्त) व्याजाची रक्कम उत्पन्नातून वजा केली जाणार नाही. सबब कर दायित्व वाढेल. तथापि, भाड्याने दिलेल्या गृह कर्जावरील व्याज मिळालेल्या भाड्याच्या उत्पन्नातून वजावटीसाठी पात्र राहील. सबब मिळालेल्या भाड्यातून प्रमाणित वजावट झाल्यानंतर उर्वरीत रु १४ लाखातून फक्त रु ६ लाख वजा होऊ शकतील व कर पात्र उत्पन्न रु ८ लाख असेल.

यात आणखी एक पैलू विचारात घेतला पाहिजे आणि तो म्हणजे जर मिळालेले भाडे कर्जावरील व्याजापेक्षा कमी असेल तर उर्वरीत व्याज पुढील वर्षाच्या उत्पन्नातून वजा करता येणार नाही. करदात्याकडे स्व-व्याप्त घराच्या मालमत्तेशी संबंधित कोणतेही गेल्या वर्षांचे आर्थिक नुकसान पुढे ओढले असेल म्हणजे कॅरी फॉरवर्ड नुकसान असेल, तर करदात्याने नवीन कर व्यवस्था प्रणाली निवडल्यास ते सर्व आर्थिक नुकसान उत्पन्नातून वजावटीसाठी पात्र असणार नाही हे नवीन प्रणालीत होणारे आर्थिक नुकसानच आहे.

थोडक्यात महत्वाचे

जर एखाद्या करदात्याने जुन्या प्रणालीतून नवीन प्रणालीत संक्रमण केले असेल आणि जुन्या प्रणालीत ‘घराच्या मालमत्तेतून उत्पन्न’ या शीर्षकाखाली तोटा पुढे ओढला असेल, तर सेटऑफची शक्यता मालमत्तेच्या स्वरूपाच्या आधारावर निश्चित केली जाईल.

  • १. जर हा तोटा स्व-व्याप्त मालमत्तेवर भरलेल्या गृहकर्जाच्या व्याजाशी संबंधित असेल तर तो उक्त नुकसानीचा दावा करण्यास पात्र असणार नाही. हे नुकसान तत्काळ संपुष्टात आले आहे असे समजले जाईल आणि उत्पन्नातून कोणत्याही वजावटीला मान्यता दिली जाणार नाही किंवा ते नुकसान पुढील वर्षांसाठी ओढले जाऊ शकणार नाही
  • २. जर तोटा भाड्याने दिलेल्या मालमत्तेवर भरलेल्या व्याजाशी संबंधित असेल तर तो मागील वर्षांचे पुढे आणलेले नुकसान चालू वर्षाच्या उत्पन्नातून भरून काढू शकतो. तथापि, पुढे आणलेले नुकसान केवळ घराच्या मालमत्तेतून मिळणा-या उत्पन्नातूंच वजावटीस पात्र होऊ शकते. आणि इतर कोणत्याही उत्पन्नाच्या स्त्रोतातून नाही. सेट ऑफ शिल्लक राहिलेले कोणतेही नुकसान मात्र संपुष्टात येईल आणि असे कोणतेही नुकसान पुढील वर्षात ओढले जाणार नाही
  • ३. करदाता नुकसानीचा दावा करून प्राप्तिकर कमी करू शकतो परंतु केवळ या प्रकारच्या घराच्या मालमत्तेवर मिळणाऱ्या उत्पन्नातून ! इतर स्त्रोतातून नाही.