Benefits of Investing in Gold आजचा सोन्याचा दहा ग्रॅमचा बाजारभाव जवळपास रु. १,२२,००० इतका आहे जो गेल्यावर्षी या सुमारास सुमारे रु.७६,००० इतका होता थोडक्यात केवळ एक वर्षात रु.४६,००० इतकी वाढ झाली आहे . एकूणच जागतिक अस्थिरता पाहता नजीकच्या भविष्यात सोन्याचे भाव वाढतच राहतील, असे जाणकारांचे मत आहे. साहजिकच आता सामान्य गुंतवणूकदारसुद्धा सोन्यात गुंतवणूक करण्याचा प्राधान्याने विचार करीत आहे. असे असले तरी नव्या पिढीला दागिन्याचा फारसा सोस नाही, शिवाय सोने घरात ठेवणे जोखमीचे वाटते कारण आजकाल बहुतांश पतीपत्नी कामाच्या निमित्ताने घराबाहेर असतात अशा वेळी सोन्यात गुंतवणूक तर करायची पण चोरीस जाण्याची भीती पण नाही असा एक सुरक्षित पर्याय आता उपलब्ध आहे पण बऱ्याच जणांना याबाबत फारशी माहिती नाही.
आजकाल डिजिटल गोल्ड तसेच पेपर गोल्ड मध्ये अगदी सहजगत्या गुंतवणूक करता येते व ती प्रामुख्याने गोल्ड म्युचुअल फंड , गोल्ड ईटीएफ व गोल्ड एफडी/ गोल्डबाँड या पद्धतीने करता येते. अशा प्रकारे केलेल्या गुंतवणुकीमुळे गुंतवणूक सुरक्षित तर राहतेच शिवाय सोन्याच्या सातत्याने वाढत असलेल्या भावामुळे गुंतवणुकीतून चांगला परतावासुद्धा मिळविता येतो. त्यादृष्टीने आपण गोल्ड म्युचुअल हा सोन्यातील गुंतवणुकीसाठी एक अगदी उत्तम पर्याय आहे. यात कशी गुंतवणूक करता येते व अशा प्रकारची गुंतवणूक कशी सोयीस्कर असते, हे आपण प्रश्नोत्तर स्वरुपात समजून घेऊ.
गोल्ड म्युचुअल फंड म्हणजे काय ?
गोल्ड म्युच्युअल फंड हा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा सुरक्षित व उत्तम पर्याय आहे, यातील गुंतवणूक प्रत्यक्ष सोने (फिजिकल गोल्ड) न घेता सोने तसेच सोन्याशी सबंधित असलेल्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्मध्ये गुंतवणूक केली जाते. यामध्ये गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ), गोल्ड मायनिंग कंपन्यांचे शेअर्स या सारख्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्चा समावेश असतो.यामुळे गुंतवणूकदाराला प्रत्यक्ष सोने खरेदी तसेच संग्रह न करता सोन्यातील गुंतवणुकीचा लाभ घरत येतो.
गोल्ड म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्याचे काय फायदे आहेत ?
प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याच्या तुलनेत, गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे निश्चितच फायदेशीर आहे, कारण यासाठी तुम्हाला डिमॅट खाते उघडण्याची आवश्यकता नाही. शिवाय घरात अथवा लॉकरमध्ये सोने ठेवावे लागत नाही. कारण घेतलेले सोने हे डिजीटल स्वरुपात असल्याने सुरक्षिततेचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच गुंतवणूकीस फिजिकल सोन्याप्रमाणेच तरलता (लिक्विडीटी) असते म्हणजे केव्हाही घेतलेले सोने बाजारभावाने विकत येते. यात एकरकमी तसच एसआयपी पद्धतीने गुंतवणूक करता येते.
गोल्ड म्युचुअल फंडाची कामगिरी सोने बाजाराशी कशी निगडीत असते?
गोल्ड म्युच्युअल फंडाचा एनएव्ही सोन्याच्या बाजारातील किंमतीनुसार कमी अधिक होत असतो. कारण यातील गुंतवणूक गोल्ड ईटीएफ तसेच सोन्याशी सबंधित असलेल्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्मध्ये गुंतवणूक केली जाते. यामध्ये गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ), गोल्ड मायनिंग कंपन्यांचे शेअर्स या सारख्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्चा समावेश असतो.

गोल्ड म्युचुअल फंडातील गुंतवणुकीवर कर आकारणी कशी केली जाते?
यावरील कर आकारणी गुंतवणुकीच्या कालावधीनुसार केली जाते. उदा: विक्री २ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीनंतर केली असेल आणि यातून नफा झाला असेल तर तो लाँग टर्म कॅपिटल गेन असेल व त्यावर १२.५% या दराने कर आकारणी केली जाईल, इंडेक्ससेशनचा फायदा मिळणार नाही. याउलट जर २ वर्षांच्या आत विक्री केली असेल व यातून नफा झाला असेल तर तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असेल व त्यावर सबंधित करदात्याच्या टॅक्स स्लॅबनुसार कर आकारणी केली जाईल.
गोल्ड म्युचुअल फंडाच्या युनिट्सच्या तारणावर सोने तारण कर्ज मिळू शकते का?
होय मिळू शकते , मात्र त्यासाठी आपले आपले म्युचुअल फंड युनिट्स डीमॅट स्वरुपात असणे आवश्यक असते. विशेष म्हणजे आपण गोल्ड म्युचुअल फंडाचे युनिट्स आपल्या डिमॅट खात्यात घेऊ शकता, यामुळे दरमहा आपल्या डिमॅट खात्याच्या स्टेटमेंटमध्ये याचा आपल्याला सहज तपशील उपलब्ध होतो.