गेल्या वर्षी सप्टेंबर २०२४ मध्ये बाजार निर्देशांकांनी नवीन शिखर गाठल्यानंतर घसरणीस सुरुवात झाली. या घसरणीत सर्वच कंपन्यांच्या बाजारभांडवलात मोठी घसरण झाली. या घसरणीमुळे अनेक कंपन्यांच्या समभागांचे अवास्तव मूल्यांकन झपाट्याने कमी होऊन गुंतवणूक योग्य पातळीवर आल्याचे दिसत आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी, सध्या बाजारात मूल्य खरेदीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. म्युच्युअल फंड गुंतवणूकदार ‘व्हॅल्यू फंडा’च्या माध्यमातून या संधीचा फायदा घेऊ शकतात.

एचडीएफसी व्हॅल्यू फंड (एचडीएफसी कॅपिटल बिल्डर व्हॅल्यू फंड) ही अशीच एक संधी आहे. एचडीएफसी व्हॅल्यू फंड हा व्हॅल्यू फंड गटातील सर्वात जुना फंड आहे. १ फेब्रुवारी १९९४ रोजी हा फंड सेंच्युरियन क्वांटम फंड म्हणून अस्तित्वात आला. सेंच्युरियन म्युच्युअल फंडाचे झुरीचने अधिग्रहण केल्यामुळे हा फंड झुरीच इंडिया व्हॅल्यू फंड म्हणून ओळखला जाऊ लागला. झुरीच म्युच्युअल फंडाचे पुढे एचडीएफसी म्युच्युअल फंडाने अधिग्रहण केल्या पश्चात हा फंड एचडीएफसी कॅपिटल बिल्डर म्हणून ओळखला जाऊ लागला.

फंड सुसूत्रीकरणा पश्चात एचडीएफसी म्युच्युअल फंडाने या फंडाला व्हॅल्यू फंड गटात संक्रमित केले. या फंडाला १५ मार्च २०२५ पासून एचडीएफसी व्हॅल्यू फंड ही ओळख मिळाली. या फंडाने गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत त्याच्या मानदंड सापेक्ष चांगली कामगिरी केली असली तरी व्हॅल्यू फंड गटातील अनेक स्पर्धक फंडांपेक्षा कमी परतावा मिळविला आहे. फंडाची कामगिरी नवीन निधी व्यवस्थापकांच्या व्यवस्थापनाखाली सुधारली असल्याने या फंडाची शिफारस करावीशी वाटली.आनंद लढ्ढा हे या फंडाचे १ फेब्रुवारी २०२४ पासून नियुक्त निधी व्यवस्थापक आहेत.

‘निफ्टी ५०० टीआरआय’ हा या फंडाचा मानदंड आहे. या फंडाच्या गुंतवणुकीत एकूण मालमत्तेच्या किमान ५० टक्के गुंतवणूक अशा कंपन्यांमध्ये करणे सक्तीचे आहे ज्यांचे ‘ट्रेलिंग व्हॅल्यूएशन’ (किंमत-ते-प्रति समभाग कमाई/किंमत-ते-पुस्तक) ‘निफ्टी ५०० टीआरआय’मधील कंपन्यांच्या सरासरी मूल्यांकनापेक्षा कमी आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार फंडाचा पोर्टफोलिओ पीई १८.५ आहे, तर मानदंडातील कंपन्यांच्या पीईची सरासरी २४ आहे. या व्यतिरिक्त पोर्टफोलिओ बांधणीसाठी फंडाने ४ मार्गदर्शक तत्त्वे ठरविली आहेत.

(१) वाजवी मूल्यांकन असलेल्या कंपन्यांचा गुंतवणुकीत समावेश करणे

(२) ‘बॉटम अप’ रणनीतीचा अवलंब

(३) क्षेत्रीय विविधता

(४) जोखीम समायोजित परताव्याची सुसंगती राखणे

एचडीएफसी व्हॅल्यू फंडाच्या कामगिरीचा विचार केल्यास १ फेब्रुवारी १९९४ ते ३० एप्रिल २०२५ या काळात फंडाने १४.३२ टक्के दराने वार्षिक परतावा दिला आहे. मागील पंचवीस वर्षात (१ जानेवारी २००१ ते ३० एप्रिल २०२५) फंडाचा एसआयपी परतावा वार्षिक १७.९९ टक्के दराने दिला आहे. वर्ष २०१७ ते २०२२ दरम्यान फंडाची कामगिरी सामाधानकारक नव्हती. एचडीएफसी व्हॅल्यू फंड पाच वर्षांच्या कामगिरीच्या तुलनेत आदित्य बिर्ला सन लाईफ प्यूअर व्हॅल्यू आणि एचएसबीसी व्हॅल्यू निप्पॉन इंडिया व्हॅल्यू फंडासारख्या स्पर्धक फंडांच्या तुलनेत मागे पडला आहे. परंतु अलीकडच्या काळात फंडाच्या कामगिरीत सुधारणा होताना दिसत आहे.

एक आणि तीन वर्षांच्या कामगिरीत फंड क्रमवारीत बराच वर आलेला दिसतो.वर्ष २०१२च्या मिडकॅपच्या तेजीपर्यंत फंडाच्या गुंतवणुकीत मिडकॅपची मात्रा कमी होती. परंतु वर्ष २०१२ दरम्यान फंडाने मिडकॅप कंपन्यांची मात्रा ३५ टक्क्यांपर्यंत वाढविली. या वाढीव मिडकॅपच्या जोरावर २०१४ नंतर (सार्वत्रिक निवडणुकांच्या पश्चात) आलेल्या तेजीत फंडाने इतर स्पर्धक फंडांना मागे टाकले. फंडाची कामगिरीतील आघाडी २०१७ पर्यंत टिकली. वर्ष २०१७ ते २०२१ पर्यंत एचडीएफसी व्हॅल्यू फंडाची कामगिरी खालावण्याचा कल सुरूच होता. वर्ष २०२२ ते २०२५ पुन्हा कामगिरी स्पर्धकांच्या तुलनेत सुधारलेली दिसत आहे. ऑक्टोबर २०२४ पासून सातत्याने फंडाने मानदंड सापेक्ष चांगली कामगिरी केली आहे. आनंद लढ्ढा यांची नेमणूक झाल्यावर बाजाराचा कल ओळखून त्यांनी मिडकॅप स्मॉलकॅपमधील मात्रा वाढवली.

फंडाचा पोर्टफोलिओचा ५० टक्के भाग या दरम्यान मिड आणि स्मॉलकॅपने व्यापला होता. ज्या वेगाने मिड आणि स्मॉलकॅपची मात्रा वाढविली, त्याच वेगाने मुद्दल सुरक्षिततेसाठी जून २०२४ पासून कमी करण्यास सुरुवात केली. सध्या ७० टक्के लार्जकॅप आणि उर्वरित प्रत्येकी १५ टक्के मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांनी व्यापलेला आहे. बाजार मूल्यांकनानुसार कंपन्यांच्या निवडींमध्ये बदल करण्याच्या निधी व्यवस्थापकांच्या धोरणामुळे, फंडाची तीन आणि पाच वर्षांच्या कालावधीची कामगिरी मानदंड सापेक्ष पाऊन ते दीड टक्क्यांनी अधिक आहे. मागील तीन वर्षे कालावधीतील एक वर्षाच्या ‘रोलिंग रिटर्न’चा विचार करता बाजारातील उच्च अस्थिरतेमुळे कामगिरी मानदंड सापेक्ष खालावलेली दिसते. परंतु ही अल्पकालीन घसरण चिंतेचे कारण ठरू नये. या काळात बहुतेक सर्धक फंडांची कामगिरी एचडीएफसी व्हॅल्यू फंडापेक्षा खराब झाली आहे.

फंडाचा पोर्टफोलिओ वैविध्य साधणारा असून ५० ते ६० कंपन्यांचा समावेश असतो. गेल्या ३१ मार्च २०२५ रोजी एचडीएफसी व्हॅल्यू फंड पोर्टफोलिओमध्ये आयसीआयसीआय बँक (८.१२ टक्के), एचडीएफसी बँक लिमिटेड (७.६६ टक्के), भारती एअरटेल लिमिटेड (४.८९ टक्के) आणि इन्फोसिस लिमिटेड (४.१५ टक्के) या आघाडीच्या गुंतवणुका आहेत. या व्यतिरिक्त अॅक्सिस बँक (४.१३ टक्के) आणि स्टेट बँक (३.६३ टक्के) सारख्या बँकांचा समावेश आहे.बाजारातील अस्थिरता लक्षात घेता, या वर्षी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ‘कंझ्युमर नॉन-ड्युरेबल’ कंपन्यांतील हिस्सा वाढवला आहे. फंडाच्या गुंतवणुकीत नफा कमाविणाऱ्या आणि सुदृढ ताळेबंद असलेल्या कंपन्यांचा समावेश जास्त आहे. अलीकडच्या कालावधीत फंडाने रोकड सुलभ कंपन्यांत गुंतवणूक वाढविली आहे.

कमी-तरलता असलेल्या कंपन्या काही काळ अधिक परतावा देऊ शकतात. मात्र मंदीच्या सत्रात या अतरल कंपन्या गुंतवणुकीत राखल्याची किंमत गुंतवणूकदारांना मोजावी लागते. फंड सर्वच क्षेत्रात मानदंड सापेक्ष अधिक-उणे ३ टक्के गुंतवणूक करतो. फंडाने सर्व उद्योग क्षेत्रांमध्ये चांगले वैविध्य राखले आहे. एकंदरीत, हा फंड सरासरीपेक्षा जास्त जोखीम घेण्याची क्षमता असलेल्या आणि दीर्घकाळ ‘एसआयपी’ करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी योग्य फंड आहे. दुर्दैवाने या फंडाचे व्हावे तसे ‘मार्केटिंग’ झाले नाही. हा फंड एचडीएफसीच्या लार्जकॅप (जुना टॉप १००) किंवा फ्लेक्झीकॅपसारखा तीस वर्षांहून अधिक कालापासून अस्तित्वात असून देखील या फंडांची मालमत्ता या दोन फंडांच्या तुलनेत अगदीच किरकोळ आहे. एचडीएफसीच्या लार्जकॅप फ्लेक्झीकॅपपेक्षा हा फंड जुना आहे.

फंडात १ फेब्रुवारी २०२५ रोजी केलेल्या १० हजारांच्या गुंतवणुकीचे ७.३७ लाख झाले आहेत. या १ फेब्रुवारी १९९४ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत फंडाने १४.०८ टक्के परतावा दिला आहे. याच कालावधीत लार्जकॅपने ११ नोव्हेंबर १९९६ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत १७.८६ टक्के तर फ्लेक्झीकॅपने १ जानेवारी १९९५ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत १७.८६ टक्के परतावा दिला आहे. हा फंड एचडीएफसीचा सर्वात जुना फंड असूनदेखील या फंडांची मालमत्ता लार्जकॅप आणि फ्लेक्झीकॅपच्या तुलनेत अगदीच किरकोळ आहे. एचडीएफसीच्या या दोन फंडांना गुंतवणूकदारांचा जसा प्रतिसाद लाभला तसा या फंडास प्रतिसाद लाभला नाही. हा फंड गेली ३१ वर्षे नावाप्रमाणे दीर्घकालीन वित्तीय ध्येयांसाठी संपत्ती निर्मितीतील (कॅपिटल बिल्डर) एक विश्वासू साथीदार आहे, हे या निमित्ताने सांगावेसे वाटते.