माणूस हा सवयीचा गुलाम असतो, हे आपल्या मनावर लहानपणापासून बिबंविले जाते. आर्थिक सवयी आणि आर्थिक स्थिती यांचाही असाच जवळचा संबंध आहे.
बहुतेक गुंतवणूकदार आयुष्यभर आणखी मोठी टीप शोधत राहतात, पण संपत्ती वृद्धीचे रहस्य चक्रवाढीच्या सामर्थ्यात दडलेले आहे. त्यामुळे परताव्याच्या दरापेक्षा गुंतवणूक किती वर्षे विना व्यत्यय चालू आहे, हे कितीतरी पटीने अधिक महत्त्वाचे असते. त्यामुळे जो गुंतवणुकीला अधिक वर्षे आपले काम करू देतो, तो श्रीमंत होतो.
पण जास्त परताव्याचा हव्यास आणि चंचलता बऱ्याचदा आपल्याला हे करू देत नाहीत. त्यामुळे गुंतवणुकीतील यशासाठी प्रथम काही सवयी लावून घेणे गरजेचे ठरते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यासाठी या सवयी कोणत्या ते पाहू.
पहिला टप्पा : पाया घालण्याचा काळ
आपल्यापैकी प्रत्येकाला गुंतवणुकीच्या प्रवासाच्या सुरुवातीला (भविष्यातील अदृश्य लाभांसाठी) लगेचच्या सुखांशी तडजोड करुन पैसे वाचवावे लागतात. अशा वेळी गुंतवणुकीतील सातत्य कायम राखण्यासाठी संयम आणि शिस्त हेच तुमचे एकमेव बळ असते. या टप्प्यात तात्कालिक फायद्यांच्या मागे धावण्याचा किंवा अनावश्यक जोखीम घेण्याचा मोह टाळून या सवयींवर लक्ष केंद्रित करा.
१. पगार सुरू होताच शक्य तितक्या मोठ्या रकमेची एसआयपी सुरू करा.
२. गुंतवणूक सोपी ठेवा आणि वेळेला आपले काम करू द्या.
३. नफा तपासण्याची घाई करू नका. तुमचं लक्ष्य लय आणि सातत्य यावर असू द्या.
हे भावनिक सापळे टाळा:
अधीरता: चक्रवाढाचा प्रभाव सुरुवातीला दिसत नाही. म्हणून बहुतेक लोक मध्येच गुंतवणूक थांबवतात.
गोंधळ: कोणतेही वृत्त उत्साह किंवा भय मोठे करून दाखवतात. लक्षात ठेवा, दोन्ही तात्पुरते असतात.
खर्चीक जीवनशैलीः बऱ्याच वेळा या वयात अनावश्यक खर्च उत्पन्नापेक्षा वेगाने वाढताना दिसतात. तुमच्या गुंतवणुकीचे स्वतःपासून रक्षण करणे गरजेचे ठरते.
लक्षात ठेवा-सहनशक्ती, संयम आणि मनावर ताबा हे गुण कोणत्याही समभाग निवडीच्या प्रतिभेपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत.
दुसरा टप्पा-प्रगतीचे रक्षण
एकदा संपत्ती वाढू लागली की, आव्हाने बदलतात-गती निर्माण करण्याऐवजी त्यात व्यत्यय न आणणे आता महत्त्वाचे ठरते.
आता अंकगणित तुमचा मित्र बनते.
एक लाखाच्या गुंतवणुकीवर १० टक्के परतावा १०,००० रुपये होतात, पण १० लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ते १ लाख रुपये जोडले जातात. आता तुमचे काम फक्त यात हस्तक्षेप न करणे एवढेच आहे. हे सोपे वाटते, परंतु येथेच अतिआत्मविश्वास आडवा येतो. प्रत्येक अनावश्यक हालचाल तुमच्या गुंतवणुकीचा वृद्धीदर कमी करते. या टप्प्यावर, ढवळाढवळ न करणे हाच खरा धर्म आहे.
* लाभांश आणि व्याजाचा प्रत्येक रुपया पुन्हा गुंतवा.
* तुमच्या पोर्टफोलिओचा आढावा घेत राहा, पण बाजारातील घडामोडींवर फार लक्ष देऊ नका.
* आकर्षक पर्यायांच्या मागे न धावता गुंतवणुकीत लक्षपूर्वक विविधता आणा.
चक्रवाढ ही मोठी शक्ती आहे, पण ते अनावश्यक हस्तक्षेप केल्यास भुर्दंड बसतो. या शर्यतीत जो टिकून राहतो, तोच जिंकतो.
तिसरा टप्पा : अहंकारापासून बचाव
यशासोबत नेहमीच एक धोकाही येतो. ‘मी यश खेचून आणले आहे, त्यामुळे गुंतवणुकीचे नियम माझ्यासाठी नाहीत, हा अहंकार बळावतो. शिस्त जपण्याऐवजी बुद्धिमत्ता सिद्ध करण्याचा मोह वाढतो.
अनेक गुंतवणूकदार इथे चुकतात
* कर्ज काढून जास्त जोखमीची गुंतवणूक करतात.
* चक्रवाढीला शांतपणे काम करू देण्याऐवजी ‘अल्फा’चा पाठलाग करतात.
* मित्रांच्या परताव्याशी तुलना करतात, महत्त्वाकांक्षेचे रूपांतर मत्सरात होते.
याला उपाय एकच आहे, तो म्हणजे नम्रता. बाजार फक्त भावनिक स्थैर्याची परीक्षा घेतो. स्मार्ट दिसण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सचोटी राखणे ही खरी हुशारी आहे. दशकभर साठवलेले धन एका चुकीच्या निर्णयाने नष्ट होऊ शकते.
चौथा टप्पा: संपत्ती प्रगल्भता
गुंतवणुकीचे यश फक्त परताव्यात नाही तर मनःशांतीमध्ये मोजायचे असते. जेव्हा तुमची चक्रवाढ ‘ऑटोपायलट’वर चालते आणि तुमच्या दैनंदिन हस्तक्षेपाची आवश्यकता उरत नाही तेव्हा तुम्ही प्रगल्भ गुंतवणूकदार झालात असे समजावे. या टप्प्यावर, आव्हान म्हणजे अस्वस्थता टाळणे. अनुभवी गुंतवणूकदारदेखील अवाजवी परताव्याच्या अपेक्षेने चुका करताना दिसतात. बाकीचे जग उत्साहाला बक्षीस देते; पण चक्रवाढ शांत राहण्याला बक्षीस देते.
तुलनेपासून अलिप्त रहा. बाजारात मोठ्या खेळीपेक्षा खेळपट्टीवर टिकून राहण्याला अधिक महत्त्व द्या. संपत्ती जे स्वातंत्र्य देते, ते आवश्यक खर्च मुक्तपणे करण्याच्या मोकळीकीबरोबरच पैसा आणखी वाढवण्याच्या चिंतेपासून मुक्तताही असायला हवी.
इतर आवश्यक सवयी
आपल्या क्षमतेचा परीघ ओळखा. जे समजत नाही ते टाळा.
योग्य वेळी ठाम निर्णय घ्या. काही मोजक्या, ठरलेल्या संधीच आयुष्य बदलतात.
प्रतिष्ठा आणि प्रामाणिकपणा जपा. एक चुकीची कृती दशकांची कमाई नष्ट करू शकते.
नेहमी धोक्यांकडे लक्ष द्या. काय जमू शकते याच्या विचाराइतकाच काय बिघडू शकते हा विचारही महत्त्वाचा आहे.
शेवटचा धडा : गणित ते ज्ञान
संपत्तीचा प्रवास गणितातून सुरू होतो आणि तत्त्वज्ञानात संपतो.
सुरुवातीला तुम्ही परतावा मोजता; सज्ञान झालात की समाधान मोजता.
तुमच्या गुंतवणुकीत तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब दिसते.
संयमी असाल तर शांतपणे काम होताना दिसते, अस्थिर असाल तर गोंधळ वाढलेला दिसतो.
खरा श्रीमंत तोच, जो संपत्तीनिर्मितीची ही लय जपतो. नियमित बचत, संयमी गुंतवणूक, स्वतंत्र विचार आणि स्थिर मन. आपल्याला विजय मिळवायचा तो बाजारावर नाही, स्वतःच्या भावनांवर – ही गुरुकिल्ली नेहमी लक्षात ठेवा. कारण जो मन स्थिर ठेवतो, त्याच्याकडेच चक्रवाढीची जादू काम करते.
sandeep.walunj@zohomail.in
लेखक अर्थसाक्षरतेसाठी कार्यरत आहेत
