जेव्हा गुंतवणूकदारांच्या मनावर मंदीचं दाट सावट होतं, तेव्हा मंदीच्या ‘कॅनव्हास’वर तेजीचं चित्र काढून त्यात तेजीचे रंग भरायचं काम आमच्या ‘अमर, अकबर, अँथनी म्हणजेच चलत सरासरी, फेबुनासी रिट्रेसमेंट, गॅन अँगल’ या तिघांनी केले. त्यांनी एकत्र येऊन त्या चित्रात तेजीचे विविध रंग भरत, त्या मंदीच्या वातावरणात कोणाच्याही ध्यानीमनी नसलेली अशी ‘तेजीची झुळूक आणत’ सरलेल्या सप्ताहातील गुरुवारी निफ्टी निर्देशांक २४,९८० वर झेपावला.

आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर २४,८५० ते २५,१५० हा भरभक्कम अडथळा असल्याने हा स्तर पार करण्यास निफ्टी निर्देशांक अपयशी ठरल्यास निफ्टीवरील तेजीचा रंग उडून तर जाणार नाही ना? याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने निफ्टी निर्देशांकाची भविष्यकालीन वाटचाल विविध शक्यतांद्वारे रेखाटूया.

शक्यता नंबर १) या महिन्यात निफ्टी निर्देशांकाने २४,०००चा स्तर राखणे नितांत गरजेचे आहे तर ही ‘तेजीची झुळूक शाश्वत तेजीत’ रूपांतरित होईल.

शक्यता नंबर २) या महिन्यात निफ्टी निर्देशांकाने २४,०००चा स्तर राखत २४,८५० ते २५,१५० जो आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर भरभक्कम अडथळा ठरत आहे, तो अतिशय संयत स्वरूपात पार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यावेळेला निफ्टी निर्देशांकाची चाल ही ‘दोन पावलं पुढे एक पाऊल मागे’अशा स्वरूपात असावी. निफ्टी निर्देशांकाचा आलेख चढत्या भाजणीतला उच्चांक व चढत्या भाजणीतला नीचांक (हायर टॉप, हायर बॉटम प्रस्थापित करत) २४,०००च्या स्तराभोवती तेजीचा पाया रचत अतिशय संथ, पण आश्वासक रीतीने निफ्टी निर्देशांकांनी २५,१५०चा स्तर पार करावा. या प्रक्रियेत कुठेही ‘भूमिती श्रेणीतील’ वाटचाल अपेक्षित नाही. ती तशी झाल्यास ते विनाशास कारण ठरेल.

शक्यता नंबर ३) सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात निफ्टी निर्देशांकाने २४,००० ते २३,८०० चा स्तर राखल्यास हा तेजीचा पाया असून, पुढील वर्षी २०२६ च्या उत्तरार्धात निफ्टी निर्देशांक २८,००० ते ३२,००० पर्यंत झेपावेल. ही नुसतीच कागदी आकडेवारी नसून, आता जे भारतीय अर्थव्यवस्थेत सकारात्मक स्थित्यंतर घडत आहेत, त्याचा हा फार सखोल व दूरगामी प्रभाव असेल. अर्थव्यवस्थेच्या स्थित्यंतराचा भांडवली बाजारावर होणारा सकारात्मक परिणाम या विषयावर पुढील लेखात विस्तृतपणे चर्चा करणार आहोत.

या आठवडयात निफ्टी निर्देशांकाला २४,५०० स्तराचा भरभक्कम आधार आहे. सरलेल्या सप्ताहातील गुरुवारच्या सत्राची सुरुवातच मुळी २४३ अंशांच्या तेजीच्या ‘गॅप’/ पोकळीने झाली. या पोकळीसाठी बुधवारचा उच्चांकी भाव २४,७३७ व गुरुवारच्या सत्रातील बाजार कार्यरत होण्याचा सकाळचा ९.१५ची किंमत २४,९८० या उच्चांक व नीचांक किमतीतील फरक ही दिवसांतर्गत गॅप (इंट्राडे गॅप) ही २४३ अशांची येत होती. याला तांत्रिक विश्लेषणात ‘रायझिंग गॅप’ अथवा पोकळी म्हणून संबोधतात. ही ‘रायझिंग गॅप’ निदान त्यादिवशी तरी भरता कामा नको होती. गुरुवारच्या सकाळच्या सत्रातील ‘गॅप’ त्याच दिवशी भरली गेल्याने, गेल्या लेखात नमूद केलेला निफ्टी निर्देशांकावरील २४,८५०चा स्तर हा निर्देशांकाच्या तेजीच्या वाटचालीतील अवघड टप्पा ठरत आहे.(गुरुवारच्या सकाळच्या सत्राची सुरुवातच मुळी निफ्टी निर्देशांकाने दिवसांतर्गत २४,९८० उच्चांक नोंदवत केली, पण हा स्तर राखण्यास निफ्टी निर्देशांक अपयशी ठरल्याने २४,८५०चा स्तर हा भविष्यातील अडथळा असेल.)

या आठवडयात निफ्टी निर्देशांकाने २४,५००चा स्तर राखत, प्रथम २४,८५० आणि त्यानंतर २५,१५० चा स्तर पार केल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे २५,५०० ते २५,८०० असेल, अन्यथा निफ्टी निर्देशांकाने २४,५००चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य २४,२०० ते २३,८०० व द्वितीय खालचे लक्ष्य २३,५०० ते २३,००० असेल. – आशीष ठाकूर

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टाॅप लाॅस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.