दिवाळी नुकतीच आटपून आम्ही सगळे पसारा आवरायला बसलो. फराळाचे डबे थोडे थोडे रिकामे होऊ लागले होते. ते लवकरच धुऊन माळ्यावर जाणार, हे ठरलेलं होतंच. तेव्हा स्वयंपाकघर आठवड्याभरातच नेहमीसारखं होईल ही खात्री होती. पण मोठा प्रश्न होता तो मिळालेल्या भेट वस्तूंचं काय करावं याचा.
दिवाळीतील ‘गिफ्टिंग’ हे एकीकडे आनंद देणारं असतं तर दुसरीकडे पसाऱ्याला आमंत्रण देणारंसुद्धा असतं. उपयोगी वस्तू मिळाली की बरं वाटतं. परंतु अनेकदा असं होतं की, गरजेच्या नसणाऱ्या वस्तू मिळतात आणि त्या एक तर कधीतरी वापरू म्हणून माळ्यावर ठेवल्या जातात किंवा इतर कुणाला तरी दिल्या जातात. नुसतं दिवाळीला असं होतं का? नाही, हे प्रत्येक सणाला, घरातील मोठ्या कार्यक्रमाला, वाढदिवसाला असं होतं.
ज्या घरांमध्ये सुबत्ता नांदत आहे, तिथे तर अक्षरशः या सर्वांची गरजच नसते. परंतु सणानिमित्त काहीतरी द्यावं म्हणून खरेदी केली जाते आणि वेळ आणि पैसे दोन्ही वाया जातात. वाढदिवस आणि पार्ट्यांमध्ये ‘गिफ्ट’ आणि ‘रिटर्न गिफ्ट’ यासारख्या गोष्टी तर बऱ्याच हाताबाहेर चालल्या आहेत. या गोष्टीवर थोडा जास्त विचार व्हावा असं मला वाटलं आणि म्हणून आजचा हा लेख.
आजच्या भौतिकवादी जगात, विचारपूर्वक निवडलेली आर्थिक भेटवस्तू कोणत्याही ‘ट्रेंडी इलेक्ट्रॉनिक’ वस्तूपेक्षा किंवा ऐशो-आरामाच्या, दिखाऊपणाच्या वस्तूपेक्षा अधिक मौल्यवान आणि अर्थपूर्ण असू शकते. आर्थिक भेटवस्तू देणे म्हणजे केवळ सणावाराला पैसे देणं एवढंच नाहीये. यामध्ये एखाद्याच्या गरजेनुसार, त्याला योग्य स्वरूपात मदत करणे.
योग्यवेळी योग्य व्यक्तीस मालमत्ता हस्तांतरित करणे हेसुद्धा येतं. याचं मूळ ध्येय पिढ्यानपिढ्या संपत्ती निर्माण करणे, आर्थिक साक्षरता वाढवणे आणि आपल्या प्रियजनांचे दीर्घकालीन कल्याण सुनिश्चित करणं आहे. तरुण प्रौढांपासून ते स्थिर उत्पन्नाची गरज असलेल्या वृद्ध नातेवाईकांपर्यंत, सुनियोजित आर्थिक भेटवस्तूचा सखोल आणि कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो आणि म्हणूनच, या उदारतेवर काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.
सर्वात आधी आर्थिक भेटवस्तू देण्यामागील तत्त्वज्ञान समजून घेऊ या. आर्थिक भेटवस्तू एखाद्या प्रिय व्यक्तीच्या भविष्यातील गुंतवणुकीचे प्रतिनिधित्व करतात, ज्यामुळे तिच्यासाठी एक मजबूत आर्थिक पाया तयार करता येऊ शकतो. मग ती व्यक्ती आपली नातेवाईक असू शकते किंवा पूर्णपणे तिऱ्हाईतसुद्धा असू शकते. आर्थिक भेटवस्तू देताना स्पष्ट हेतू आणि सामायिक कौटुंबिक मूल्यांद्वारे मार्गदर्शित केली जाते, ज्यामुळे भविष्यातील कलह टाळण्यास मदत होते आणि भेटवस्तूचा उद्देश पूर्ण होईल याची खात्री होते. पिढ्यानपिढ्या जमवलेली किंवा एका पिढीने उपभोगून उरलेली संपत्ती जेव्हा पुढील पिढीला योग्यरीत्या मिळते तेव्हा अशा संपत्तीचा सकारात्मक परिणाम खऱ्या अर्थाने उपभोगता येऊ शकतो.
या प्रक्रियेत भेटवस्तू मिळणाऱ्याला सामील करून, त्यांना अंदाजपत्रक, गुंतवणूक आणि बचतीच्या सवयी यासारख्या आर्थिक तत्त्वांबद्दल शिकवता येतं. तरुणांसाठी, आर्थिक भेटवस्तू ही प्रेरणादायी ठरू शकते, जी त्यांना त्यांच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवण्यास आणि स्वातंत्र्याच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू करण्यास प्रोत्साहित करू शकते.
जेव्हा आर्थिक भेटवस्तू देण्याचा प्रश्न येतो, तेव्हा प्रत्येक देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. भेटवस्तू ही देणाऱ्यासाठी आणि घेणाऱ्यांसाठी उपयोगी, कालमानानुसार, गरजेनुसार असेल तरंच तिच्यातून खरा फायदा होतो. घेणाऱ्याला आज गरज आहे, पण देणारा ५ वर्षांनी देणार असेल तर त्याचा काहीच उपयोग नाही.
रोख रक्कम, रोखे किंवा इतर मालमत्तेचे थेट हस्तांतरण हा आर्थिक भेटवस्तू देण्याचा सर्वात सोपा प्रकार आहे. रोख रकमेऐवजी तुम्ही दीर्घकालीन वाढीची क्षमता असलेल्या मालमत्तांची भेट देऊ शकता. डीमॅट खात्याचा वापर करून शेअर आणि म्युच्युअल फंड, रोखे हे भेट स्वरूपात देऊन प्रियजनांना वैविध्यपूर्ण गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करण्यास मदत होऊ शकते.
आपल्या प्रिय व्यक्तीला त्यांच्या भविष्यातील शिक्षणासाठी निधी पुरवण्यासाठी मदत करण्याचा एक शक्तिशाली मार्ग असू शकतो. इथे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि सुकन्या समृद्धीची खाती उघडून त्यात आपल्या अपत्यासाठी किंवा नातवंडांसाठी पैसे जमा करता येऊ शकतात. मोठ्या आर्थिक भेटवस्तूंसाठी, खासगी ट्रस्ट जास्त उपयोगी आणि कर कार्यक्षम असतात. धर्मादाय संस्था, शैक्षणिक संस्था यामध्ये चांगल्या पद्धतीने मालमत्तेचा वापर करून हवी तशी मदत गरजवंताला करू शकतात.
आर्थिक भेटवस्तू देण्याच्या करविषयक परिस्थितीचा मागोवा घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. कर संदर्भातील नियम आधीच समजून घेतले की देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला नंतर त्रास होत नाही. आपल्याकडे, ५० हजार रुपायांपेक्षा जास्त भेटवस्तू रक्ताची नाती सोडून इतरांसाठी ‘इतर स्रोतांकडून मिळणारे उत्पन्न’ या शीर्षकाखाली करपात्र असतात. व्यक्तीच्या लग्नाच्या प्रसंगी मिळणाऱ्या भेटवस्तू पूर्णपणे करमुक्त असतात.
स्थावर मालमत्ता भेट देताना त्यावर मुद्रांक शुल्क भरावे लागते, हे लक्षात ठेवा. तेव्हा हा खर्चसुद्धा लक्षात घ्यायला हवं. भेट दिलेल्या मालमत्तांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कोण कर भरणार हेसुद्धा नीट समजून घ्यावं.
हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, जरी एखाद्या नातेवाईकाने दिलेली भेटवस्तू प्राप्तकर्त्यासाठी करमुक्त असली, तरी त्या मालमत्तेतून मिळणारे भविष्यातील कोणतेही उत्पन्न करपात्र असू शकते. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला १० लाख रुपये भेट म्हणून दिले आणि त्यांनी ते निश्चित ठेवीमध्ये गुंतवले, तर त्या ठेवीवर मिळणारे व्याज तुमच्या उत्पन्नाशी जोडले जाऊ शकते आणि तुमच्या हातात कर भरला जाऊ शकतो.
प्राप्तिकर अधिकाऱ्यांकडून त्रास टाळण्यासाठी, विशेषतः मोठ्या भेटवस्तूंसाठी, योग्य कागदपत्रे ठेवणे आवश्यक आहे. नोंदणीकृत भेटवस्तू दस्तऐवज व्यवहाराचा पुरावा म्हणून काम करू शकतो आणि स्रोताचा पुरावा देऊ शकतो, जो प्राप्तिकर विभागाने चौकशी केल्यास महत्त्वपूर्ण ठरू शकतो.
भेटवस्तूचा उद्देश आणि तिच्या जबाबदार व्यवस्थापनाबद्दलच्या तुमच्या अपेक्षांबद्दल भेट घेणाऱ्याबरोबर, विशेषतः लहान मुलांशी खुलेपणाने आणि प्रामाणिकपणे संवाद साधणे महत्त्वाचे आहे. स्पष्ट संवाद हा यशस्वी आर्थिक भेटवस्तू देण्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. तुमचे हेतू समजावून सांगून मग ती भेटवस्तू शिक्षणासाठी असो, घरासाठीची देय रक्कम असो किंवा दीर्घकालीन गुंतवणूक असो, तर तुमच्या इच्छेनुसार तो निधी वापरला जाईल. यामुळे भविष्यात कुटुंबातील सदस्यांमधील वादही टाळता येऊ शकतात.
कदाचित तुम्ही देऊ शकणारी सर्वात चिरस्थायी भेट म्हणजे आर्थिक साक्षरता. गुंतवणुकीची निवड करण्याच्या प्रक्रियेत आणि करकायदे समजून घेण्याच्या प्रक्रियेत तुमच्या प्रियजनांना सामील करून, तुम्ही त्यांना अशी कौशल्ये सक्षम करत आहात, जी त्यांना आयुष्यभर उपयोगी पडतील. आर्थिक साक्षरता योग्य पद्धतीने पसरवायचा हा एक चांगला मार्ग आहे.
कायमस्वरूपी वारसा निर्माण करण्यासाठी आर्थिक भेटवस्तू हे एक शक्तिशाली साधन आहे. हे तुम्हाला तुमच्या प्रियजनांच्या भविष्यात गुंतवणूक करण्यास, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना देण्यास आणि तुमची मूल्ये हस्तांतरित करण्यास मदत करतं. कायदेशीर आणि करविषयक परिस्थिती हाताळण्यासाठी विचारशील आणि माहितीपूर्ण दृष्टिकोन आवश्यक आहे.
उपलब्ध असलेली विविध धोरणे समजून घेऊन, कराच्या परिणामांची जाणीव ठेवून आणि भेट घेणाऱ्याबरोबर उघडपणे संवाद साधून, तुम्ही हे सुनिश्चित करू शकता की, तुमच्या आर्थिक भेटवस्तू केवळ तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठीच नव्हे तर त्यांचे जीवन अत्यंत अर्थपूर्ण मार्गाने समृद्ध करतील. ज्या जगात भौतिक मालमत्ता क्षणभंगूर आहे, त्या जगात आर्थिक सुरक्षा आणि शहाणपणाची देणगी ही येणाऱ्या पिढ्यांसाठी जपून ठेवली जाईल.
तृप्ती राणे, सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार.
trupti_vrane@yahoo.com
