गेल्या लेखात निफ्टी निर्देशांकाचे भविष्यकालीन आलेखन करताना, २७,००० ते २९,००० पर्यंतची तेजीचे उत्तुंग शिखर सर करणारी ही ‘तेजीची वाट फार दूरवर जाते’ असे भाकीत केलेले होते. तेजीचे हे उत्तुंग शिखर सर करत असताना, मध्येच १,५०० ते २,००० अंशांची घसरण देखील गृहीत धरूनच आपली भविष्यकालीन वाटचाल रेखाटली पाहिजे. या लेखात आपण आज तेजीचे उत्तुंग शिखर, तर मंदीच्या खोल दऱ्याखोऱ्यांमधील वाटचालीचे नियोजन करूया.

गुंतवणूकदारांनी येणाऱ्या दोन वर्षांसाठी भविष्यकालीन उदयोन्मुख क्षेत्र निवडावी. आताच्या घडीला वित्तीय क्षेत्र, सरकारी बँका, बांधकाम, संरक्षण क्षेत्र यातील प्रतिथयश आघाडीच्या कंपन्या निवडल्या जाव्यात. आपल्या गुंतवणूकयोग्य रकमेचे, आपल्या गुंतवणूक मानासिकतेप्रमाणे तसेच दीर्घ, अल्पमुदतीची गुंतवणूक धारणेप्रमाणे विभागणी करावी. या समतोल विभागणीमध्ये इच्छित कंपनीचे २०० समभाग खरेदी करावेत. यातील १०० समभाग दीर्घमुदतीसाठी तर राहिलेले १०० समभाग अल्पमुदतीसाठी. ज्यात अल्पमुदतीत ३० ते ५० टक्क्यांचा परतावा अपेक्षित असून हे समभाग तेजीत विकून पुन्हा मंदीत खरेदी करण्याचे धोरण असावे. हे गुंतवणूक नियोजन साध्य करण्यासाठी निफ्टी निर्देशांकाचा आढावा घेऊया.आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकाला २४,४५० चा भरभक्कम आधार आहे. निफ्टी निर्देशांकाच्या तेजीच्या वाटचालीचे प्रथम वरचे लक्ष्य २५,००० ते २५,२००, तर द्वितीय वरचे लक्ष्य २५,५०० ते २५,८०० असे असेल. या स्तरावरून एक घसरण अपेक्षित असून, तिचे प्रथम खालचे लक्ष्य २४,५०० ते २४,००० असेल. या घसरणीत निफ्टी निर्देशांकावरील ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ असलेला २४,०००चा स्तर राखला जाणे नितांत गरजेच आहे. हा स्तर राखला जात असल्यास, या स्तरावर अल्प व दीर्घमुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूकयोग्य रक्कम २० टक्क्यांच्या पाच तुकड्यात विभागून प्रत्येक घसरणीत समभागांची खरेदी करावी. बाजार नेहमीच धक्कातंत्राचा वापर करतो व त्यात या ‘दे धक्क्याला’ प्रसंगानुरूप डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवनवीन घोषणा, इस्रायल-इराण युद्धज्वर अशा घटनांची फोडणी मिळाल्यास निफ्टी निर्देशांक २३,००० पर्यंत पण घरंगळत जाऊ शकतो. त्यावेळेला गुंतवणूकयोग्य रकमेचे २० टक्क्यांच्या दोन तुकडयांचे पैसे, अगोदर घेतलेले समभाग स्वस्त दरात खरेदी करण्यासाठी (ॲव्हरेजसाठी) पैसे शिलकीत असणे गरजेचे आहे, तरच ही मंदी सुसह्य होऊन, निफ्टी निर्देशांकाच्या २८,००० ते २९,०००च्या उच्चांकाचा आनंद मिळू शकेल.

जीवनाचा प्रवास हा कधीच संपत नसतो. ही वाट दूर जाणारीच असते. हा प्रवास पायवाटेपासून सुरू होऊन द्रुतगती महामार्ग, त्यानंतर राजमार्गापर्यंत पोहोचतो. या महागाईच्या दिवसात पर्यायी उत्पन्नासाठी १०० समभाग हे अल्प मुदतीसाठी, तर संपत्ती निर्माण, निवृत्तिवेतन, पेन्शन यासारख्या दीर्घ पल्ल्याच्या तरतुदीसाठी त्याच कंपनीचे दुसरे १०० समभाग, अशी २०० समभागांची विभागणी करत आपल्या जीवनाचा प्रवास हा पायवाटेवरून लवकरच समृद्धीच्या राजमार्गापर्यंत विनासायास घडून यावा यासाठी हा यत्न.

निकालपूर्व विश्लेषण

१) एलआयसी ऑफ इंडिया

२३ मेचा बंद भाव: ८६०.२५ रु.

तिमाही वित्तीय निकाल: मंगळवार, २७ मे

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ८४० रु.

निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून ८४० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ९०० रुपये, द्वितीय लक्ष्य ९२५ रुपये.

निराशादायक निकाल असल्यास: ८४० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ७९० रुपयांपर्यंत घसरण

२) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (सेल)

२३ मेचा बंद भाव: १२५.९२ रु.

तिमाही वित्तीय निकाल: बुधवार, २८ मे

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १२० रु.

निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून १२० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १३५ रुपये, द्वितीय लक्ष्य १४५ रुपये.

निराशादायक निकाल असल्यास: १२० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १०७ रुपयांपर्यंत घसरण

(लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.)

ashishthakur1966@gmail.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.