माझे वय ६१ वर्षे असून सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले आहे. म्युच्युअल फंडात नव्याने गुंतवणूक करण्याची इच्छा आहे. इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे माझे वय लक्षात घेता योग्य आहे का? नसल्यास कोणता पर्याय सुचवता येईल? म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आणि वय यांच्यातील संबंधाचा विचार केल्यास या दोन मुद्द्यांव्यतिरिक्त आणखी एक मुद्दा समोर येतो, तो म्हणजे ‘जोखीम घेण्याची क्षमता.’ कोणती म्युच्युअल फंड योजना माझ्यासाठी चांगली आहे? हा विचार करण्याऐवजी माझे गुंतवणुकीचे निकष लक्षात घेऊन मी कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंड योजनेत पैसे गुंतवायला पाहिजेत? हा विचार तुम्ही केला पाहिजे.
तुम्ही दिलेल्या माहितीनुसार, सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाला असल्यामुळे तुम्हाला निवृत्तिवेतनाचा लाभ होत असणार हे गृहीत धरून पुढचे विश्लेषण करता येईल.
ज्येष्ठ नागरिक या वयोगटासाठी गुंतवणूक करताना माझ्या दृष्टीने चार घटक महत्त्वाचे आहेत. तुमची आरोग्य स्थिती, कुटुंबातील सदस्य आणि तुमच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या, तुम्हाला मिळणारे दर महिन्याचे स्थिर उत्पन्न आणि तुम्ही याआधी केलेली गुंतवणूक. जर तुमच्याकडे सेवानिवृत्ती वेतन हा हक्काचा पैशाचा स्रोत असेल आणि त्यातून किमान तुम्हाला तुमचे स्वतःचे मासिक खर्च भागवता येतील असे गृहीत धरल्यास जर त्यातूनही रक्कम उरत असेल तर म्युच्युअल फंड योजनांमध्ये अवश्य गुंतवणूक सुरू करता येईल. म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि ती कोणत्या वयात सुरू करायची? याचा कोणताही नियम नाही किंवा त्यासाठी कोणतीही पूर्वअटही नाही.
तुम्ही सरकारी सेवेत असल्याने याआधी कोणत्या अन्य गुंतवणुका केल्या आहेत? त्यावर तुमची जोखीम घेण्याची क्षमता ठरेल. बहुधा सरकारी नोकरीत असलेल्यांना भत्ते आणि अन्य लाभ मिळत असल्यामुळे त्यांच्या गुंतवणुकी होत असतात. तुम्हीसुद्धा पोस्ट ऑफिस योजना, बँकांतील मुदत ठेवी किंवा विमा कंपन्यांच्या बचत आणि विमा अशी एकत्र सुविधा देणाऱ्या उत्पादनांमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुमच्याकडे कमी जोखीम असलेल्या गुंतवणुकी आहेत, असे मानून अधिक जोखीम असलेल्या गुंतवणूक योजनांमध्ये हळूहळू गुंतवणूक सुरू करता येईल.
ज्येष्ठ नागरिकांना म्युच्युअल फंड हा दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी महत्त्वाचा पर्याय म्हणून आवडणार आहे. कारण आता आयुर्मान वाढल्यामुळे पैशाची गरज कायमच असणार आहे. भविष्यातील आजारपणे आणि तत्सम खर्च पाहता फक्त ‘डेट’ गुंतवणुकींवर अवलंबून राहणे चालणार नाही. तुम्ही याआधी म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केली नाही, असे म्हटले असल्यामुळे सर्वप्रथम म्युच्युअल फंड योजनांचे वेगवेगळे प्रकार कोणते असतात याची माहिती करून घ्या. सुरुवात करताना ‘हायब्रिड इक्विटी’ आणि ‘लार्जकॅप इक्विटी’ या दोन योजनांमध्ये हळूहळू पैसे गुंतवा. जर तुमचे मासिक खर्च भागवण्यासाठी तुमच्या जुन्या गुंतवणुकी पुरेशा असतील आणि तुमचे निवृत्तिवेतन शिल्लक राहत असेल तर जास्त जोखीम नक्कीच घेता येईल. अशा स्थितीत मिडकॅप आणि लार्जकॅप या फंड योजनांमध्ये गुंतवणूक सुरू करा.
सेवानिवृत्तीच्या वेळी एखादी मोठी रक्कम मिळाली असेल तर कमी वेळात भरपूर पैसे कमावता येतील, अशा लोभापाई ‘इक्विटी फंडां’मध्ये अल्पकाळासाठी पैसे गुंतवणे चुकीचे आहे. तुमचा आरोग्य विमा नसेल तर तुम्हाला एक ठरावीक रक्कम कमी जोखीम असलेल्या योजनांमध्ये गुंतवावी लागेल. ही रक्कम ‘डेट’ पर्यायामध्ये गुंतवू शकता.
‘इक्विटी’ हा पर्याय मध्यम ते दीर्घ काळासाठी अत्यावश्यक आहे. कारण ज्या वेळी महागाई वाढेल, त्या वेळी त्यापेक्षा अधिक वेगाने परतावा देणाऱ्या इक्विटी योजना तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असायला हव्यात. ज्येष्ठ नागरिकांनी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरू करताना कायम ‘रिस्कोमीटर’ बघायला विसरू नये. आपण ज्या फंड योजनेत गुंतवतो आहे त्या फंड योजनेची जोखीम पातळी आपल्या जोखीम पातळीशी जुळते आहे की नाही? हे पडताळून घेऊन मगच गुंतवणूकविषयक निर्णय घ्यावा.
‘इक्विटी फंड’ हे फक्त तरुणांसाठी आहेत असे नाही तर ‘सेकंड इनिंग’मध्ये तुमच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी ‘इक्विटी’ योजनांचा नक्कीच फायदा होणार आहे.