काही दिवसांपूर्वी आमच्या बाबांबरोबर एक मस्त चर्चा रंगली. विषय होता की, आपण निवृत्तिनिधी जमा करताना स्वतः सगळं सांभाळावं की निवृत्ती शब्द असलेल्या गुंतवणुकींमध्ये पैसे घालावे. विमा कंपन्यांच्या निवृत्ती योजना, म्युच्युअल फंडांचे निवृत्ती नियोजन (रिटायरमेंट प्लॅन), राष्ट्रीय निवृत्ती योजना (एनपीएस). विषय येण्यामागे कारण पण तसंच होतं. बाबांच्या म्हणण्यानुसार सोपं सुटसुटीत असेल असा पर्याय उत्तम. कशाला डोक्याला ताप करून घ्यायचा! पैसे घातले की काम झालं. मग सगळे पैसे थेट निवृत्तीला लागले की वापरायचे. तर यावर आमच्या घरातील तरुण मात्र गुंतवणूकदार नाखूश!

त्यांच्या मते गुंतवणुकीवर सर्वस्वी नियंत्रण हे आपलंच असलं पाहिजे. आपल्याला भरपूर माहिती मिळत असते. तिचा वापर करून आपला निवृत्तिनिधी आपणंच तयार करायचा. पद्धत कोणतीही असोत, एक गोष्ट मात्र नक्की आहे. निवृत्तीचे नियोजन करताना, आपल्या निवृत्तिवेतनातील बचतीची गुंतवणूक कशी करावी हा अनेकांसाठी महत्त्वाचा निर्णय असतो. तेव्हा हा प्रश्न पडणं साहजिकच आहे की दीर्घकाळासाठी आपले पैसे कसे गुंतवावे आणि आपण स्वतः त्याचं व्यवस्थापन करावं की नाही. आपली निवड अनेकदा दोन व्यापक धोरणांवर अवलंबून असते. सक्रियपणे व्यवस्थापित निवृत्तिवेतन पोर्टफोलिओ किंवा आयत्या निवृत्तिवेतन योजना, ज्यांना आपण निवृत्तीच्या योजना म्हणतो. दोन्ही गुंतवणूक पर्याय आप-आपल्या ठिकाणी योग्य आहेत. त्यांचं उद्धिष्ट तुमची निवृत्तीची गरज पुरवणे हे आहे, परंतु खर्च, लवचीकता, जोखीम आणि संभाव्य परताव्याच्या बाबतीत दोघांमध्ये लक्षणीय फरक आहेत. या दोघांमधील फरक समजून घेतल्याने आपल्या आर्थिक ध्येयाशी सुसंगत असलेला निवृत्तिनिधी जमा करण्यासाठी अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होऊ शकते म्हणून आजचा हा लेख.

सक्रियपणे व्यवस्थापित निवृत्तिवेतन खाते म्हणजे काय?

सक्रियपणे व्यवस्थापित निवृत्तिवेतन पोर्टफोलिओ ही एक सेवानिवृत्ती गुंतवणूक रणनीती आहे. ज्यामध्ये व्यावसायिक निधी व्यवस्थापक, गुंतवणूक सल्लागार किंवा वैयक्तिक गुंतवणूकदार स्वतः सक्रियपणे पोर्टफोलिओमधील गुंतवणुकीची निवड आणि समायोजन करतात. सामान्यतः बाजारपेठेपेक्षा चांगली कामगिरी करणे किंवा गुंतवणुकीची विशिष्ट उद्दिष्टे पूर्ण करणे, जसे की आरामदायी निवृत्तीसाठी आवश्यक परतावा मिळवणे, हे मूळ उद्दिष्ट असते.

या पोर्टफोलिओमध्ये मालमत्ता वर्गांचे मिश्रण असू शकते. यामध्ये समभाग, रोखे, स्थावर मालमत्ता, पर्यायी गुंतवणूक, सोने-चांदी, इत्यादी. माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी निधी व्यवस्थापक बाजारातील परिस्थिती, आर्थिक निर्देशक आणि वैयक्तिक सुरक्षा कामगिरीचे सातत्याने मूल्यांकन करतो. निधीवर बाजारापेक्षा अधिक सरासरी परतावे मिळावे हे उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेवून बाजारातील कल आणि इतर अभ्यासानुसार हा निधी ठरावीक वेळी पुनर्संतुलित (Rebalancing) केला जातो. गुंतवणूकदारांची उद्दिष्टे आणि जोखीम क्षमतेनुसार ॲसेट अलोकेशन करून हे निधी सांभाळले आणि वाढवले जातात. निवृत्तिनिधीच्या प्रत्यक्ष देखरेखीमुळे इथे गुंतवणूकदाराला जास्त खर्च होतो.

आयत्या निवृत्तीच्या योजना म्हणजे काय?

रेडीमेड म्हणजेच आयत्या निवृत्तिवेतन योजना, ज्याला ‘सेट इट अँड फॉरगेट इट’ निवृत्तिवेतन उपाय म्हणूनही ओळखले जाते, त्यात सामान्यतः लक्ष्य -दिनांक निधी (Target Maturity Funds), जीवनचक्र निधी (Retirement Funds) किंवा निवृत्तिवेतन वार्षिकी (Annuity Plans) योजना यासारख्या गुंतवणूक उत्पादनांचा समावेश असतो. तुमच्या अपेक्षित निवृत्तीची तारीख किंवा जोखीम पातळीच्या आधारे पूर्व-संरचित पोर्टफोलिओ प्रदान करून निवृत्तीची गुंतवणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी या योजना तयार केल्या आहेत.

वैयक्तिक गुंतवणुकीची निवड करण्याऐवजी, गुंतवणूकदार एक योजना किंवा निधी निवडतो, जो कालांतराने त्याचे वाटप स्वयंचलितपणे समायोजित करतो. उदाहरणार्थ, निवृत्ती जवळ येत असताना लक्ष्य-तारखेचा निधी हळूहळू जास्त जोखीम असणारी समभाग निगडित गुंतणुकीतून काढून अधिक रोखे आणि निश्चित उत्पन्न देणाऱ्या गुंतवणुकीकडे वळेल. अशा पोर्टफोलिओमध्ये खर्च कमी असतो. हे अनेक वेळी निष्क्रिय गुंतवणूक धोरणांवर आधारित असतात.

विशेषतः कमी कार्यक्षम बाजारपेठांमध्ये किंवा अस्थिरतेच्या काळात सक्रिय व्यवस्थापनात बाजाराला मागे टाकण्याची क्षमता अशा प्रकारच्या पोर्टफोलिओमध्ये असते. कुशल निधी व्यवस्थापक कमी किमतीची मालमत्ता ओळखू शकतात किंवा मंदीच्या काळात बचावात्मक भूमिका घेऊ शकतात.

सक्रिय खाते अधिक परतावा देऊ शकतात तर ‘रेडीमेड पेन्शन’ योजना अधिक सुसंगत, जोखीम-समायोजित परतावा कमी खर्चात देऊ शकतात.

शुल्क आणि खर्च: कोणत्याही गुंतवणूक धोरणात, विशेषतः निवृत्ती नियोजनासारख्या दीर्घकालीन क्षितिजांमध्ये, खर्च हा एक महत्त्वपूर्ण विचार असतो. सक्रियपणे व्यवस्थापित केलेले पोर्टफोलिओ अनेकदा जास्त शुल्क आकारतात, ज्यात खालील गोष्टींचा समावेश असू शकतोः

१. सल्लागार शुल्क (सामान्यतः ०.५ टक्के ते १.५ टक्के प्रति वर्ष)

२. निधी व्यवस्थापन शुल्क (सक्रिय म्युच्युअल फंड वापरत असल्यास)

३. व्यापार खर्च आणि करातील अकार्यक्षमता

रेडीमेड पेन्शन योजना, विशेषतः निर्देशांक निधीवर आधारित योजना, सहसा खालीलप्रमाणे असतातः

१) कमी व्यवस्थापन शुल्क (०.१ टक्के ते ०.५ टक्के)

२) कमी उलाढाल आणि कमी व्यापार खर्च

लवचीकता आणि नियंत्रण: सक्रियपणे व्यवस्थापित केलेला पोर्टफोलिओ तुम्हाला किंवा तुमच्या सल्लागाराला तुमच्या विशिष्ट गरजा आणि विश्वासांनुसार गुंतवणूक करण्यास अनुमती देतो. उदयोन्मुख बाजारपेठांशी अधिक संपर्क हवा आहे की नैतिक गुंतवणूक? बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये बदल करण्याची गरज आहे का? तुम्हीही ते करू शकता.

रेडीमेड निवृत्तिवेतन योजना सोयीस्कर असल्या तरी, कमी लवचीकता देतात. हे वाटप सामान्यतः तुमच्या वयानुसार किंवा निवृत्ती वर्षानुसार निश्चित केले जाते. काही योजना तुम्हाला जोखमीच्या पातळीमध्ये बदल करण्याची परवानगी देतात. परंतु पर्याय मर्यादित असतात.

साधेपणा आणि वेळेची बांधिलकी: जर तुम्हाला बाजारपेठेचा मागोवा घेण्यात, गुंतवणुकीवर संशोधन करण्यात किंवा पुनर्संतुलन आणि कराच्या परिणामांना सामोरे जाण्यात स्वारस्य नसेल तर रेडीमेड निवृत्तिवेतन योजना आदर्श आहे. हे उपाय वापरण्यास सुलभतेसाठी, विशेषतः गुंतवणुकीचे मर्यादित ज्ञान किंवा वेळ असलेल्या व्यक्तींसाठी तयार केले आहेत.

दुसरीकडे, सक्रियपणे व्यवस्थापित केलेल्या पोर्टफोलिओवर नियमित देखरेखीची आवश्यकता असते. जरी आर्थिक सल्लागार त्याचे व्यवस्थापन करत असला तरीही. धोरण तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टांशी सुसंगत आहे याची खात्री करण्यासाठी तुम्हाला अजूनही व्यस्त राहण्याची गरज आहे. जोखीम व्यवस्थापन – बाजारातील घसरणीला प्रतिसाद देण्यासाठी ॲसेट अलोकेशन बदलून, रोख रकमेकडे वळून किंवा बचाव धोरणांचा वापर करून सक्रिय व्यवस्थापकांमध्ये योग्य प्रतिक्रिया देण्याची क्षमता असते. रेडीमेड निवृत्तिवेतन योजना पूर्वनिर्धारित मार्ग वापरतात, जे कदाचित अचानक बाजारातील घसरणीशी किंवा आर्थिक बदलांशी जुळवून घेऊ शकत नाहीत. तथापि, त्यांचा वैविध्यपूर्ण, दीर्घकालीन दृष्टिकोन बहुतेक गुंतवणूकदारांसाठी पुरेसा असतो.

सारांश : तुमच्या निवृत्तिवेतनाचे व्यवस्थापन करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा याचे उत्तर सर्वांसाठी एकच असते असे नाही. जर तुमच्याकडे वेळ, ज्ञान आणि जोखीम घेण्याची इच्छा असेल, तर सक्रियपणे व्यवस्थापित केलेला पोर्टफोलिओ अधिक लवचीकता आणि संभाव्य बक्षिसे देऊ शकतो. तथापि, बहुतांश बचतकर्त्यांसाठी विशेषतः त्यांच्या सेवानिवृत्तीच्या प्रवासाच्या सुरुवातीच्या काळात किंवा मर्यादित आर्थिक कौशल्य असलेल्यांसाठी ‘रेडीमेड’ निवृत्तिवेतन योजना सुरक्षित निवृत्ती तयार करण्यासाठी कमी खर्चिक, कमी तणावाचा मार्ग प्रदान करतात.

शेवटी, सर्वोत्तम रणनीती अशी आहे, जी तुम्ही तुमच्या उद्दिष्टांशी आणि सोयीच्या पातळीशी जुळवून घेऊ शकता. जी दीर्घकाळासाठी परिणाम देते. जर शंका असेल, तर तुमच्या परिस्थितीनुसार निवृत्तिवेतन योजना तयार करण्यासाठी प्रमाणित आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेण्याचा विचार करा.

trupti_vrane@yahoo.com