शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना दोन प्रकारचे ढोबळ गट आपल्याला आढळतात. त्यातील एक गट चांगल्या कंपन्या शोधून त्यांचा अभ्यास करून मध्यम आणि दीर्घ काळासाठी आपला ‘कोअर पोर्टफोलिओ’ तयार करतो. यातील काही गुंतवणूकदार अनेक वर्षांपर्यंत एकच शेअर न विकता त्यातून मिळणारे संपत्ती संचयाचे फायदे करून घेतात, तर काही गुंतवणूकदार बाजाराच्या चढ-उताराचा फायदा घेत शेअरमधून अल्पकालीन नफा कमवतात.
शेअर बाजारातील दुसरा गट ‘टेक्निकल ॲनालिसिस’ म्हणजेच ‘तक्त्यां’च्या आधारे विश्लेषण करून आपली गुंतवणूक रणनीती आखतो आणि त्यात पैसे कमावतो. या गटातील बरेचसे गुंतवणूकदार एका दिवसात शेअर विकत घेऊन त्याच दिवशी विकणे म्हणजेच ‘इंट्राडे ट्रेडिंग’पासून ‘फ्यूचर्स-ऑप्शन्स’ अर्थात वायदे बाजारात व्यवहार करून गुंतवणुकीचे सगळे पर्याय आजमावून पाहतात.

‘आयपीओं’ची रेलचेल

गेल्या काही वर्षांत एक तिसरा पंथ बाजारात सक्रिय होऊ लागला आहे, तो म्हणजे दिसेल त्या कंपनीच्या प्रारंभिक समभाग विक्रीमध्ये (आयपीओ) सहभागी व्हायचे आणि अत्यंत कमी कालावधीत म्हणजेच कंपनी भांडवली बाजारात सूचिबद्ध झाली की, तिच्या बाजार पदार्पणाच्या दिवशीच मिळतील तेवढे पैसे घेऊन बाहेर पडायचे म्हणजेच शेअर विकायचे ही रणनीती आखातात. आज या अनुषंगानेच ‘आयपीओ’ आणि बाजार रंग समजून घेऊ या.

कोणत्याही कंपनीचा बाजारात आयपीओ येतो याचा अर्थ कंपनीच्या व्यवसायात तुम्हाला सहभागी व्हायची संधी मिळते. तुम्ही भागधारक होता म्हणजेच कंपनीने तुम्हाला शेअर विकत घेण्याची संधी दिलेली असते. त्यावेळी तुम्ही पहिल्यांदा कंपनीचे शेअर विकत घेता. पण प्रत्येक आयपीओ हा पुढील मुद्द्यांच्या आधारे अभ्यासावा लागतो.

कंपनीचे व्यवस्थापन आणि आर्थिक स्थिती

तुम्ही ज्या कंपनीचा गुंतवणुकीसाठी विचार करत आहात, त्या कंपनीचे मागच्या दहा-पंधरा वर्षांतले वार्षिक अहवाल तुम्हाला बघायला मिळत नाहीत. फक्त निवडक वर्षांत कंपनीचा नफा किती राहिला आहे, यावरच जाहिरातींमध्ये भर दिला जातो. ज्यावेळी कंपनी शेअर बाजारात पहिल्यांदा उतरणार असते त्याच्या दोन वर्षे आधीपासूनच नफ्याचे आकडे चढे दाखवण्याची कंपनीने तयारीच केलेली असते. त्यामुळे या वरवरच्या आकडेवारीला भुलून जाण्यात काही अर्थ नाही.

कंपनीचा व्यवसाय समजून घ्या

प्रत्येक कंपनीचे पैसे कमावण्याचे तंत्र वेगळे आणि पैसे नेमके किती काळात कमावले जातील? याचा कालावधीसुद्धा वेगळा. एखादी ग्राहकोपयोगी वस्तू बनवणारी कंपनी आणि दुसरीकडे ऊर्जानिर्मिती क्षेत्रातील कंपनी यांचे नफ्याचे आकडे चांगले आहेत, म्हणजे दोन्ही कंपन्यांचे शेअर चांगले आहेत असे म्हणणे चुकीचे ठरेल. गेल्या दहा वर्षांत भारतात या स्वरूपाच्या ज्या छोट्या तंत्रज्ञान आधारित कंपन्या उतरल्या त्यांचे व्यवसाय क्षेत्र डिजिटल क्रांतीमुळे कमी कालावधीतच वाढले. त्यामुळे बाजारात त्यांचे आयपीओ आल्यानंतर गुंतवणूकदारांनी गर्दी केली. गेल्या काही वर्षांत बाजारात पदार्पण केलेल्या निम्म्याहून अधिक कंपन्यांचे समभाग हे आयपीओच्या माध्यमातून दिलेल्या किमतीपेक्षासुद्धा खाली गेले आहेत. तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांचा विस्तार खूप मोठा झाला असला तरी काहींना अजूनही नफा कमवता आलेला नाही.

नावात काय आहे ?

एखाद्या कंपनीचे नाव आणि त्याच्या नफ्याचा फारसा संबंध नसतो. पन्नास वर्षांपासून कार्यरत असलेल्या उत्तम दर्जाच्या कंपन्यांचा आयपीओ जेव्हा बाजारात येतो, त्यावेळी दोन महिन्यांतच २० टक्के घसरलेला पण दिसतो. याचे कारण कंपन्यांचा इतिहास कंपन्यांच्या भविष्यातल्या नफ्याशी ताळमेळ घालणारा नसला तर बाजारात आपटी बसतेच.

कंपन्यांचे नफ्याचे प्रमाण आणि रोकड

काही कंपन्यांचे नफ्याचे आकडे अचानकपणे वाढलेले दिसतात, तेव्हा नवीन गुंतवणूकदारांनी आपल्याला ही कंपनी सलगपणे दहा वर्षे व्यवसायात स्थिर राहील असे वाटते का? हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे

‘आयपीओ’ची माहिती कुठून मिळते?

सध्याच्या काळात वर्तमानपत्र आणि मासिके यापेक्षा समाजमाध्यमांवर शेअर बाजाराची चर्चा अधिक खमंगपणे रंगते असे दिसून येते. ‘शॉर्ट व्हिडीओ’ आणि ‘रील’ यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना जे चित्र दिसते, ते आहे त्यापेक्षा फुगवून सांगितलेले आहे? की खरोखरचे वास्तव आहे? हे समजून घेण्याची इच्छा नसते किंवा माहितीसुद्धा. प्रत्येक कंपनी ज्यावेळी बाजारात प्रवेश करते त्यावेळी मसुदा प्रस्ताव हा दस्ताऐवज प्रसिद्ध केला जातो. कंपनीचे सध्याचे गुंतवणूकदार कोण? त्यापैकी प्रवर्तक कोण? परदेशी गुंतवणूकदारांचा कंपनीत किती हिस्सा आहे? नेमके शेअर कोण विकणार आहे? कंपनीवर किती कर्ज आहे? कंपनी कोणत्या कायदेशीर कचाट्यात सापडली आहे की नाही याविषयीची इत्थंभूत माहिती प्रसारित केली जाते. याबरोबरीनेच आयपीओमधून उभारलेला निधी कंपनी कशासाठी वापरणार आहे, याचासुद्धा आराखडा त्यात दिलेला असतो. जर तुम्ही एका कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे लावणार असाल आणि त्यातून उभे केलेले बहुतांश सगळे पैसे प्रवर्तक आणि त्यांच्या जुन्या गुंतवणूकदारांना कंपनीतून बाहेर पडण्यासाठी वापरले जाणार असतील तर शंका घ्यायला निश्चित वाव आहे.

किती पट प्रतिसाद मिळाला यावर फायदा ठरतो का?

एखाद्या कंपनीच्या आयपीओला वीस पट प्रतिसाद मिळाला म्हणजे जेवढे शेअर कंपनी गुंतवणूकदारांना द्यायला तयार होती त्यापेक्षा २० पटीने अधिक मागणी नोंदवली गेली. याचा अर्थ कंपनीचे शेअर जेव्हा शेअर बाजारात सूचिबद्ध होईल त्यावेळी शेअर नक्की वर जाईल याची कोणतीही खात्री देता येत नाही किंबहुना बऱ्याच वेळा यामध्ये आठवड्याभरात किंवा महिन्याभरात शेअर गटांगळ्या खाताना दिसतो !

कंपन्या आयपीओ केव्हा आणतात ?

ज्यावेळी बाजारात लिक्विडिटी असते म्हणजेच पैसा खेळता असतो, भविष्याबद्दलचे संकेत सकारात्मक असतात आणि एकूणच वातावरण उत्साही असते अशा वेळी कंपन्यांना आपला हेतू साध्य करण्यासाठी उत्तम वेळ मिळते. सध्याच्या आर्थिक स्थितीत अमेरिकी प्रशासनाने लावलेले निर्बंध अजून किती काळ टिकतात? त्याचा आपल्या आयात-निर्यातीवर किती परिणाम होतो? भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात ‘जीडीपी’ची वाढ पुढील सहा महिने नेमकी कशी असेल ? याचा अंदाज लावणे कठीण आहे. अशा वेळी बाजारात येणारी आयपीओची लाट तुम्हाला स्वार होण्यासाठी आहे का त्यात गटांगळ्या खाण्यासाठी हे ठरवले पाहिजे.

आयपीओ आणि जाहिरातबाजी

कंपन्यांना आपला बाजारातील हिस्सा काबीज करण्यासाठी प्रसिद्धी मिळवावी लागते, त्यासाठी नवनवीन क्लृप्त्या लढवून कंपन्या आमचे व्यवसाय भविष्यात कसे वाढणार आहेत? याचे नफ्याचे आकडे हे तुमच्या मनावर बिंबवू इच्छितात. अशा वेळी थंड डोक्याने कंपनीचा ताळेबंद (बॅलन्स शीट) आणि नफा-तोटा पत्रक (प्रॉफिट अँड लॉस) या आकड्यांकडे बघणे आवश्यक आहे. कंपनीचे भविष्यातील मनसुबे स्वप्नवत वाटत आहेत? की ते सत्यात उतरण्याची खरोखरच क्षमता आहे ? याचा विचार केल्याशिवाय पैसे गुंतवायला जाऊ नका.