भविष्यकाळातील आपल्या काही योजना, ध्येय, इच्छा किंवा आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण निर्माण केलेली साधनं म्हणजे आपली ‘गुंतवणूक’! सर्वसाधारणपणे, आपले खर्च भागवल्यानंतर आपल्याकडे जी अतिरिक्त रक्कम उरते ती आपण गुंतवणूक करण्यासाठी वापरतो.

आपल्या जीवनामध्ये, मुलांचं उच्चशिक्षण किंवा लग्नकार्य, घराची किंवा वाहनाची खरेदी, कुटुंबाबरोबर सहलीसाठी परदेशी जाणं किंवा निवृत्ती नंतर आपल्या खर्चासाठी पुरेसे पैसे उपलब्ध असणं, दुर्दैवाने कुटुंबातील कुणी व्यक्ती आजारी पडली तर तिच्या उपचारासाठी पुरेशा निधीची सोय करणं या सारखी एक किंवा अनेक लहान-मोठी उद्दिष्ट असतात. ती पूर्ण करता यावीत यासाठी आपण आपल्या दैनंदिन खर्चामध्ये काटकसर करून नित्य-नियमाने कमी-अधिक बचत करत असतो. परंतु बचत आणि गुंतवणूक या दोन गोष्टी परस्परांपासून पूर्णपणे भिन्न आहेत.

बचतीमध्ये आपण आपला खर्च आपल्या उत्पन्नापेक्षा कमी करतो. त्यामुळे वाचलेले पैसे बाजूला ठेवतो. वेळेस ते पैसे बँकेच्या बचत खात्यामध्येच ठेवले जातात. बँक त्यावर जुजबी व्याज दराने थोडं व्याज देते. बचती मधून फार मोठा आर्थिक फायदा होत नाही. तशी आपली अपेक्षा सुद्धा नसते. ते पैसे सुरक्षित असतात आणि आपल्याला हवे तेव्हा आपल्या खात्यातून काढून घेऊन आपण ते वापरू शकतो, एवढंच आपल्याला पुरेसं असतं.

या उलट, गुंतवणूक करताना आपण गुंतवलेल्या पैशांवर जास्ती जास्त परतावा किंवा फायदा मिळावा अशी आपली अपेक्षा असते. परंतु, गुंतवलेल्या पैशांमधून आपण भरपूर फायदा मिळवू शकतो. त्याच बरोबर आपण ते सर्व पैसे किंवा त्यातील काही भाग गमावू सुद्धा शकतो. पैसे गमावण्याच्या धोका हा गुंतवणुकीचा एक अविभाज्य भाग आहे. कोणत्याही गुंतवणुकीमधून मिळू शकणारा फायदा आणि त्या गुंतवणुकीमध्ये पैसे गमावण्याच्या असलेला धोका यांचा परस्पर संबंध ‘समप्रमाणा’चा आहे. म्हणजे, कोणत्याही गुंतवणुकीमधून मिळणारा फायदा जितका जास्त असतो, तितकाच जास्त धोका सुद्धा, त्या गुंतवणुकीत असतो. त्यामुळे गुंतवणूक करताना त्या गुंतवणुकीमागचं आपलं नेमकं उद्दिष्ट, आपल्या आर्थिक क्षमता व मर्यादा आणि धोका पत्करण्याची आपली आर्थिक व मानसिक तयारी याचा संपूर्ण विचार करावा.

आपली उद्दिष्ट, क्षमता आणि मानसिकता या सर्वांना योग्य ठरतील अशी गुंतवणुकीची विविध साधनं आज उपलब्ध आहेत. त्यांचा अभ्यास करून त्यामधून मधून आपल्याला सर्वात योग्य ठरेल असं साधन निवडावं. आपल्यासाठी सर्वाधिक योग्य असणारं गुंतवणुकीचं साधन वापरल्यास ती गुंतवणूक सर्वोत्तम फायदे मिळवून देते.

गुंतवणुकीचं साधन निवडताना चार मूलभूत निकषांकडे प्रामुख्याने लक्ष द्यावं :

१. आपण गुंतवलेली रक्कम सातत्याने वाढत राहावी.
२. काही कारणांमुळे त्या गुंतवणुकीमधून फायदा मिळाला नाही तर, किमान आपण गुंतवलेली मूळ रक्कम तरी सुरक्षित राहील.
३. दुर्दैवाने जर तोटा सहन करावा लागला तर तोट्याची रक्कम आपण सहन करू शकू इतकीच असेल. त्या तोट्यामुळे आपल्या आयुष्यावर गंभीर आणि आणि दूरगामी परिणाम होणार नाहीत.
४.आपण गुंतवलेली मूळ रक्कम आणि तिच्या मध्ये झालेली वाढ, आपल्याला गरज पडेल तेव्हा, आपल्याला सहजतेनं परत मिळावी.

फिक्स डिपॉझिट, विविध कंपन्यांचे शेअर्स, पब्लिक प्रॉव्हिडंट फ़ंड (PPF), म्युच्युअल फन्ड्स, घर,जमीन किंवा शेत यासारखी मालमत्ता, कॉर्पोरेट कंपन्यांचे, रिझर्व्ह बँकेचे (RBI) किंवा वेगवेगळ्या सरकारी संस्थांचे बॉण्ड्स, आणि पोस्ट ऑफिसच्या काही योजना ही गुंतवणुकीची प्रमुख आणि विश्वसनीय साधने आहेत . त्याच बरोबर, एखाद्या होतकरू ‘स्टार्टअप ‘ मध्ये गुंतवणूक करून त्या स्टार्टअप मध्ये इक्विटी मिळवणं सुद्धा, आता थोड्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या मध्यम आणि मोठ्या गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय ठरू लागलं आहे. तसंच, ‘क्रिप्टोकरन्सी’ मध्ये गुंतवणूक करण्याकडे सुद्धा लोकांचा कल वाढू लागला आहे.

गुंतवणूक करण्यापूर्वी या सर्व साधनांविषयी आणि एकूणच गुंतवणुकी विषयी सर्वांगिण तपशील समजून घेतल्यास, आपली गुंतवणूक अधिक सुरक्षित आणि जास्त नफा मिळवून देणारी ठरेल .