फंड योजनेचा ‘एक्स्पेन्स रेशो’ बघून त्यामध्ये गुंतवणूक करणे हे किती योग्य आहे? –    अनिमेष
समाजमाध्यमातून आणि त्यातही विशेषतः रीलच्या माध्यमातून गेल्या काही काळात फंडाचा ‘एक्स्पेन्स रेशो’ बघून गुंतवणूक करावी किंवा नाही यासंबंधी जोरदार माहिती प्रसारित केली जात आहे, कदाचित तुम्हाला त्यामुळेच हा प्रश्न पडला असावा. फंड योजनांची किंमत म्हणजेच एका फंडाच्या योजनेचे युनिट किती रुपयाला मिळणार? हे त्याच्या ‘नेट ॲसेट व्हॅल्यू’ म्हणजेच ‘एनएव्ही’वर अवलंबून असते. कोणताही म्युच्युअल फंड नवी योजना बाजारात आणतो तेव्हा बहुतांश वेळा त्याची ‘एनएव्ही’ दहा रुपये इतकी असते. जसजशी फंडाची कामगिरी सुधारू लागते, फंडाने केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य वाढू लागते तसतशी ‘एनएव्ही’सुद्धा वाढू लागते व हीच वाढीव ‘एनएव्ही’ म्हणजेच आपले वाढलेले उत्पन्न होय. या ‘एनएव्ही’बरोबरच फंड योजनेच्या माहितीमध्ये एक आकडा दिलेला असतो तो म्हणजे ‘एक्स्पेन्स रेशो’.
फंड चालवणे ही खर्चीक प्रक्रिया असते. फंड योजनेचे निधी व्यवस्थापक आणि अन्य कार्यालयीन कामकाजासाठीचा कर्मचारीवर्ग, फंड योजनांचे विपणन- जाहिरात खर्च अशा खर्चाचे प्रमाण अंदाजे किती असेल ते फंडाने ठरवून दिलेले असते. म्हणजेच थोडक्यात तुमचे पैसे वाढवण्याचा जो काय खर्च येतो, तो तुमच्याच गुंतवणुकीतून वसूल केला जातो. अगदी सुरुवातीला म्हणजे वीस वर्षांपूर्वी हा अडीच टक्के इतका असायचा. ज्या फंड विक्रेत्याच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक केलेली असते त्याला देण्याचे ‘कमिशन’सुद्धा धरले आहे. जसे म्युच्युअल फंडाचे बाजार क्षेत्र अधिकाधिक स्पर्धात्मक होत गेले तसतसे भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने याबद्दलचे नियम बदलले. आता फंडांचा ‘एक्स्पेन्स रेशो’ कमी ठेवणे हे म्युच्युअल फंड घराण्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.
‘डायरेक्ट’ आणि ‘रेग्युलर’ योजना यातील फरक ओळखा

म्युच्युअल फंड योजनासंबंधी कोणत्याही माहितीपत्रकाचे वाचन केल्यास त्यात तुम्हाला दोन योजना दिसतील एक ‘डायरेक्ट’ आणि दुसरा ‘रेग्युलर’. त्यातील ‘रेग्युलर’ योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करता याचाच अर्थ तुम्ही कोणत्या तरी गुंतवणूक सल्लागाराच्या माध्यमातून गुंतवणूक केलेली आहे. गुंतवणूक सल्लागार म्हणूया किंवा म्युच्युअल फंड योजना विक्रेता म्हणूया, यांच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक केली. याचा अर्थ तुम्ही त्या विक्रेत्याचे ‘कमिशन’ दिले आहे व ते तुमच्या ‘एनएव्ही’मध्ये जोडले गेले आहे. याउलट जर तुम्ही ‘डायरेक्ट’ योजनेमध्ये गुंतवणूक केली म्हणजेच तुम्ही कोणत्याही गुंतवणूक मार्गदर्शकाशिवाय थेट म्युच्युअल फंड कंपनीबरोबर व्यवहार करत आहात असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच तुम्ही कोणालाही विक्रीसाठीचे ‘कमिशन’ देणे हा प्रश्नच निर्माण होत नाही. अशा वेळी ‘डायरेक्ट’ योजनेची ‘एनएव्ही’ ही ‘रेग्युलर’ योजनेपेक्षा निश्चितच कमी असते. थोडक्यात, थेट गुंतवणूक केल्याने तुम्हाला फायदा होतो.

‘एक्स्पेन्स रेशो’ची मर्यादा कमी

मागील प्रश्नोत्तरांमध्ये आपण ‘ॲक्टिव्ह’ आणि ‘पॅसिव्ह फंडा’विषयी माहिती घेतली आहे. ‘पॅसिव्ह म्युच्युअल फंडा’त निधी व्यवस्थापन करण्यातील आव्हाने कमी असतात. म्हणूनच तेथे ‘एक्स्पेन्स रेशो’ आपोआपच कमी असतो. याउलट ‘ॲक्टिव्ह फंडा’त निधी व्यवस्थापकाचे काम अधिक जोखमीचे असल्याने ‘एक्स्पेन्स रेशो’ हा अधिक असतो. एखाद्या फंडाचा ‘एक्सपेन्स रेशो’ कमी म्हणजे तो फंड उत्तम असे नव्हे!

फंडाची तीन ते पाच वर्षांतील कामगिरी कशी आहे? याचा गुंतवणूकदारांनी विचार करायला हवा. फंडाच्या उत्कर्ष काळातील कामगिरीबरोबरच जेव्हा बाजारात घसरण होते, तेव्हा पडत्या काळात फंडाने किती ‘डाऊन साइड प्रोटेक्शन’ दिले आहे? म्हणजेच बाजार सरासरी १२ टक्क्यांनी पडला असला तरी फंडाचा परतावा हा त्यापेक्षा सरस असतो का? हा विचार केला गेला पाहिजे. म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ त्याच्या परताव्यावर ठरतो ‘एक्स्पेन्स रेशो’वर नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बऱ्याचदा नामांकित निधी व्यवस्थापकाचे सतत चांगला परतावा देणारे फंड स्वस्तातले असतीलच असे नाही. पण त्याचा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये समावेश केल्यास होणारा फायदा मात्र निश्चितच मोठा असेल.