आज अश्विन शुद्ध प्रतिपदा. आपल्याला लहानपणापासून विद्येची देवता सरस्वती आणि समृद्धीची देवता लक्ष्मी आहे, असे शिकविले जाते. सरस्वतीच्या माध्यमातून लक्ष्मीची पूजा करणे म्हणजे कष्टाने कामाविल्या पैशाचे योग्य नियोजन करणे. नियमित पैशाची बचत करणे, ‘एसआयपी’ खंडित न करणे नियमित पोर्टफोलिओचा आढावा घेणे आणि कोणते फंड गुंतवणुकीसाठी निवडावे ही सरस्वतीची उपासना होय. आज घरोघरी नवरात्रीचे घट बसत आहेत. सर्व गुंतवणूकदारांना नवरात्रीच्या शुभेच्छा. देवी महालक्ष्मीची आपल्या सर्वांवर कृपा राहो या सदिच्छेसह आज आपण तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओत ‘फ्लेक्झीकॅप’ फंड का महत्त्वाचे आहेत, हे समजावून घेऊ. ‘फ्लेक्झीकॅप’ हा समभाग गुंतवणूक करणारा आणि गुंतवणुकीसाठी कायम खुला असलेला (ओपन-एंडेड ) म्युच्युअल फंडाचा एक महत्त्वाचा फंड प्रकार आहे. ‘फ्लेक्सीकॅप’ हा समभाग गुंतवणूक करणारा सर्वात मोठा फंड गट आहे. ताज्या आकडेवारीनुसार, ‘फ्लेक्झीकॅप’ फंड गटाची मालमत्ता ४.३५ लाख कोटी आहे.

सर्वात मोठा सक्रिय व्यवस्थापित फंड हा ‘फ्लेक्झीकॅप’ आहे. या फंड प्रकारात फंड व्यवस्थापक प्रत्येक बाजार भांडवली गटात गुंतवणूक करतो. या फंड प्रकारात मालमत्ता विभागणीवर नियामकांनी कोणतेही बंधन घातलेले नाही. फंडाच्या पोर्टफोलीओत लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांचे प्रमाण ठरविण्याची लवचीकता फंड व्यास्थापकास असते. या फंडांना त्यांच्या एकूण मालमत्तेपैकी किमान ६५ टक्के मालमत्ता समभाग आणि समभाग संलग्न साधनांमध्ये गुंतवण्याचे बंधन फंड व्यास्थापकास असते. तर उर्वरित मालमत्ता रोखे, रोख रक्कमेच्या रूपात ठेवता येते किंवा इतर रोकड सदृश्य साधनांमध्ये गुंतवता येते. फंड व्यवस्थापक प्रचलित बाजार परिस्थिती आणि भांडवली लाभाच्या संधीनुसार बाजार भांडवलीकरणात वेगाने बदल करतात.
फंडाचा मानदंड का महत्त्वाचा आहे?

विशिष्ट म्युच्युअल फंडाचा मानदंड (बेंचमार्क निर्देशांक) हा असा पूर्व निश्चित निर्देशांक असतो, ज्याच्या आधारे त्या फंडाच्या कामगिरीचे मोजमाप करण्याचा प्रयत्न करते. उदाहरणार्थ, निफ्टी १०० निर्देशांकात बाजार भांडवलीकरणानुसार पहिल्या १० कंपन्यांचा समावेश आहे. हा तो निर्देशांक आहे, ज्याच्याआधारे अनेक लार्जकॅप फंडांची कामगिरी जोखली जाते. सक्रिय व्यवस्थापित लार्जकॅप फंडाचा फंड व्यवस्थापक या मानदंडाला अनुकूल रणनीती आखेल. ‘निफ्टी१००’ या निर्देशांकात असलेल्या उद्योग क्षेत्रातील कंपन्यांचा पोर्टफोलिओमध्ये समावेश करेल. उद्योग क्षेत्रांचे पोर्टफोलिओमध्ये उद्योग क्षेत्राचे आणि पर्यायाने कंपन्यांचे पोर्टफोलिओतील प्रमाण कमी जास्त करेल. त्या कंपन्या जास्तीतजास्त कामगिरी करतील, असा प्रयत्न करेल. सर्व म्युच्युअल फंडांना ज्या निर्देशांकाच्या आधारे त्यांची कामगिरी मोजली जाईल, असा मानदंड (निर्देशांक) घोषित करणे भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने बंधनकारक केले आहे. आणि ही माहिती योजना फंडाच्या माहिती दस्तऐवजात (स्कीम इन्फोर्मेशन डॉक्युमेंट) नमूद करणे फंड घराण्यांना सक्तीचे आहे.

वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांच्या कामगिरीचे मूल्यांकन करताना ‘बेंचमार्किंग’ हे एक उपयुक्त साधन आहे. म्युच्युअल फंडाने मिळवलेल्या उत्पन्नाच्या तुलनेत किती चांगले कामगिरी केली आहे, याचे मूल्यांकन करण्यासाठी मानदंड एक संदर्भ म्हणून वापरतात. तुमची गुंतवणूक जर सक्रिय व्यवस्थापित फंडात असेल तर त्या फंडाने मानदंड सापेक्ष चांगली कामगिरी करणे अपेक्षित असते. फंडाच्या कामगिरीचे मूल्यांकन करून तुम्ही तुमच्या फंडाच्या कामगिरीचे मूल्यांकन करू शकता. जर परतावा मानदंडपरताव्यापेक्षा जास्त असेल तर फंडाची कामगिरी उत्कृष्ट मानली जाते. याउलट, जर फंडाची कामगिरी मानदंड सापेक्ष कमी असेल तर फंड कमी कामगिरी करणारा मानला जातो. याव्यतिरिक्त, गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी दीर्घ कालावधीत म्युच्युअल फंडाच्या मानदंड सापेक्ष कामगिरीचे मूल्यांकन करणे हिताचे ठरते. फंडाचा अल्पकालीन परतावा अस्थिर असू शकतो, अल्पकालीन परताव्यावर विसंबून फंड निवड केली तर तुमचा निर्णय चुकू शकतो. फंड घराणे मानदंड निर्देशांकांची निवड बाजार भांडवलीकरण, फंडाची गुंतवणूक, यासारख्या घटकांचा विचार करून ठरविला जातो. कमी जोखीम घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी लार्ज-कॅप फंड योग्य ठरतात तर स्मॉल आणि मिड-कॅप फंड हे अस्थिरता पचनी पडलेल्या अनुभवी गुंतवणूकदारांसाठी अधिक योग्य ठरतात. जे उच्च पातळीची जोखीम घेण्यास तयार असतात.

‘फ्लेक्सीकॅप’ फंड कसे काम करतात?

बहुसंख्य ‘फ्लेक्झीकॅप’ फंडांचा मानदंड बीएसई ५०० किंवा निफ्टी ५०० असतो. हे दोन्ही फंड लार्जकॅपकडे झुकलेले आहेत. बाजारातील परिस्थितीनुसार फंड व्यवस्थापक लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांचे प्रमाण ठरावीक पट्ट्यात कमी-जास्त करतात. ‘फ्लेक्झीकॅप’ फंड तेजीच्या काळात उच्च वाढ आणि अस्थिर काळात जोखीम कमी करण्याचे काम करतात. फंड व्यवस्थापक आर्थिक कामगिरी, उद्योगाचा कल आणि वृद्धी सक्षम आधारित कंपन्या निवडतात, ज्यामुळे विविध उद्योग क्षेत्रांमध्ये वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार होतो. गुंतवणूकदार म्हणून, जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेता तेव्हा त्यात विविध कंपन्यांच्या समभागांचा एक पोर्टफोलिओत गुंतवणूक करता.

फंड व्यवस्थापक संशोधन आणि विश्लेषणाच्या आधारे हा पोर्टफोलिओ तयार करतो. तुमचा पोर्टफोलिओ निष्क्रियपणे व्यवस्थापित केला असेल, तर तो स्थापित निर्देशांकावर आधारित असतो आणि म्हणून कंपन्यांच्या निवडीला वाव नसतो. सक्रियपणे व्यवस्थापित पोर्टफोलिओच्या बाबतीत, फंड व्यवस्थापक पोर्टफोलिओचे घटक निश्चित करून पोर्टफोलिओ तयार करतो. म्युच्युअल फंड व्यवस्थापकांना नियामक मार्गदर्शक तत्त्वांनुसार नियामकांनी तयार केलेली मानके लक्षात घेऊन पोर्टफोलिओ आरेखित करावा लागतो. गुंतवणूकीची उद्दिष्टे, धोरणे, जोखीम, व्यवस्थापन खर्च आणि गुंतवणुकीचा परीघ विचारात घेऊन पोर्टफोलिओ निश्चित केला जातो. गुंतवणूकदारांना या तपशिलांचे आणि नियमांची माहिती वेळोवेळी दिली जाते. याबाबतची सर्व कागदपत्रे वेळेवर नियामकांना सादर केली जातात आणि नियमांचे पालन केले जाते, याची खात्री म्युच्युअल फंडांचा अनुपालन विभाग करतो. फंडाचे कामकाज ‘सेबी’सारख्या नियामक संस्थांनी ठरवलेल्या नियमांनुसार होते. गुंतवणूकदाराने पैसे गुंतविल्यापासून ते पैसे काढून घेईपर्यंत सर्व पैलूंचा समावेश असतो.

सारांश : ‘फ्लेक्सीकॅप’ फंडांमध्ये प्रत्येक बाजार भांडवली गटात गुंतवणूक करता येते. लार्ज, मिड आणि स्मॉलकॅप कंपन्यांत गुंतवणूक करण्याची लवचीकता लार्जकॅप कंपनी समभागांच्या तुलनेत अधिक परतावा आणि मिडकॅपपेक्षा कमी अस्थिरता असल्याने ‘फ्लेक्झीकॅप’ हा तुमच्या पोर्टफोलिओचा महत्त्वाचा घटक ठरतो. तुमच्या पोर्टफोलिओचा मोठा हिस्सा या फंड गटातील एक किंवा दोन फंडात असायला हवा.

(लेखक द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यचालन अधिकारी आहेत. लेखातील मते त्यांची वैयक्तिक आहेत.)