भारतातील संपत्ती आणि समृद्धीचे पारंपारिक प्रतीक असलेले सोने हे फार पूर्वीपासून लोकप्रिय गुंतवणूक पर्याय आहे. अर्थसंकल्प २०२४ मध्ये सादर केलेल्या भांडवली नफ्यावरील प्राप्तिकर नियमांमधील अलीकडील बदल सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण परिणाम करणारे ठरले आहेत.

सोने, म्युच्युअल फंड, इक्विटी, रिअल इस्टेट इत्यादींसह सर्व मालमत्ता वर्गांसाठी सरकारने भांडवली नफ्यावरील प्राप्तिकर आकारणीचे नियम बदलले आहेत. सोन्याच्या विक्रीनुसार होणाऱ्या दीर्घकालीन व अल्पकालीन भांडवली नफ्यावरील प्राप्तिकराचे नियम २३ जुलै २०२४ पासून बदलले आहेत. नवीन नियम २३ जुलै २०२४ पासून म्हणजेच चालू आर्थिक वर्षापासून लागू होणार आहेत. तथापि, नवीन नियम सोन्याच्या म्युच्युअल फंड आणि गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडाला लागू होणार नसून फक्त भौतिक सोने आणि सोन्याच्या दागिन्यांना लागू आहेत. या दिवाळीत सोने खरेदी करण्यापूर्वी किंवा सोन्याच्या नाण्यात वा सोन्याच्या दागिन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी त्यावर कर आकारणीचे नवीन प्राप्तिकर नियम जाणून घेणे अगत्याचे ठरावे.

आणखी वाचा-Money Mantra : दिवाळीच्या आधी मार्केट का घसरलं?

नवीन प्राप्तिकर नियमांनुसार, जुने सोन्याचे दागिने खरेदी नंतर दोन वर्षे ठेवल्यानंतर विकल्यास होणारा भांडवली नफा दीर्घकालीन भांडवली नफा असेल. तर दोन वर्षाच्या आत विकल्यास होणारा भांडवली नफा अल्पकालीन भांडवली नफा संबोधिला जाईल. या दिवाळीत वेगवेगळ्या स्वरूपात सोने खरेदी करताना गुंतवणूकदाराने विविध पर्यायांची व करदायित्वाची खबरदारी घेणे अपेक्षित आहे.

सोन्याचे दागिने

सोन्याचे दागिने नेकलेस, कानातले, अंगठ्या इत्यादी स्वरूपात खरेदी करता येतात. जेव्हा व्यक्ती सोन्याचे दागिने खरेदी करते तेव्हा त्यावर नव्याने वाढविलेला ३% दराने वस्तू आणि सेवा कर भरावा लागतो. सोन्याच्या दागिन्यांच्या किमतीत अंतर्भूत असलेल्या मेकिंग चार्जेसवर हा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारला जातो. सोन्याचे दागिने खरेदीवर प्राप्तिकर तो नसतो. कोणतीही व्यक्ती त्याचे जुने सोन्याचे दागिने नव्या दागिन्यात बदलून घेत असेल, तर जुन्या सोन्याच्या दागिन्यांची देवाणघेवाण जुन्या सोन्याची विक्री मानली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. जुन्या सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीवर झालेल्या भांडवली नफ्यावर प्राप्तिकराचे नियम लागू होतील.

आणखी वाचा- Money Mantra : हेल्थ इन्शुरन्समध्ये CIS काय असतं? ते का महत्त्वाचं आहे?

नवीन प्राप्तिकर नियमांनुसार, जुने सोन्याचे दागिने खरेदी नंतर किमान दोन वर्षांसाठी मालकी हक्कासह ठेवल्यानंतर विकल्यास होणारा भांडवली नफा दीर्घकालीन भांडवली नफा असेल. त्यावर १२.५% ​​दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील प्राप्तिकर दर लागू होईल. तथापि, नवीन निकषानुसार पूर्वी उपलब्ध असलेला इंडेक्सेशनचा फायदा आता २३ जुलै २०२४ नंतर विकलेल्या सोने वा दागिन्यावर उपलब्ध असणार नाही. हा दर पूर्वी २०% होता तो आता हा इंडेक्सेशनचा फायदा मागे घेऊन १२.५% करण्यात आला आहे.

जर जुने सोन्याचे दागिने खरेदीच्या तारखेपासून दोन वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विकले गेले, तर होणारा भांडवली नफा अल्पकालीन भांडवली नफा मानला जाईल. त्यावर करदात्याच्या उत्पन्नावर लागू असलेल्या प्राप्तिकर स्लॅबप्रमाणे अल्पकालीन भांडवली नफ्यावर प्राप्तिकर आकारला जाईल.

डिजिटल सोने

डिजिटल सोने खरेदी आणि विक्रीवरील प्राप्तिकर कायदे भौतिक सोन्यासारखेच आहेत.

आणखी वाचा-Money Mantra: युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे काय? याचा फायदा कोणाला मिळणार आहे?

गोल्ड म्युच्युअल फंड आणि गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ)

१ एप्रिल २०२५ पासून नवीन भांडवली नफा प्राप्तिकर नियम गोल्ड म्युच्युअल फंड आणि गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडा वर लागू होतील. ३१ मार्च २०२५ पर्यंत, गोल्ड म्युच्युअल फंड आणि गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडाच्या खरेदी आणि विक्रीवर जुने भांडवली नफा कर नियम लागू होतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारने डेट म्युच्युअल फंडाच्या व्याख्येत सुधारणा केली आहे. नवीन व्याख्या १ एप्रिल २०२५ पासून अंमलात येईल. सध्या, निर्दिष्ट डेट म्युच्युअल फंडाची व्याख्या म्युच्युअल फंड म्हणून केली जाते जिथे त्याच्या एकूण उत्पन्नाच्या ३५% पेक्षा जास्त रक्कम देशांतर्गत कंपन्यांच्या इक्विटी शेअर्समध्ये गुंतवली जात नाही. सुधारित व्याख्येनुसार, म्युच्युअल फंडाचे वर्गीकरण डेट म्युच्युअल फंड म्हणून केले जाईल जेव्हा त्याच्या एकूण उत्पन्नापैकी ६५% पेक्षा जास्त रक्कम डेट आणि मनी मार्केट प्रतीभूतींमध्ये किंवा फंड-ऑफ-फंडमध्ये गुंतविली जाईल ज्यामध्ये कर्ज गुंतवणूकीची टक्केवारी समान असायला हवी.

जुन्या भांडवली नफा कर नियमांनुसार, गोल्ड म्युच्युअल फंड आणि गोल्ड ईटीएफच्या विक्रीतून मिळणारा भांडवली नफा अल्पकालीन भांडवली नफा मानला जाईल. करदात्याच्या उत्पन्नावर लागू असलेल्या प्राप्तिकर स्लॅबवर भांडवली नफ्यावर कर आकारला जाईल.

आणखी वाचा-Money Mantra: क्रेडिट कार्ड वापरताना काय काळजी घ्यावी?

गोल्ड म्युच्युअल फंड

गुंतवणुकीच्या तारखेपासून २४ महिने पूर्ण होण्यापूर्वी विकल्यास नफा अल्पकालीन भांडवली नफा मानला जाईल. करदात्याच्या उत्पन्नावर लागू असलेल्या प्राप्तिकर स्लॅबवर अल्पकालीन भांडवली नफा कर आकारला जाईल. गुंतवणुकीच्या तारखेपासून २४ महिने पूर्ण झाल्यानंतर सोन्याचा म्युच्युअल फंड विकला गेला, तर नफ्याला दीर्घकालीन भांडवली नफा असे संबोधलं जाईल. दीर्घकालीन भांडवली नफ्यावर इंडेक्सेशन लाभाशिवाय १२.५% ​​कर आकारला जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड

सूचिबद्ध गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड च्या बाबतीत, १२ महिने पूर्ण होण्यापूर्वी विकल्यास नफा अल्पकालीन भांडवली नफा मानला जाईल. करदात्याच्या उत्पन्नावर लागू असलेल्या प्राप्तिकर स्लॅबवर अल्पकालीन भांडवली नफ्यावरील प्राप्तिकर आकारला जाईल. १२ महिने पूर्ण झाल्यानंतर लिस्टेड गोल्ड ईटीएफ विकल्यास नफा दीर्घकालीन भांडवली नफा समजला जाईल. दीर्घकालीन भांडवली नफ्यावर इंडेक्सेशन लाभ मागे घेतल्याने इंडेक्सेशन लाभाशिवाय १२.५% ​​कर वसूल केला जाईल.