वर्ष १९८१ मध्ये स्थापन झालेली नॅटको फार्मा लिमिटेड ही भारतातील एक आघाडीची एकात्मिक, संशोधन आणि विकास केंद्रित औषध कंपनी आहे. नॅटको विशिष्ट उपचारात्मक क्षेत्रांसाठी उत्पादने विकसित, उत्पादन आणि विपणन करते. नॅटकोने ‘फिनिश्ड डोस फॉर्म्युलेशन’ (एफडीएफ), सक्रिय औषध घटक (एपीआय), करार उत्पादन व्यवसाय (कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग) या तिन्ही व्यवसाय विभागांमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.
व्यवसाय विभाग
१) निर्यात फॉर्म्युलेशन (आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीत महसूल: ८१ टक्के): कंपनी अमेरिका, कॅनडा, ब्राझील आणि युरोपसह पन्नासहून अधिक देशांमध्ये ‘फिनिश्ड डोस फॉर्म्युलेशन’चे उत्पादन आणि विपणन करते. प्रमुख अमेरिकी भागीदारांमध्ये सन-रॅनबॅक्सी, एसिटो-रायझिंग, अल्व्होजेन, तेवा, मायलन, ॲक्टॅव्हिस, ल्युपिन इत्यादींचा समावेश आहे.
२) देशांतर्गत फॉर्म्युलेशन (आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या तिमाहीत महसूल: ७.४ टक्के): देशांतर्गत फॉर्म्युलेशन व्यवसाय ‘ऑन्कोलॉजी’, ‘स्पेशॅलिटी फार्मा’, ‘कार्डिओलॉजी’ आणि ‘डायबेटोलॉजी’ क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनी दरवर्षी किमान पाच नवीन उत्पादने सादर करण्याची योजना आखत आहे. ‘ब्रँडेड ऑन्कोलॉजी’ लक्ष्यित थेरपी विभागांमध्ये ही आघाडीची आणि अग्रणी कंपन्यांपैकी एक आहे.
३) सक्रिय औषध घटक (एपीआय) (आर्थिक वर्ष २६च्या दुसऱ्या तिमाहीत महसूल ३.८ टक्के): कंपनी विशिष्ट ‘एपीआय’ उत्पादनात विशेषज्ञ आहे, नॅटकोकडे प्रामुख्याने ‘ऑन्कोलॉजी’ विभागातील पन्नासहून अधिक ‘एपीआय’चा पोर्टफोलिओ आहे. कंपनी केंद्रीय मज्जासंस्था प्रणाली, वेदना व्यवस्थापन आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी (Heart Care) यासारख्या इतर उपचारात्मक क्षेत्रांमध्येदेखील कार्यरत आहे.
४) पीक आरोग्य विज्ञान (आर्थिक वर्ष २०२६ च्या दूसऱ्या तिमाहीत महसूल २.५ टक्के): कंपनी कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके, ‘बायोस्टिम्युलंट्स’ आणि ‘सेमीओ केमिकल्स’सह पीक संरक्षण उत्पादित करते. तिची प्रमुख उत्पादने भात, ऊस, कापूस, टोमॅटो, मिरची आणि सोयाबीनसारख्या पिकांना प्रभावित करणाऱ्या कीटकांना लक्ष्य करतात आणि त्यात ‘क्लोराँट्रानिलिप्रोल’, ‘थायामेथोक्सम’ आणि ‘फिप्रोनिल’सारख्या तांत्रिक फॉर्म्युलेशनचा समावेश आहे.
५) इतर (महसूल ६ टक्के): कंपनी प्रमुख भारतीय कंपन्यांसाठी ४० हून अधिक फार्मा उत्पादनांची एक आघाडीची कंत्राटी उत्पादक आहे. यात ‘ऑन्कोलॉजी’, ‘अँटीव्हायरल’ आणि ‘कार्डिओलॉजी’सारख्या प्रमुख उपचारात्मक क्षेत्रांमध्ये ‘टॅब्लेट’, ‘कॅप्सूल’ आणि ‘इंजेक्शन’चा समावेश आहे.
उत्पादन सुविधा/ संशोधन आणि विकास
कंपनीच तेलंगणा, तामिळनाडू, उत्तराखंड, आसाम आणि आंध्र प्रदेशमध्ये ८ उत्पादन प्रकल्प असून त्यात ‘फिनिश्ड डोस फॉर्म्युलेशन’साठी ५, ‘एपीआय’चे २ आणि एका कृषी रसायनचा समावेश आहे. कंपनीची तेलंगणा आणि हैदराबादमध्ये संशोधन आणि विकास केंद्रे आहेत, जी ‘पेप्टाइड’ आणि ‘ऑलिगोन्यूक्लियोटाइड पोर्टफोलिओ’चा विस्तार करण्यावर आणि स्नायू शोष, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, ‘कोलेस्टेरॉल’सारख्या क्षेत्रांसाठी औषधे विकसित करतात. कंपनीने जागतिक स्तरावर ५७० हून अधिक स्वामित्व हक्क (पेटंट) दाखल केले असून त्यापैकी ३०० मंजूर झाले आहेत. नॅटको दरवर्षी तिच्या निव्वळ विक्रीच्या सुमारे ८ टक्के संशोधन आणि विकासावर खर्च करते.
उत्पादन पाइपलाइन आणि विस्तारीकरण
कंपनीच्या अमेरिकी पोर्टफोलियोमध्ये ऑन्कोलॉजी, मधुमेह, वजन व्यवस्थापन आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग यासारख्या गंभीर उपचारात्मक क्षेत्रांचा समावेश आहे. गेल्या वर्षी नॅटको फार्माच्या कॅनेडियन उपकंपनीने ‘झेनोट्रान्सप्लांटेशन’वर लक्ष केंद्रित करणाऱ्या अमेरिकी बायोटेक फर्म ‘इ-जेनेसिस’ मध्ये ८० लाख डॉलरची गुंतवणूक केली होती.
जुलै २०२५ मध्ये नॅटको फार्मा लिमिटेडने (नॅटको) दक्षिण आफ्रिकेतील ‘ॲडकॉक इंग्राम होल्डिंग्ज लिमिटेड’मधील (एएचआयएल) ३५.७५ टक्के हिस्सा खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. १८९० मध्ये दक्षिण आफ्रिकेत स्थापन झालेली ‘एआयएचएल’ ही एक औषध कंपनी आहे, जी प्रिस्क्रिप्शन, ग्राहक, ओटीसी आणि रुग्णालये या चार विभागांमध्ये कार्यरत आहे. ‘एआयएचएल‘’कडे जेनेरिक आणि ब्रँडेड फॉर्म्युलेशनपासून ते क्रिटिकलकेअर हॉस्पिटल उत्पादने आणि ग्राहक आणि होमकेअर उत्पादने अशा विविध उत्पादनांचा पोर्टफोलिओ आहे. ‘एआयएचएल’मधील उपरोक्त हिस्सा खरेदी करण्यासाठी नॅटकोने देय असलेली एकूण रक्कम २,००० कोटी रुपये आहे. हा व्यवहार ३१ डिसेंबर २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या अधिग्रहणामुळे नॅटकोला दक्षिण आफ्रिकेच्या बाजारपेठेत प्रवेश मिळू शकेल. यामुळे मध्यम कालावधीत नॅटकोसाठी तुलनेने जास्त भौगोलिक विविधता येण्याची अपेक्षा आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘रोश’ आणि नॅटको फार्माच्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च न्यायालयाने नॅटकोला ‘रिस्डिप्लम’ हे जेनेरिक औषध भारतीय बाजारात आणण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे ‘एसएमए’ (‘स्पायनल मसक्युलर अस्ट्रोफी’) आजारासाठी उपलब्ध उपचार अधिक स्वस्त व व्यापक रूढीतील होण्याची अपेक्षा आहे. याचा मोठा फायदा नॅटकोला होईल.
कंपनीचे मार्च २०२५ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात ४,४३० कोटी रुपयांच्या उलाढालीवर १,८८५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमवला होता. उलाढाल ११ टक्के तर नफ्यात ३६ टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीचे जून २०२५ साठी संपलेल्या तिमाहीत १,२२१ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ४०७ कोटीचा नक्त नफा कामावला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील तिमाहीच्या तुलनेत तो केवळ ५ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीचे सहामाही आर्थिक निष्कर्ष अजून जाहीर व्हायचे आहेत. सध्याच्या ८२५ रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेली नॅटको एक प्रदीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक ठरू शकते.
शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
नॅटको फार्मा लिमिटेड (बीएसई कोड ५२४८१६)
प्रवर्तक: व्ही सी नन्नपनेनी
वेबसाइट: https://www.natcopharma.co.in/
बाजारभाव: रु. ८२०/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: फार्मास्युटिकल
भरणा झालेले भाग भांडवल: रु. ३५.८२ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ४९.५६
परदेशी गुंतवणूकदार १५.५२
बँक / म्युच्युअल फंड/ सरकार ५.८१
इतर/ जनता २९.११
पुस्तकी मूल्य: रु. ४२५
दर्शनी मूल्य: रु.२/-
लाभांश: ३००%
प्रति समभाग उत्पन्न: रु. १०५
किंमत उत्पन्न गुणोत्तर: ८.६५
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३३
डेट इक्विटी गुणोत्तर: ००
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ९५
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (ROCE): ३२.८
बीटा : ०.८
बाजार भांडवल: रु. १४,७०० कोटी (मिडकॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १५०५/६६०
गुंतवणूक कालावधी: ३६ महिने 
अजय वाळिंबे 
stocksandwealth@gmail.com
• हा लेख एक अभ्यासपूर्ण विवेचन असून गुंतवणूक सल्ला नव्हे.
• प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
• लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.
