‘कोअर-अँड-सॅटेलाइट’ पोर्टफोलिओ ही एक गुंतवणूक रणनीती आहे, जी तुमची गुंतवणूक दोन भागांत विभागांमध्ये विभागते. कमी अस्थिर आणि साधारण वृद्धीदर असलेल्या फंडांनी बनलेला ‘कोअर’ आणि अधिक जोखीम असलेला सक्रियपणे व्यवस्थापित फंडांनी बनलेला ‘सॅटेलाइट’, अशा दीर्घकालीन परतावा असलेल्या पोर्टफोलिओला अतिरिक्त परतावा मिळवू शकणारी ही रणनीती आहे.

‘कोअर’ भाग सामान्यतः वैविध्यपूर्ण, मोठी मालमत्ता असलेले फंड किंवा ‘ईटीएफ’ने बनलेला असतो. ते ‘निफ्टी ५०’ किंवा ‘सेन्सेक्स’सारख्या मोठ्या बाजार निर्देशांकांशी संलग्न असतात. त्यामुळे पोर्टफोलिओ स्थिर परंतु विस्तृत बाजारपेठेपेक्षा अधिक परतावा देणारा असतो. तुमच्या जोखीमांकानुसार ७०-७५ टक्के गुंतवणूक ‘कोअर’मध्ये असावी.

निफ्टी १०० किंवा बीएसई १०० यांनी २७ सप्टेंबर २०२४ रोजी सर्वोच्च स्तर गाठला. गेल्या वर्षभरात विविध आर्थिक आणि भू-राजकीय कारणांनी भारतीय बाजारपेठेत मोठी घसरण झाली. ग्राहकांची मागणी कमी होत चालली आहे, भू-राजकीय तणाव आणि अमेरिकेने लादलेले आयात शुल्क या परिस्थितीमुळे सतत परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय समभागांची विक्री करीत होते.

तर भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदार खरेदी करत आहेत. ‘जीएसटी’ सुधारणा आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी २०२६ पासून नववा वेतन आयोग लागू होणे, यामुळे ग्राहकांकडून मागणी वाढण्याची शक्यता आहे. व्यापार शुल्कांबाबत रोज नव्या बातम्या येत आहेत.

सध्याची ताजी बातमी म्हणजे भारत आणि अमेरिका पुन्हा वाटाघाटीच्या स्थितीत आले आहेत. पायाभूत सुविधांवरील सरकारी खर्चात वाढ दिसून येत आहे आणि आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीत ‘जीडीपी’त चांगली वाढ झाल्याचे दिसत आहे. अमेरिकेत फेडरल रिझर्व्हने वर्षाच्या अखेरपर्यंत आणखी किमान दोन वेळा दर कपात करण्याचे जाहीर केले आहे. ही आणि इतर काही सकारात्मक बाबींमुळे बाजार सावरताना दिसत आहे.

तथापि, बाजारातील तेजीमुळे अनेक ठिकाणी मूल्यांकन वाढलेले आहे. तथापि, लार्ज-कॅप कंपन्या अजूनही वाजवी किमतीच्या वाटतात. या पार्श्वभूमीवर मध्यम जोखीम घेण्याची इच्छा असलेल्या गुंतवणूकदारांसाठी भविष्यातील तेजीचा फायदा मिळवण्यासाठी लार्जकॅप केंद्रित फोकस्ड फंड योग्य वाटतो. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फोकस्ड इक्विटी फंड (पूर्वीचा आयसीआयसीआय प्रुडेन्शियल सिलेक्ट लार्ज कॅप) हा फंड ५-७ वर्षांपेक्षा जास्त गुंतवणूक कालावधी असलेल्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे.

मे २००९ मध्ये सुरू झालेल्या या फंडाची मालमत्ता १२,९०९ कोटी आहे. वैभव दुसद हे १ जुलै २०२४ पासून या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. हा एक सशक्त आणि कारकीर्दीत सातत्य राखलेला फंड आहे. गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओच्या ‘कोअर’चा मोठा हिस्सा व्यापण्याची क्षमता असलेला हा फंड नक्कीच आहे. दीर्घकालीन कालावधीतील ‘एसआयपी’ पद्धतीने गुंतवणूक केल्यास बाजारातील अस्थिरतेवर मात करण्याव्यतिरिक्त ज्या उद्दिष्टांसाठी बचत करत आहात, ती उद्दिष्टासाठी रक्कम उभी करणे शक्य होईल.

गेल्या तीन वर्षांत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फोकस्ड इक्विटी फंडाच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. गेल्या एक, तीन, पाच आणि दहा आणि पंधरा वर्षांच्या कालावधीतील ‘पॉइंट-टू-पॉइंट’ परतावा विचारात घेतल्यास, फंडाने ‘निफ्टी ५०० टीआरआय’ सापेक्ष २.५-७ टक्क्यांनी चांगली कामगिरी केली आहे.

सप्टेंबर २०१५ ते सप्टेंबर २०२५ या पाच वर्षांच्या चलत परताव्यांमध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फोकस्ड इक्विटीची सातत्यपूर्ण कामगिरी दिसून येते, ज्यामध्ये फंडाने ‘निफ्टी ५०० टीआरआय’ला जवळजवळ ६८ टक्के वेळा कामगिरीत मागे टाकले आहे. १ ऑक्टोबर २०१५ ते ३० सप्टेंबर २०२५ या १० वर्षांच्या कालावधीतील ५ वर्षांच्या ‘रोलिंग’ परताव्यात, फंडाने सरासरी १६.९५ टक्के वार्षिक परतावा दिला आहे, जो ९४ टक्के वेळा ‘निफ्टी ५०० टीआरआय’ सापेक्ष अधिक आहे आणि ५६ टक्के वेळा १५ टक्क्यांहून अधिक आहे, तर ३०.९४ टक्के वेळा २० टक्क्यांहून अधिक आहे.

गेल्या १० वर्षांत (१ ऑक्टोबर २०१५ ते ३० सप्टेंबर २०२५) फंडात मासिक ‘एसआयपी’वर १७.८५ टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे. याच कालावधीत आणि त्याच दिवशी ‘निफ्टी ५०० टीआरआय’मध्ये ‘एसआयपी’ केली असती, तर वार्षिक परतावा १५.२७ टक्के असता. या फंडाची कामगिरी फोकस्ड फंड गटात सर्वोत्तम कामगिरी असलेल्या फंडात मोडते.

हा एक फोकस्ड फंड असल्याने या फंडाच्या गुंतवणुकीत ३० कंपन्यांचा समावेश आहे. आणि हा फोकस्ड फंड असूनदेखील आघाडीच्या केवळ ४ कंपन्यांचा गुंतवणुकीतील वाटा ५ टक्क्यांहून अधिक आहे. अन्य कंपन्यातील गुंतवणूक ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फोकस्ड इक्विटी फंड हा लार्ज-कॅप केंद्रित फंड आहे.

फंडाचा ७९.८३ टक्के भाग लार्ज-कॅपनी व्यापलेला आहे. सर्वसाधारणपणे, बाजाराच्या परिस्थितीनुसार, हे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत कमी होते. गेल्या पाच वर्षांत हे प्रमाण ७५ ते ८५ टक्के दरम्यान राहिले आहे. जसे की, जेव्हा व्यापक बाजारपेठांमध्ये तेजी असते तेव्हा (२०२३, २०२४) दरम्यान फंडाने १५-१७ टक्के गुंतवणूक मिड-कॅपमध्ये वाढविली होती. फंडाच्या शाश्वत यशासाठी चांगला निधी व्यवस्थापक असणे मूलभूत गरज आहे. विद्यमान फंड व्यवस्थापकांच्या अंगी एक चांगला निधी व्यवस्थापक होण्याची क्षमता आहे.

निधी व्यवस्थापकांनी खासगी बँकांना नेहमीच गुंतवणुकीत अव्वल स्थान दिले आहे. त्या खालोखाल माहिती तंत्रज्ञान, वाहन आणि वाहन पूरक उद्योग, आरोग्य निगा असा क्रम लागतो. २०२१ आणि २०२२ मध्ये, करोनानंतर डिजिटायझेशनची मागणी जास्त असल्याने फंडाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हिस्सेदारी वाढवली. २०२३ मध्ये, हे क्षेत्रात मंदी येऊ लागल्याने, फंडाने वाहन आणि वाहन पूरक उद्योगात गुंतवणूक वाढवली. गेल्या एका वर्षात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या किमतीत मोठी घसरण झाली.

सध्या इन्फोसिस सर्वाधिक गुंतवणूक (८.१९ टक्के) असलेली कंपनी आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मंदी असताना औषधनिर्माण क्षेत्रातील कामगिरीही मंदी झाली, त्यामुळे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फोकस्ड इक्विटीने या वर्षी पुन्हा एकदा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढविण्यास सुरुवात केली आहे. स्थावर मालमत्ता क्षेत्रातदेखील फंडाने चतुराईने गुंतवणूक वाढविली आहे. एकूणच, स्थिर कामगिरी सुनिश्चित करण्यासाठी फंड विविध उद्योग क्षेत्रांमध्ये हुशारीने गुंतवणुकीची पेरणी करत आहे. रोकड आणि कर्जरोख्यांतील गुंतवणूक साधारणपणे ३ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने हा फंड एक परिपूर्ण फंड आहे.

दीर्घकालीन दृष्टिकोनातून हा फंड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एक चांगली भर असू शकतो.

आज २७ ऑक्टोबर ज्येष्ठ कवी भा. रा. तांब्यांचा जन्मदिवस. गेले वर्ष मंदीचा दाहक चटका देणारे वर्ष होते. गेली दिवाळी ते जवळजवळ फेब्रुवारीपर्यंत बाजाराने फक्त घसरण अनुभवली. एप्रिलमध्ये अमेरिकेने आयात कराचा बडगा उगारला. अशा मिट्ट अंधारात काही फंड शुक्रताऱ्याप्रमाणे लुकलुकतांना दिसले. प्रत्येक दिवस ताब्यांच्या ‘घनी तमी शुक्र बघ राज्यकरी’ याची प्रचिती देणारा होता. त्यापैकी आजचा हा फंड ‘एसआयपी’ची शिफारस.

(वरील आकडेवारी आसीआयसीआय प्रुडेन्शियल फोकस्ड इक्विटीच्या फंडाच्या २४ ऑक्टोबर २०२५च्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’शी निगडित आहेत. )

  • वसंत कुलकर्णी