जेव्हा शेअर बाजार अस्थिर असतो किंवा परताव्याचे दर कमी असतात, तेव्हा गुंतवणूकदार जास्त परताव्याच्या अपेक्षेने सैरभैर होताना दिसतात. या मानसिकतेचा फायदा उठवण्यासाठी सायबर गुन्हेगार नेहमीच तयार असतात. अति लोभ, प्रतिष्ठित नावांचा प्रभाव, ओळखीच्या व्यक्तीवर अंधविश्वास आणि जलद परतावा मिळवण्याची घाई या अशा मानसिकतेमुळे अपरिपक्व गुंतवणूकदार सायबर भामट्यांचे बळी पडताना दिसतात.
या स्थितीत गुंतवणूकदारांनी नेहमी सतर्क राहायला हवे, प्रत्येक गोष्टीची खात्री करायला हवी आणि एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे, एखादा गुंतवणूक पर्याय सर्वगुणसंपन्न भासत असेल, तर त्यात नक्कीच धोका आहे. सामान्यज्ञान, स्वतंत्रपणे पडताळणी, गुंतवणूक साक्षरता आणि मानसिक सजगता यांच्या मदतीने आर्थिक फसवणुकीचा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येतो. हा लेख सायबर भामट्यांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरेल, अशी आशा आहे.
फसवणुकीच्या पद्धती (‘सोशल इंजिनीयरिंग’चे प्रकार)
फसवणूक करणारे अनेक युक्त्या एकत्रितपणे वापरतात : सेबी एजंट, रजिस्टर्ड ब्रोकर, सेलिब्रिटी किंवा ओळखीच्या ‘इन्फ्लुएन्सर्स’कडून बोलत असल्याचे भासवून विश्वास संपादन करणे. बनावट पावत्या, खोट्या ॲपचे डॅशबोर्ड आणि बनावट शिफारसी यांचा वापर करून भोळ्या गुंतवणूकदारांना प्रभावित करतात. फक्त निमंत्रितांसाठीच ‘टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप’, जिथे बॉट्सनी चालवलेले सदस्य फसवे आणि स्क्रिप्टेड संदेश आणि बनावट नफा दाखवून लोकांना आकर्षित करतात.
‘क्रेडेन्शियल्स’ (लाॅग-इन आयडी पासवर्ड) चोरी किंवा बनावट वॉलेट ठेवींसाठी मोतीलाल ओसवालसारख्या विश्वासार्ह ब्रोकरची हुबेहूब नक्कल करणाऱ्या बनावट ॲप/संकेतस्थळ क्यूआयपी किंवा प्री-आयपीओ शेअरमध्ये उच्च परताव्याचे आमिष दाखवून लहान गुंतवणूकदारांना फसवले जाते. कारण हे पर्याय कायदेशीररीत्या उपलब्ध नसतात. त्यामुळे त्यांना भुरळ पडते, पैसे गायब करण्यापूर्वी ‘विथड्रॉल फी’ सारख्या क्लृप्त्या वापरून आणखी फसवतात.
पॉन्झी स्कीम्स : जुन्या गुंतवणूकदारांना नवीन गुंतवणूकदारांच्या पैशांतून परतावा दिला जातो. ‘हाय यील्ड’ जमीन, सोने किंवा चिट फंड अशा स्वरूपात फसवणूक होते.
‘इन्फ्लुएन्सर्स’मार्फत शेअर बाजारात गुंतवणूक : यूट्यूब स्टार, सोशल मीडिया सेलेब्रिटी किंवा बनावट विश्लेषक हे दुर्लक्षित शेअरची जाहिरात करतात, भाव वाढल्यावर अचानक हे शेअर विकून मोकळे होतात (पंप-अँड-डम्प).
फसवी ऑफशोअर फॉरेक्स, क्रिप्टो (आभासी चलन) आणि ट्रेडिंग प्लॅटफॉर्म : परवाना नसलेल्या ॲप/वेबसाइट्समध्ये बनावट नफा दाखवून, नंतर ‘विथड्रॉल’ रोखतात किंवा टाळाटाळ करतात.
‘या’ मानसिकता गुंतवणूकदारांची असुरक्षितता वाढवतात पारंपरिक गुंतवणुकीपेक्षा जास्त परताव्याचा हव्यास: जेव्हा बाजार ‘रेंजबाउंड’ असतो किंवा मुदत ठेवींचे व्याजदर कमी झालेले असतात, तेव्हा २ महिन्यांत ३० टक्के परतावा यासारखी आश्वासने मोहात टाकतात.
लोभ आणि अँकरिंग बायस: सुरुवातीला थोडाफार नफा दाखवून मोठी गुंतवणूक करवून घेतली जाते. आधीचे पैसे अडकतील, या भीतीने आणि लोभामुळे लोक दिसणाऱ्या नफ्यातील पैसे काढत नाहीत.
‘फोमो’ (मागे राहण्याची भीती): समूहामध्ये इतरांचे नफा दाखवणारे स्क्रीनशॉट, ‘इन्फ्लुएन्सर्स’चे प्रोत्साहन वापरून निर्णय घ्यायला भाग पाडले जाते.
अतिआत्मविश्वास आणि समूहदबाव : ओळखीच्या लोकांचे समर्थन किंवा सेलेब्रिटींचा उल्लेख वापरून लोकांचा आत्मविश्वास वाढवतात. त्यामुळे असाध्य नफाही सहजसाध्य वाटतो.
तातडी/दुर्लभता बायस : फक्त काही जागा शिल्लक किंवा मर्यादित कालावधीसाठी अशा शब्दांचा वापर करून शहानिशा न करता गुंतवणूक करवून घेतली जाते.
गुप्ततेचे अवडंबर : माहिती गुप्त ठेवा नाही तर पात्रता रद्द होईल, अशी धमकी देऊन माहितीची पडताळणी टाळायला लावली जातात.
भावनिक दबाव : ‘शा झू पॅन’ (Pig Butchering) पद्धतीत गुंतवणूकदाराशी हळूहळू भावनिक जवळीक साधून विश्वास संपादन केला जातो आणि गंडा घालण्यासाठी मोठी गुंतवणूक करवून घेतली जाते.
धोक्याचे इशारे आणि संभाव्य नुकसानीचे संकेत
‘व्हीआयपी’ किंवा वलयांकित व्यक्तीशी संबंधित गटांकडून खासगी ‘टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप’ समूहात दाखल होण्याचे अनाहूत आमंत्रण.
कुठून आणि कसा नफा येणार/ ठोस व्यवसाय योजना यांच्या पूर्ण माहितीशिवाय खूप मोठ्या परताव्याची आश्वासने.
अपरिचित ट्रेडिंग ॲप डाउनलोड करण्याची किंवा अधिकृत शेअर दलाल असल्याचे भासविणाऱ्या संकेतस्थळांना भेट देण्याची मागणी.
(दिलेल्या पैशाचा माग काढणे कठीण व्हावे यासाठी) युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआय किंवा वेगवेगळ्या वैयक्तिक खात्यांत लहान रकमांची हस्तांतरणे करण्याच्या मागण्या.
झालेल्या नफ्यातून सुरुवातीच्या लहान रक्कम काढण्याची परवानगी देणे, त्यानंतर खाते ‘ब्लॉक’ करणे किंवा रक्कम काढण्यासाठी शुल्क आकारणे.
गुप्ततेचा आग्रह, निकड किंवा पडताळणीसाठी वेळ न देणे : गुप्ततेचा भाग म्हणून पडताळणीसाठी वेळ मागून घ्या
सावधगिरीच्या उपायांचा अवलंब करा :
अधिकृत नोंदणीची पडताळणी करा : फक्त भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ नोंदणीकृत शेअर दलाल किंवा अधिकृत मध्यस्थांकडूनच गुंतवणूक करा. अधिकृत मध्यस्थांची यादी ‘सेबी’च्या संकेतस्थळावर शोधा
समाजमाध्यमावर आलेल्या अनोळखी प्रस्तावांत खात्री केल्याशिवाय गुंतवणूक करू नका.
अज्ञात स्रोतांकडून चालविल्या जाणाऱ्या गुंतवणूक ‘टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप’ समूहाचे सभासद बनू नका
फक्त अधिकृत ब्रोकर लिंक्स किंवा ॲप स्टोअर्सवरून ट्रेडिंग ॲप्स डाउनलोड करा आणि ॲप डेव्हलपरची नावे पडताळून पाहा.
वैयक्तिक किंवा एकाधिक बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करू नका; कायदेशीर कंपन्या नियंत्रित एस्क्रो/ट्रेडिंग अकाउंटच वापरतात.
विचार करण्यासाठी वेळ मागा; भरवशाची खात्री होईपर्यंत पैसे हस्तांतरित करू नका
संशयास्पद ऑफरची त्वरित तक्रार करा: cybercrime.gov.in, सेबी हेल्पलाइन आणि स्थानिक सायबर पोलिसांशी त्वरित संपर्क साधा.
महत्त्वाच्या हेल्पलाइन आणि तथ्य-तपासणी संसाधने
राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल संकेतस्थळ :
http://www.cybercrime.gov.in
हेल्पलाइन क्रमांक : १९३० (तात्काळ फसवणूक हस्तक्षेपासाठी २४x७ उपलब्ध)
सेबी स्कोर (सिक्युरिटीज तक्रार निवारण):
http://www.scores.gov.in (गुंतवणूक/बाजाराशी संबंधित फसवणूक आणि तक्रारींसाठी)
रिझर्व्ह बँक सॅचेट (बिगर-नोंदणीकृत संस्थांची माहिती) :
sachet.rbi.org.in
पीआयबी फॅक्ट चेक : व्हायरल दावे/अफवांसाठी, विशेषतः सरकारी योजनांशी संबंधित व्हाॅट्सॲप :
९१-८७९९७ ११५२९
ट्विटर: @PIBFactCheck
गुंतवणुकीबाबत साशंकता हेच सर्वोत्तम सुरक्षा कवच आहे. दिसायला आकर्षक आणि जोखमीशून्य वाटणाऱ्या योजनांमध्येच धोका अधिक असतो. नियंत्रित, अधिकृत संसाधनांतच गुंतवणूक करा. नियमबद्ध प्रक्रिया आणि पारदर्शक मार्ग स्वीकारल्यास कदाचित परतावा कमी मिळेल, पण तुमची निद्रा व संपत्ती सुरक्षित राहील. मृगजळापेक्षा वास्तव अधिक महत्त्वाचे असते, नाही का?