प्रश्न- ‘एसडब्ल्यूपी’ नक्की कोणत्या वयोगटासाठी आदर्श योजना आहे? माझे वय २८ वर्षे असून मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहे. माझ्यासाठी ही योजना फायदेशीर ठरेल का? – केदार

उत्तर- म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणाऱ्या बऱ्याच जणांना आता ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ म्हणजेच ‘एसआयपी’. याविषयी सांगण्याची गरज उरलेली नाही. मात्र याच्या अगदी विरुद्ध दिशेने काम करणाऱ्या एका रणनीतीची माहिती देणे आवश्यक आहे. ‘एसआयपी’च्या माध्यमातून दर महिन्याला एक ठरावीक रक्कम म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये गुंतवत असतो. जसजसे त्याचे परतावे वाढतात तसे, आपल्या पोर्टफोलिओचे मूल्यांकन वाढते. म्हणजेच संपत्ती निर्मितीसाठी याचा वापर नक्कीच केला जातो. पण ज्यांना निवृत्ती पश्चात निवृत्तिवेतनाची सुविधा नाही त्यांनी कमावलेले पैसे शिस्तबद्ध पद्धतीने कसे वापरावे हे समजत नाही, त्यांच्यासाठी ‘सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन’ फायदेशीर ठरतो.

एका उदाहरणाने समजून घेऊ.

एखाद्या व्यक्तीकडे म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून बरीच वर्षे गुंतवलेले किंवा एकरकमी गुंतवण्यासाठी तयार असलेले ५० लाख रुपये आहेत. वर्ष २०३० मध्ये ‘एसडब्ल्यूपी’ सुरू करायचा विचार आहे आणि दर महिन्याला २५ हजार रुपये वापरण्यासाठी काढायचे आहेत. जर १५ वर्षांसाठी असे नियोजन करायचे असेल तर तुम्ही एकूण ४५ लाख रुपये वापरण्यासाठी काढाल आणि उरलेले पैसे दर वर्षाला आठ टक्के दराने वाढतील, असे धरले तर त्याचा निधी वेगळा तयार होईल.

‘एसडब्ल्यूपी’ नेमका कोणत्या वयोगटासाठी?

प्रश्न विचारणारी व्यक्ती अवघ्या २८ वर्षे वयाची असल्याने ‘एसडब्ल्यूपी’ ही त्या व्यक्तीची गरज नाही. याउलट ‘एसआयपी’च्या माध्यमातून अधिकाधिक पैसे गुंतवून ते सेवानिवृत्तीच्या नंतर वापरण्यासाठी साठवणे ही रणनीती असायला हवी.

‘एसडब्ल्यूपी’ कधी करता येते?

तुमच्या दर महिन्याच्या मासिक खर्चाचा आढावा घेतल्यास आणि तो खर्च दरवर्षी किती रुपयांनी वाढेल, हे गृहीत धरल्यास तुम्हाला ‘एसडब्ल्यूपी’ची रक्कम ठरवता येते. समजा दर वर्षाला तुम्ही काढून घेत असणारे पैसे पाच टक्क्याने वाढणार असतील तर, तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य नक्कीच त्यापेक्षा जास्त दराने वाढले पाहिजे. म्हणजेच पहिली अट अशी की, तुमची मुद्दल भरपूर असले पाहिजे, ज्यायोगे दीर्घकाळासाठी ‘एसडब्ल्यूपी’ सुरू ठेवता येईल. नाहीतर २० लाख रुपये ‘एसडब्ल्यूपी’साठी साठले असतील. त्यातून दर महिन्याला तीस हजार रुपये काढून घ्यायला सुरुवात केली तर, पाच वर्षातच २० लाखाचे ७.५ लाखच उरणार आहेत, म्हणजेच ‘एसडब्ल्यूपी’ जास्त वर्षे सुरू ठेवता येणार नाही.

दुसरी अट ‘एसडब्ल्यूपी’साठी जो निधी जमवला आहे, तो रोखे संलग्न फंडामध्ये ठेवला तर त्यावर अंदाजे आठ टक्क्यापर्यंत परतावा मिळतो. याउलट तो हायब्रीड इक्विटी फंड किंवा इक्विटी फंडात असेल तर तुमचा निधीसुद्धा वाढत राहतो, ज्यायोगे तुम्हाला जास्त वर्षांपर्यंत पैसे वापरता येतात.

‘एसडब्ल्यूपी’चे नियोजन कोणत्या वर्षी सुरू करावे?

साधारणपणे गुंतवणूक फळाला येण्यासाठी दहा वर्षाचा कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे तुमचे निवृत्तीचे वय काय असणार आहे, यावरून तुम्हाला सुरुवात कधी करायची याचा निर्णय घेता येईल. आजकालच्या तरुण वर्गाला साठीपर्यंत काम करण्यात रस नसून लवकरच सेवानिवृत्त होऊ या अशा प्रकारचे विचार व्यक्त होण्यास सुरुवात झाली आहे. त्या परिस्थितीत वयाच्या चाळिशीतच दरमहा बारा हजार रुपये पंधरा वर्षासाठी समभाग संलग्न योजनेमध्ये गुंतवले आणि त्यावर १२ टक्के परतावा मिळेल, असे अपेक्षित धरले तर ५५ वर्ष वय होईपर्यंत ६० लाख रुपयापर्यंत रक्कम जमते आणि हीच रक्कम पुढे ‘एसडब्ल्यूपी’ या माध्यमातून वापरता येऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘एसडब्ल्यूपी’साठी आधी ‘एसआयपी’ हवी हे सूत्र विसरू नका.