आता चालू असलेल्या मंदीचे सूतोवाच गेल्या लेखात केलेले. वानगीदाखल गेल्या लेखातील वाक्य होते – “निफ्टी निर्देशांक सातत्याने १५ दिवस २५,५००च्या स्तरावर न टिकल्यास एक हलकी-फुलकी घसरण ही २५,१५०… २४,९२० ते २४,५०० पर्यंत संभवते.” ही घसरण आता आपण अनुभवत आहोत. या घसरणीला ट्रम्प यांचे आयात शुल्क, व्हिसा धोरण, औषध उद्योगांवर १००टक्के आयात कर कारणीभूत ठरले.

येणाऱ्या दिवसांत, निफ्टी निर्देशांकाने २४,५०० ते २४,२०० चा स्तर सातत्याने राखल्यास निफ्टी निर्देशांकावर सुधारणा अपेक्षित असून, तिचे वरचे लक्ष्य २४,९२०, २५,१५० ते २५,३५० असे असेल. निफ्टी निर्देशांक २५,५०० च्या स्तरावर सातत्याने १५ दिवस टिकल्यास, शाश्वत तेजी अपेक्षित आहे. अशा स्थितीत निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे २५,८००, २६,१०० ते २६,४०० असे असेल. ही नाण्याची एक बाजू झाली. निफ्टी निर्देशांक २५,५०० चा स्तर पार करण्यास वारंवार अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांक २४,८०० चा स्तर तोडत, २४,५००… २४,२००… २४,००० ते २३,८०० पर्यंत घरंगळत जाऊ शकतो.

आता प्रश्न आहे, २०२६-२७ ला या तेजीच्या बियाणांचा, त्यातून २८,००० ते ३३,०००चा वटवृक्ष होणार का?

आता आपली वाटचाल ही फिनिक्स पक्षाप्रमाणे अस्मानी, सुलतानी संकटातून सुरू आहे. आपण वाईटातून चांगलं, काळ्या ढगांची रुपेरी किनार शोधत आहोत. जसे की उत्तर भारतात पूरस्थितीने थैमान मांडलं आहे. दुबार पेरणी करावी लागणार. महाराष्ट्रातही अनेक भागात उभे पीक पाण्याखाली गेले आहे. या संकटातून चांगलं शोधायचा प्रयत्न केल्यास, या पुरामुळे धरण, तलाव, जलसंधारणाच्या विविध प्रकल्पात मुबलक पाणी आहे. भले खरीप पिकांचा मोसम लयाला अथवा उशिरा सुरू होईल, पण रब्बी पिकांना या वेळेला पाण्याची विवंचना नसेल. ज्याचा दृश्य परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्था जोमाने बहरेल. याचा प्रत्यक्ष फायदा दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, टीव्ही, फ्रिज, वातानुकूलित यंत्र या उद्योगांना होईल. पावसामुळे वाहून गेल्याने नवीन घरबांधणी, नवीन रस्ते, पूल आदी बांधकामांचा प्रत्यक्ष लाभार्थी सिमेंट, धातू, पोलाद क्षेत्र असेल. यासाठी अर्थशास्त्रातील गुणाकारात्मक परिणाम (मल्टिप्लायर इफेक्ट) ही संकल्पना विस्तृतपणे समजून घेऊया…

एक गाडी / चारचाकी विकत घ्यायची म्हटलं तर ॲल्युमिनियम, स्टीलच्या पत्र्यांमुळे गाडीचे आवरण तयार होते. पोलाद, प्लास्टिक्सपासून गाडीचा ढाचा व अन्य सुटे भाग बनतात. या गरजा मूलभूत उद्योगातील लोखंड, पोलाद, ॲल्युमिनियम क्षेत्राकडून पुऱ्या होणार. त्याचबरोबर गाडीला चालवण्यासाठी पाच टायरची गरज ही टायर उद्योगाकडून पुरी होईल. गाडी आकर्षक दिसण्यासाठी रंग, वातानुकूलन यंत्रणा, फोर्जिंग, विविध प्रकारचे दिवे, केबल, संगणक क्षेत्रातील तंत्रज्ञान वापरून त्या गाडीला अद्ययावत, सुखसोयींनी युक्त करण्यात विविध उद्योगांचा हातभार लागतो. ज्याला आपण वाहनपूरक उद्योगधंदे (ऑटो ॲन्सेलरी) म्हणतो. आपल्या डोळ्यासमोर एक गाडी दिसते, पण त्यासाठी पोलाद, ॲल्युमिनियम, रंग, केबल्स, टायर, वातानुकूलित यंत्र, फोर्जिंग अशा असंख्य उद्योगांचा सक्रिय सहभाग असतो.

याचा दृश्य परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवरच दिसणार. जसे नुकतेच वस्तू व सेवा करात (जीएसटी) सवलती दिल्याने मारुती सुझुकीने एका दिवसात ३०,००० वाहनांच्या किल्ल्या ग्राहकांना देत एक विक्रम प्रस्थापित केला. तर नवीन गाडयांच्या नोंदणीसाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. ह्युंडाई मोटर्सच्या वितरकांनी ११,००० वाहनांच्या मागण्या नोंदवल्या व त्याची पूर्तता कंपनीने सुरू केली आहे. याच जोडीला मूलभूत क्षेत्रात (कोअर सेक्टर) ६.३ टक्क्यांचा वृद्धीदर देशात नोंदवला गेला, जो तेरा महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर आहे.

या सर्व सकारात्मक घटना भारतीय उद्योगधंद्यांना देशांतर्गत मागणी कायम आहे याचे द्योतक आहे. वरील सर्व आर्थिक आडाखे लक्षात घेऊन परदेशी गुंतवणूक संशोधन संस्थादेखील निफ्टी निर्देशांकावर नवीन उच्चांकाचे भाकीत करत आहे. पण आताच्या घडीला ट्रम्प- टेरर, त्यांचा तऱ्हेवाईकपणा, व्यापारावरील जाचक अटी या सर्व निराशाजनक घटनांमुळे, ऑक्टोबर अखेरपर्यंतचा निफ्टी निर्देशांकाचा संभाव्य उच्चांक थोडा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पण या निराशादायक वातावरणातील गुणाकारात्मक परिणामामुळे निर्देशांक लवकरच तावूनसुलाखून नवीन उच्चांकाकडे झेपावेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती:- शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीनआहेत.अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टाँप लाँस’ आणी इच्छीत लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.