रोजच्या रटाळ, कंटाळवाण्या, उदासीन बातम्यांचा पिच्छा कायमचाच! आर्थिक आघाडीवर तर आयात कर, वैश्विक युद्ध यांचे सातत्य आहेच. त्यात निसर्गाची भर, आकाशात काळ्या ढगांची गर्दी करत त्यातून बरसणारा धुवाधार पाऊस, असं कुंद वातावरण झालेलं. या काळ्या ढगांची एक रुपेरी किनार ही सरलेल्या सप्ताहात ‘वस्तू व सेवा कर’ (जीएसटी) रचनेतील सुधारणा आणि कर सवलतीच्या रूपात आपल्यासमोर आली. या बातमीच्या जोरावर निफ्टी निर्देशांक २५,००० च्या पल्याड झेपावला. आता ही मंदीच्या वातावरणातील ‘तेजीची झुळूक’ आहे, की या तेजीच्या झुळकेचे रूपांतर हे टिकाऊ तेजीत आणि त्यापुढे तेजीच्या वादळ वाऱ्यात होणार, हे आपण ‘डाऊ आणि इलियट वेव्ह संकल्पनां’च्या आधारे समजून घेऊया.
डाउ संकल्पना
‘निर्देशांकावर एखादी धारणा विकसित झाली तर ती किमान एक वर्ष चालते.’ एक वर्षानंतर या प्रस्थापित धारणेविरुद्ध नवीन धारणा विकसित होण्याची शक्यता असते. निर्देशांकांच्या मंदीच्या धारणेतून तेजीत अथवा तेजीतून मंदीत अशा संक्रमणाला आता विस्तृतपणे समजून घेऊया.
निफ्टी निर्देशांक २७ सप्टेंबर २०२४ पासून २६,२७७ वरून, ७ एप्रिल २०२५ ला २१,७४३ पर्यंत घरंगळत खाली आला. तेव्हा सद्य:स्थितीत निर्देशांकावर मंदीची धारणा चालू आहे. पुढील महिन्यात निफ्टी निर्देशांकाच्या बाबतीत ‘डाउ संकल्पनेतील मंदीला’ एक वर्ष पूर्ण होत असताना (सप्टेंबर २०२४ ते सप्टेंबर २०२५), आपण आता ‘महत्त्वाच्या वळणबिंदू’वरच उभे आहोत. म्हणजेच आता मंदीत असलेल्या निफ्टी निर्देशांकाला, एक वर्ष पूर्ण झाल्यावर तेजीचा सूर गवसेल का? की असंच घरंगळत मंदीची धारणा चालू राहील, याचा आज आपण विस्तृतपणे आढावा घेऊया.
आता वाचकांच्या वैचारिक बैठकीकरता काळाच्या कसोटीवर उतरलेल्या दोन महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तरांना विचारात घेऊ. ज्याचा आपण गेले वर्षभर सातत्याने आधार घेत आलो आहोत. ते म्हणजे निफ्टी निर्देशांकावरील २५,००० आणि २४,००० अंशांचे स्तर. येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांक सातत्याने २५,००० च्या पातळीवर विशेषत्वाने सप्टेंबर महिन्यांत राहिल्यास, मंदीची कात टाकून निर्देशांकावर तेजीची पालवी फुटेल. अशा स्थितीत निफ्टी निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष २५,५०० ते २५,८०० आणि द्वितीय वरचे लक्ष्य २६,३०० ते २६,८०० असा नवीन उच्चांक गाठणारे आणणारे असेल.
या वळण बिंदूवरील प्रवासात, विशेषत्वाने ऑगस्ट अखेरीला ट्रम्प ‘आयात शुल्का’चे भारताबाबतीत सुधारित नवीन प्रस्ताव येणार असल्याने आणि ते सकारात्मक असल्यास तेजीची वरची चाल शक्य आहे. ट्रम्प यांचा सुधारित आयात शुल्काचा प्रस्ताव विपरीत असल्यास, बाजाराची घसरण अपेक्षित आहे ती किती असेल त्यासाठी ‘इलियट वेव्ह’ संकल्पनेचा आधार घेऊया.
‘इलियट वेव्ह’ संकल्पना
या संकल्पनेचा आधार घेतल्यास २०२० मधील करोनाची दाहक मंदी संपून जी तेजी सुरू झाली, त्या तेजीच्या पाचव्या लाटेमधील, दुसऱ्या चरणात (फिफ्थ वेव्ह सेकंड करेक्टिव्ह / लेगमध्ये) आता निफ्टी निर्देशांक आहे. या क्लिष्ट प्रमेय / संज्ञांच्या वाटेला न जाता वाचकांसाठी साध्या सोप्या भाषेत ‘इलियट वेव्ह’च्या गाभ्याची मांडणी करतो. येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकांने २५,१५० ते २५,३५० चा स्तर पार करावयास हवा. तसे झाले तरच ही तेजीची झुळूक पुढे शाश्वत तेजीत रुपांतरीत होइल. हे शक्य न झाल्यास निदान २४,८५२ ते २४,६७३ च्या गॅप / पोकळीचा स्तर निफ्टी निर्देशांकानी राखावयास हवा. असे घडल्यास आता चालू असलेली तेजीची कमान निफ्टी निर्देशांकावर कायम राहील. अन्यथा निफ्टी निर्देशांक २४,६७३ च्या खाली टिकल्यास त्याचे प्रथम खालचे लक्ष्य २४,५०० ते २४,००० आणि द्वितीय खालचे लक्ष्य २३,८०० ते २३,५०० असे असेल. या स्तरावरून निफ्टी निर्देशांकावर शाश्वत तेजी अपेक्षित असून, ही तेजी निफ्टी निर्देशांकावर नवीन उच्चांक प्रस्थापित करेल.
– आशीष ठाकूर, लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
(अस्वीकृती:- शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत.अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)