जुनी आणि नवीन करप्रणालीचा पर्याय आल्यानंतर करदात्यांच्या मनातील संभ्रम मात्र वाढला आहे. नवीन करप्रणालीनुसार उत्पन्न गणताना आणि कर भरताना कोणत्या वजावटी मिळतात, कोणत्या मिळत नाहीत हे समजून घेणे गरजेचे आहे. राहत्या घराच्या गृहकर्जाच्या व्याजावरील वजावट नवीन करप्रणाली स्वीकारल्यास मिळत नाही परंतु भाड्याने दिलेल्या घराच्या गृहकर्जावरील व्याजाची वजावट नवीन करप्रणाली स्वीकारल्यानंतरसुद्धा घेता येते.

प्रश्न : माझ्याकडे दोन घरे आहेत. एका घरात मी राहतो आणि दुसरे मी भाड्याने दिले आहे. या दोन्ही घरांवर मी गृहकर्ज घेतले आहे. मला गृहकर्जाच्या व्याजाची किती वजावट मिळेल? मी नवीन करप्रणाली स्वीकारल्यास मला वजावट मिळेल का?

Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
Can weight loss drugs prevent heart attacks
वजन कमी करण्याचे हे औषध हृदयविकाराचा झटका टाळू शकते का? Semaglutide बाबत काय सांगतात डॉक्टर?
Hindus and Sikhs in the neighbouring countries will not benefit from CAA
‘सीएए’मुळे शेजारी देशांतील हिंदू, शिखांचेही भले होणार नाहीच…
  • विकास शिंदे

उत्तर : आपल्याकडील दोन घरांपैकी जे घर आपले राहते घर आहे, त्याचे घरभाडे शून्य समजले जाते. त्यावर आपल्याला कमाल दोन लाख रुपयांपर्यंत गृहकर्जावरील व्याजाची वजावट मिळेल. जे घर भाड्याने दिले आहे त्या घराच्या गृहकर्जावरील प्रत्यक्ष व्याजाची वजावट आपल्याला मिळेल. दुसऱ्या घराचे उत्पन्न, मालमत्ता कर, प्रमाणित वजावट, आणि व्याजाची वजावट विचारात घेऊन आलेले उत्पन्न (किंवा तोटा) हे दोन्ही मिळून उत्पन्न नकारात्मक (म्हणजेच “तोटा”) असेल तर फक्त दोन लाख रुपयांचा तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येईल आणि तो पूर्ण वजा न झाल्यास पुढील वर्षासाठी कॅरी-फॉरवर्ड करता येईल. ही तरतूद आपण जुनी करप्रणाली स्वीकारल्यास लागू होईल. आपण नवीन करप्रणाली स्वीकारल्यास आपल्याला राहत्या घरावर मिळणारी २ लाख रुपयांच्या व्याजाची वजावट मिळणार नाही. परंतु दुसऱ्या घरावरील, जे भाड्याने दिले आहे, गृहकर्जाच्या व्याजाची वजावट आपण नवीन करप्रणाली स्वीकारली तरी मिळते.

हेही वाचा – Money Mantra: क्रेडिट कार्डाचे किती प्रकार असतात?

प्रश्न : मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. माझ्या उत्पन्नात निवृत्तिवेतन आणि व्याजाचा समावेश आहे. या दोन्ही उत्पन्नावर उद्गम कर (टीडीएस) कापला जातो. दरवर्षी मी विवरणपत्र दाखल करताना बाकी देय कर जुलैमध्ये भरतो. या वर्षी जानेवारी, २०२४ मध्ये मी एक निवासी प्लॉट विकला यावर मला २५ लाख रुपयांचा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा झाला या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी गुंतवणूक न करता मी कर भरण्याचे ठरविले आहे. मला मार्चमध्ये अग्रिम कर भरावा लागेल का?

  • अरविंद काळे

उत्तर : ज्येष्ठ नागरिकांच्या उत्पन्नात “उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नाचा” समावेश नसेल तर त्यांना अग्रिम कराच्या तरतुदी लागू होत नाहीत. त्यांना विवरणपत्र दाखल करण्याच्या मुदतीपूर्वी कर भरल्यास व्याज भरावे लागत नाही. आपल्या उत्पन्नात “उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नाचा” समावेश नसल्यामुळे आपल्याला अग्रिम कर भरावा लागणार नाही.

प्रश्न : मी पुण्यात एक सदनिका ८० लाख रुपयांना खरेदी करणार आहे. ज्या व्यक्तीकडून मी सदनिका खरेदी करणार आहे, ती व्यक्ती अनिवासी भारतीय आहे. मला या खरेदीवर उद्गम कर किती आणि कसा कापावा लागेल आणि भरावा लागेल?

  • कृष्णा सावंत

उत्तर : निवासी भारतीयाकडून ५० लाख रुपयांपेक्षा (करार मूल्य किंवा मुद्रांक शुल्कानुसार मूल्य) जास्त रकमेची स्थावर मालमत्ता खरेदी करताना १ टक्के उद्गम कर कापावा लागतो. आपण घर अनिवासी भारतीयांकडून खरेदी करत असल्यामुळे ही तरतूद लागू होत नाही. अनिवासी भारतीयांसाठी ही ५० लाख रुपयांची मर्यादा लागू होत नाही. अनिवासी भारतीयाकडून मालमत्ता घेताना कलम १९५ नुसार उद्गम कर कापावा लागेल. या कलमानुसार अनिवासी भारतीयाला या घर विक्रीतून झालेल्या भांडवली नफ्यावर प्राप्तिकर कायद्यानुसार जो कर देय आहे तेवढी रक्कम मालमत्ता खरेदी करणाऱ्याला उद्गम कर म्हणून कापून ती सरकारकडे जमा करावी लागते. अनिवासी भारतीयाने या विक्रीवर कोणत्या प्रकारचा (अल्पमुदत किंवा दीर्घमुदत), किती भांडवली नफा झाला आणि यावर उद्गम कर किती कापावा याचे प्रमाणपत्र प्राप्तिकर अधिकाऱ्याकडून घेणे अपेक्षित आहे आणि त्याप्रमाणे घर खरेदी करणाऱ्याला उद्गम कर कापावा लागतो. असे प्रमाणपत्र न घेतल्यास संपूर्ण विक्री किमतीवर (फक्त भांडवली नफ्यावर नव्हे) कराच्या सर्वोच्च दराने उद्गम कर कापावा लागेल. आपण अनिवासी भारतीयाकडून घर खरेदी करणार असाल तर आपल्याला टॅक्स डिडक्शन क्रमांक (टॅन) घेणे गरजेचे आहे आणि उद्गम कराचे विवरणपत्रसुद्धा मुदतीत सादर करावे लागेल.

प्रश्न : माझा किरकोळ वस्तूंच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. मला वारंवार रोख रक्कम बँकेतून काढावी लागते. बँकेकडून मला या रकमेवर उद्गम कर कापला जाईल असे सांगण्यात आले. बँकेतून रोख रक्कम काढण्याच्या उद्गम कराच्या तरतुदी काय आहेत?

  • एक वाचक :

उत्तर : करदात्याने १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेतील किंवा पोस्ट ऑफिसमधील एका किंवा जास्त खात्यातून एका वर्षात रोखीने काढल्यास त्यावर २ टक्के इतक्या दराने उद्गम कर कापण्यात येतो. करदात्याने मागील ३ वर्षांचे विवरणपत्र दाखल न केल्यास २० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर (परंतु १ कोटी रुपयांपेक्षा कमी) २ टक्के दराने आणि १ कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त रकमेवर ५ टक्के दराने उद्गम कर बँकेला कापून तो सरकारजमा करावा लागतो. या तरतुदीतून केंद्र सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) अंतर्गत कार्यरत असलेल्या कमिशन एजंट्स किंवा व्यापाऱ्यांना कृषी मालाच्या खरेदीच्या खात्यावर पैसे देण्यासाठी वगळले आहे.

हेही वाचा – Money Mantra: बजेट आणि आठवड्याचे बाजार गणित

प्रश्न :माझ्याकडे शेअरबाजारात सूचिबद्ध कंपनीचे समभाग १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले आहेत. त्यावर मला वर्ष २०१५ आणि वर्ष २०२१ मध्ये बक्षीस समभाग मिळाले. आता या सर्व समभागांची विक्री शेअरबाजारामार्फत मी या वर्षी केली तर मला यावर कर कसा भरावा लागेल?

  • स्वाती

उत्तर : सूचिबद्ध कंपनीचे समभाग खरेदी केल्यानंतर किंवा त्यावर मिळालेले बक्षीस समभाग मिळाल्यानंतर ते १२ महिन्यानंतर विकल्यास त्यावर होणारा भांडवली नफा हा दीर्घमुदतीचा असतो. आपल्याबाबतीत खरेदी केलेले आणि बक्षीस समभाग हे दीर्घमुदतीचे आहेत. जे समभाग ३१ जानेवारी, २०१८ पूर्वी खरेदी केले आहेत आणि या तारखेपूर्वी हे बक्षीस समभाग जाहीर झाले असतील त्यांच्यासाठी वेगळी तरतूद आहे. आणि जे बक्षीस समभाग १ फेब्रुवारी, २०१८ नंतर मिळाले आहेत त्यांच्यासाठी वेगळी तरतूद आहे. ३१ जानेवारी, २०१८ पूर्वी खरेदी केलेल्या किंवा बक्षीस म्हणून मिळालेल्या समभागाच्या विक्रीवरील भांडवली नफा गणतांना त्याचे खरेदी मूल्य पुढील (१) आणि (२) मधील जे जास्त आहे ते (१) शेअरचे खरेदी मूल्य (बक्षीस समभागासाठी शून्य), आणि (२) (अ) ३१ जानेवारी, २०१८ रोजीचे वाजवी बाजार मूल्य (खरेदी केलेल्या व बक्षीस समभाग धरून), आणि (ब) विक्री मूल्य, या (अ) आणि (ब) मधील जे कमी आहे ते. यानुसार खरेदी मूल्य गणून दीर्घमुदतीचा भांडवली नफा गणावा लागेल. जे बक्षीस समभाग १ फेब्रुवारी, २०१८ नंतर मिळाले आहेत त्यांच्यासाठी त्याच्या विक्रीवर भांडवली नफा गणताना खरेदी मूल्य शून्य समजावे. याप्रमाणे गणलेल्या दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावर कलम ११२ अ नुसार कर भरावा लागेल. प्रथम १ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कर भरावा लागणार नाही आणि १ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर १० टक्के इतक्या सवलतीच्या दराने (अधिक ४ टक्के शैक्षणिक अधिभार) कर भरावा लागेल.

प्रवीण देशपांडे

लेखक सनदी लेखापाल आहेत.

pravindeshpande1966@gmail.com