HRA Exemption Salary Structure Rules मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत, जे स्वतःचे घर विकत घेऊ शकत नाहीत किंवा जे कर्मचारी दुसऱ्या गावातून किंवा शहरातून नोकरीनिमित्त कामाच्या ठिकाणी येतात ते घरभाड्यापोटी मोठी रक्कम खर्च करतात. जे करदाते नोकरी करतात त्यांच्या पगारात ‘घरभाडे भत्त्याचा’ (एचआरए) समावेश असतो, तो पगाराचाच एक भाग मानला जातो. या घरभाडे भत्त्यामुळे करदात्याचा कर वाचू शकतो. हा घरभाडे भत्ता करपात्र आहे परंतु काही अटींची पूर्तता केल्यास हा घरभाडे भत्ता अंशतः किंवा पूर्णपणे करमुक्त असतो.
वजावट कोण घेऊ शकतो?
घरभाडे भत्त्याची वजावट फक्त पगारदार कर्मचारी असेल तरच मिळते. जे नोकरी करत नाहीत त्यांना प्राप्तिकर कायद्याच्या अंतर्गत कलम १० (१३ए) नुसार घरभाडे भत्त्याची वजावट मिळत नाही.
ही वजावट घेण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे :
- कर्मचाऱ्याच्या पगारात ‘घरभाडे भत्त्या’चा समावेश असला पाहिजे. पगारात घरभाडे भत्त्याचा समावेश
नसेल तर करदाता त्याची वजावट घेऊ शकत नाही. - पगारदार भाड्याच्या घरात रहात असला पाहिजे आणि तो घर मालकाला घरभाडे देत असला पाहिजे.
- करदाता स्वतःच्या घरात रहात असेल तर त्याला या कलमानुसार वजावट मिळत नाही, घरभाडे भत्ता पूर्णपणे
करपात्र आहे. - करदाता नवीन करप्रणालीनुसार कर भरत असेल तर त्याला घरभाडे भत्त्याची वजावट मिळत
नाही.
घरभाडे भत्त्याच्या वजावटीसाठी कागदपत्रांची पूर्तता :
विवरणपत्र दाखल करतांना करदात्याला कोणतेही कागदपत्र दाखल करावे लागत नाहीत, परंतु घरभाडे
भत्त्याची वजावट घेण्यासाठी करदात्याकडे खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहे. प्राप्तिकर खात्याकडून
विचारणा झाल्यास ही कागदपत्रे सादर करावी लागतात.
- घरभाडे भरलेल्या पावत्या,
- घरभाडे करार,
- घरमालकाचा पॅन – जर घरभाडे दरवर्षी १ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर बंधनकारक, घरमालकाकडे पॅन नसल्यास तसे सांगणारे स्वघोषणापत्र.
घरभाडे उत्पन्नाची वजावट घेऊन उद्गम कर :
कर्मचाऱ्याने आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला फॉर्म १२बीबी मध्ये उद्गम करासाठी (टीडीएस) करण्यात येणाऱ्या करबचतीची गुंतवणूक आणि खर्च याची माहिती मालकाला देणे आवश्यक असते. वजावटी विचारात घेऊन मालक कर्मचाऱ्याच्या पगारावर देय कर किती आहे त्याचे गणित करून उद्गम कर कापतो. वर्षाच्या शेवटी कर्मचाऱ्याला एकूण गुंतवणूक आणि खर्चाचे पुरावे मालकाकडे सादर करावे लागतात. घरभाडे भत्त्याची वजावट
घेण्यासाठी वरील कागदपत्रे मालकाकडे सादर करावी लागतील. जर काही कारणाने मालकाने घरभाडे भत्त्याची वजावट न घेता उद्गम कर कापला असेल तर कर्मचारी विवरणपत्र दाखल करतांना ही वजावट घेऊ शकतो.
घरभाडे भत्त्याची वजावट किती मिळते?
जे कर्मचारी घरभाडे भत्त्याची वजावट घेण्यास पात्र आहेत, त्यांच्यासाठी ही वजावट खालीलप्रमाणे गणली
जाते.
१. प्रत्यक्षात मिळालेला घरभाडे भत्ता
२. महानगरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पगाराच्या ५०% आणि इतर ठिकाणी राहणाऱ्या
कर्मचाऱ्यांसाठी पगाराच्या ४०%.
३. पगाराच्या १०% पेक्षा जास्त भाडे दिलेले घरभाडे (कर्मचाऱ्याने दिलेले प्रत्यक्ष घरभाडे वजा
पगाराच्या १०%)
या तीन रकमांपैकी जी रक्कम कमी आहे त्याची वजावट करदाता घेऊ शकतो.
(यासाठी पगारामध्ये मूळ पगार- बेसिक आणि महागाई भत्त्याचा समावेश होतो, इतर भत्ते विचारात घेतले
जात नाहीत)
उदाहरणादाखल : एका कर्मचाऱ्याचा मूळ पगार ३ लाख रुपये, महागाई भत्ता २ लाख रुपये, घरभाडे भत्ता १ लाख
रुपये आणि इतर भत्ते ३ लाख रुपये आहेत, कर्मचारी मुंबई येथे भाड्याच्या घरात राहतो आणि दरमहा १०,००० रुपये
घरभाडे देतो. त्याला खालीलपैकी जी कमी रक्कम आहे ती घरभाडे भत्ता वजावट तो घेऊ शकतो :
- प्रत्यक्षात मिळालेला घरभाडे भत्ता – १,००,००० रुपये
- महानगरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पगाराच्या ५०% – (मूळ पगार- ३ लाख आणि महागाई
भत्ता २ लाख अश ५ लाखांवर ५०%) – २,५०,००० रुपये - पगाराच्या १०% पेक्षा जास्त भाडे दिलेले घरभाडे – घरभाडे (१०,००० x १२)= १,२०,००० रुपये वजा
पगाराच्या १०% (५,००,००० रुपयांच्या १०%) ५०,००० रुपये = ७०,००० रुपये
यामध्ये जी कमी आहे ती, म्हणजे ७०,००० रुपये. या उदाहरणात कर्मचाऱ्याला ७०,००० रुपयांची वजावट
मिळेल.
करदाता पालक किंवा नातेवाईकांसोबत राहताना घरभाडे भत्त्याची वजावट मिळते का?
कर्मचाऱ्याने त्याच्या पालकांना किंवा नातेवाईकांना भाडे दिले तरी घरभाडे भत्त्याची वजावट मिळू शकते. त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. भाडेकरार आणि दरमहा पैसे (शक्यतो बँकद्वारे) हस्तांतरित करून त्याची पावती घ्यावी. हे घरभाडे ज्यांना दिलेले आहे ते त्यांनी त्यांच्या “घरभाडे उत्पन्नात” दाखविले असले पाहिजे.
करदाता गृहकर्जाच्या व्याजावरील वजावट आणि घरभाडे भत्त्याची वजावट एकाच वेळी घेऊ शकतो का?
कर्मचारी स्वतःच्या घरात रहात असेल तर त्याला घरभाडे भत्त्याची वजावट मिळत नाही. परंतु कर्मचारी भाड्याच्या
घरात रहात असेल आणि घरभाडे देत असेल तर तो काही विशिष्ट अटींनुसार घरभाडे भत्ता आणि गृहकर्जाच्या
व्याजाची वजावट घेऊ शकतो. कर्मचारी एका शहरात नोकरी करत असेल आणि दुसऱ्या शहरात त्याचे घर
असेल तर तो घरभाडे भत्ता आणि गृह कर्जावरील व्याजाची वजावट घेऊ शकतो (इतर अटींची पूर्तता
केल्यास).
pravindeshpande1966@gmail.com