वीडॉल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे पूर्वाश्रमीची टाइड वॉटर ऑइल कंपनी (इंडिया) लिमिटेड. वीडॉलची मालक असलेली ही कंपनी जगभरातील सत्तरहून अधिक देशांमध्ये दर्जेदार ल्युब्रिकंटची आघाडीची उत्पादक आणि वितरक आहे. भारतात वीडॉल कॉर्पोरेशन १९२८ पासून ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक दोन्ही क्षेत्रांना आपल्या सेवा पुरवते. वीडॉल उत्पादनांच्या श्रेणीमध्ये प्रवासी कार, दुचाकी/तीन चाकी वाहने, जड व्यावसायिक वाहने, ऑफ-हायवे वाहने, बस आणि ट्रॅक्टरसाठी उच्च-कार्यक्षमता असलेले इंजिन तेले समाविष्ट आहेत. त्यात सर्व ऑटोमोटिव्ह अनुप्रयोगांसाठी गियर ऑइल, ट्रान्समिशन ऑइल, कूलंट, ब्रेक ऑइल आणि ग्रीस तसेच विविध उद्योग अनुप्रयोगांसाठी औद्योगिक आणि विशेष ल्युब्रिकंटची विस्तृत श्रेणी देखील आहे. वीडॉल कॉर्पोरेशनची संपूर्ण उत्पादन श्रेणी ओईएमच्या नवीनतम तांत्रिक आवश्यकतांनुसार विविध अनुप्रयोगांसाठी आणि कामगिरी पातळीसाठी योग्य पर्याय देते.
जागतिक विस्तार
गेल्या वीस वर्षांत या बहुराष्ट्रीय कंपनीने आपला विस्तार वाढवत नेला आहे. वर्ष २०११ मध्ये कंपनीने बीपी पीएलसीकडून वीडॉल इंटरनॅशनल लिमिटेडचे (व्हीआयएल) १०० टक्के शेअर विकत घेतले. व्हीआयएलची नोंदणी एडिनबर्ग, इंग्लंड येथे झाली आहे आणि तिच्याकडे मास्टर ब्रँड-वीडॉल- तसेच त्याच्याशी संबंधित उत्पादन उप-नाममुद्रा आणि आयकॉनिक प्रतीक-चिन्हासाठी नोंदणीकृत व्यापार चिन्हाचे विस्तृत पोर्टफोलिओचे जागतिक अधिकार आहेत. तसेच वर्ष २०१४ मध्ये, कंपनीने जपानमधील सर्वात मोठ्या पेट्रोलियम समूह असलेल्या एनिओस कॉर्पोरेशनसोबत ५०:५० टक्के संयुक्त उपक्रम कंपनी स्थापन केली. संयुक्त उपक्रम, एनिओस टाइड वॉटर ल्युब्रिकंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नावाने स्थापित झाला असून ही कंपनी एनिओस नाममुद्रेच्या ल्युब्रिकंटच्या विक्री आणि विपणनावर लक्ष केंद्रित करते. भारतातील उच्च तंत्रज्ञानाची एनिओस उत्पादने वीडॉल कॉर्पोरेशनद्वारे उत्पादित केली जातात. हा संयुक्त उपक्रम होंडा मोटर्स, हिरो मोटो कॉर्पोरेशन, कुबोटा, यामाहा आणि कोबेल्कोसारख्या प्रसिद्ध ओईएमबरोबर असून त्यांना तेलांच्या पुरवठ्यासाठी मदत करतो. वर्ष २०१६ मध्ये, वीडॉल कॉर्पोरेशनने इंग्लंडमधील ग्रॅनव्हिलऑइल अँड केमिकल्स लिमिटेड ताब्यात घेतली.
ग्रॅनव्हिलऑइल ग्रॅनव्हिल ही इंग्लंडसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी वाहन निगा, रख-रखावासंबंधित उत्पादने आणि रसायनांची विस्तृत श्रेणी उत्पादित करते. भारतातील कोलकाता येथे नोंदणीकृत कार्यालय आणि नवी दिल्ली, मुंबई आणि चेन्नई येथे प्रादेशिक कार्यालये असलेल्या वीडॉल कॉर्पोरेशनचे भारतातील विस्तृत वितरण जाळे असून यात पाचशेहून अधिक थेट वितरक आहेत. ५०,००० हून अधिक किरकोळ विक्री केंद्र (रिटेल आउटलेट) आणि वर्कशॉप्सना सेवा देतात. कंपनीची नवी मुंबईतील तुर्भे आणि चेन्नईजवळील ओरागडम येथे दोन अंतर्गत संशोधन आणि विकास केंद्रे आहेत.
कंपनीचे यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. या कलावधीत कंपनीने ५१४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ४९.६७ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. जो गेल्या आर्थिक वर्षातील तिमाहीच्या तुलनेत ३४ टक्क्यांनी अधिक आहे. मात्र तरीही उत्तम व्यवस्थापन असलेल्या, केवळ ३.४० कोटी भाग भांडवल असलेल्या आणि कुठलेही कर्ज नसलेल्या वीडॉल कॉर्पोरेशनचे शेअर सध्या १,६०० रुपयाच्या आसपास उपलब्ध आहेत. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून या गुणी स्मॉलकॅपचा जरूर विचार करा.
सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता सुचवलेले समभाग कमी बाजारभावात मिळू शकतात, त्यामुळे प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण अनुसरावे.
वीडॉल कार्पोरेशन लिमिटेड (बीएसई कोड: ५९०००५)
- वेबसाइट: http://www.veedolindia.com
- प्रवर्तक: स्टँडर्ड ग्रीजेस अँड स्पेशलिटी प्रा. लि.
- बाजारभाव: रु. १,६२६/-
- प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : इंजिन तेल आणि ल्युब्रिकंट
- भरणा झालेले भाग भांडवल: रु. ३.४० कोटी
- शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
- प्रवर्तक ६२.३५
- परदेशी गुंतवणूकदार १.१४
- बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार १.१७
- इतर/ जनता ३५.३४
- पुस्तकी मूल्य: रु.५२५
- दर्शनी मूल्य: रु. २/-
- गतवर्षीचा लाभांश: २७००%
- प्रति समभाग उत्पन्न: रु. १०७.१
- किंमत उत्पन्न गुणोत्तर: १५.१
- समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: १८
- डेट इक्विटी गुणोत्तर: ०.०२
- इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: ६४.८
- रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड (आरओसीई): २३.७%
- बीटा : १
- बाजार भांडवल: रु. २,८३२ कोटी (स्मॉल कॅप)
- वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: २८००/१२७५
- गुंतवणूक कालावधी : २४ महिने
-अजय वाळिंबे
stocksandwealth@gmail.com
- प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहिती प्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनी कडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तु घेतलेली नाही.
- हा गुंतवणूक सल्ला नाही.
- लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअर मधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.