जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (बीएसई कोड ५४०७५५)

प्रवर्तक: भारत सरकार

संकेतस्थळ : http://www.gicre.in/en/

बाजारभाव: रु. ३८६/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: विमा / पुनर्विमा

भरणा झालेले भाग भांडवल: रु. ८७७.२० कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ८२.४०

परदेशी गुंतवणूकदार २.१२

बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार १३.२९

इतर/ जनता १५.४९

पुस्तकी मूल्य: रु.३५१

दर्शनी मूल्य: रु.५/-

लाभांश: २००%

प्रति समभाग उत्पन्न: रु. ४८.८०

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ७.९१

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३९.५

डेट इक्विटी गुणोत्तर: ००

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: —

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (आरओसीई): १५.६

बीटा : १.४

बाजार भांडवल: रु. ६६,७६४ कोटी (लार्ज कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ५२६/३४५

गुंतवणूक कालावधी: ३६ महिने

‘जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ ही सरकारी कंपनी पुनर्विमा व्यवसायातील सर्वात मोठी भारतीय कंपनी आहे. स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ५५ भारतीय विमा कंपन्या आणि सामान्य विमा व्यवसाय करणाऱ्या ५२ विमा कंपन्यांच्या उपक्रमांचा ताबा घेतला. पुढे नोव्हेंबर १९७२ मध्ये, भारत सरकारने वरील संस्थांची देखभाल करण्यासाठी ‘जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ची (जीआयसी) स्थापना केली, ज्यांचे विलीनीकरण ४ कंपन्यांमध्ये करण्यात आले. म्हणजे नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड, द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांचा त्यात समावेश आहे. ‘जीआयसी’ ही नियामक प्राधिकरणाकडे नोंदणीकृत आणि भारतीय भांडवली बाजारामध्ये सूचिबद्ध असलेली एकमेव भारतीय पुनर्विमा कंपनी आहे. भारतीय पुनर्विमा बाजारात ‘जीआयसी’चा वाटा सुमारे ५१ टक्के असून कंपनी दहाव्या क्रमांकाची जागतिक पुनर्विमा कंपनी आहे. देशांतर्गत पुनर्विमा बाजारपेठेत एक प्रभावी पुनर्विमा कंपनी म्हणून ‘जीआयसी’ भारतीय बाजारपेठेतील थेट सामान्य विमा कंपन्यांना पुनर्विमा प्रदान करते.

वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ : कंपनी अग्निशमन (मालमत्ता), सागरी, मोटार, अभियांत्रिकी, शेती, विमानचालन/अंतराळ, आरोग्य, दायित्व, पत आणि वित्त आणि आयुर्विमा यांसारख्या अनेक व्यवसाय क्षेत्रात पुनर्विमा प्रदान करते. भारतातील ५९ सामान्य आणि आयुर्विमा कंपन्यांना थेट पुनर्विमा देते. मालमत्ता, शेती, दायित्व, मोटार आणि आरोग्य हे ‘जीआयसी’चे प्रमुख व्यवसाय विभाग आहेत.

आंतरराष्ट्रीय उपस्थिती: कंपनीची उपस्थिती सुमारे १३७ देशांमध्ये आहे. आफ्रो-आशियाई प्रदेशासाठी तिचा पुनर्विमा उपाय भागीदार आहे. सार्क देश, आग्नेय आशिया, आखाती देश आणि आफ्रिकेतील अनेक विमा कंपन्यांच्या पुनर्विमा कार्यक्रमांचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय ग्राहकांना सुलभ प्रवेशयोग्यता, कार्यक्षम सेवा आणि तयार केलेले पुनर्विमा उपाय देण्यासाठी, ‘ जीआयसी’ने यूके, रशिया, यूएई आणि मलेशियामध्ये कार्यालये उघडली आहेत.

उत्पादन मिश्रण – एकूण प्रीमियम

अग्नि – २९ टक्के

कृषी – १७ टक्के

आरोग्य – २० टक्के

मोटर – १५ टक्के

जीवन – ४ टक्के

विविध इतर -१५ टक्के

कंपनीचे एकूण गुंतवणूक पुस्तकी मूल्य १,१०,००० कोटी रुपये असून त्यापैकी स्थिर उत्पन्न सिक्युरिटीज सुमारे ७४.१९ टक्के आहेत आणि इक्विटी गुंतवणूक १६.९६ टक्के आहे. एकूण बाजारमूल्य सुमारे १,५४,२६३ कोटी रुपये असून इक्विटी पोर्टफोलिओचे बाजार मूल्य ८१,६२८ कोटी रुपये आहे. कंपनीने मार्च २०२५ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात ४९,९४१ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ७,४३२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमवला होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तो ११ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीचे जूनअखेर सरलेल्या तिमाहीची कामगिरी उत्तम आहे. या कालावधीत कंपनीने १४,६२३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २,५३१ कोटीचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील तिमाहीच्या तुलनेत तो तब्बल ८१ टक्के अधिक आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात रिइन्शुरन्स प्रीमियम अर्थात पुनर्विमा ९९,००० कोटींवर जाईल अशी अपेक्षा आहे. भारतासारख्या देशात अजूनही विम्याचे प्रमाण खूपच कमी आहे. मात्र वाढता मध्यमवर्ग पाहता, २०३५ पर्यंत सुमारे १०० कोटी नागरिक विमा कवच घेतील, अशी अपेक्षा आहे. सध्याच्या ३७५-३८० रुपयांच्या आसपास असलेला ‘जीआयसी’चा शेअर एक आकर्षक गुंतवणूक ठरू शकते.

शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो. म्हणून प्रत्येक मंदीत टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

– अजय वाळिंबे

stocksandwealth@gmail.com