२०२३-२४ या आर्थिक वर्षाचा (कर निर्धारण वर्ष २०२४-२५) अग्रिम कराचा तिसरा हफ्ता भरण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर, २०२३ ही आहे.

अग्रिम कर कोणी भरावयाचा आहे?

ज्या करदात्यांचे अंदाजित करदायित्व १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल अशांना अग्रिम कराच्या तरतुदी लागू होतात. ज्या करदात्याच्या उत्पन्नातून उद्गम कर (टीडीएस) कापला जातो अशा करदात्यांना अग्रिम कराच्या तरतुदीसाठी अंदाजित करदायित्व गणताना उत्पन्नावरील उद्गम कर वजा केल्यानंतर देय कर १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर अग्रिम कर भरावा लागतो.

हेही वाचा – पुणे लोकसभा पोटनिवडणूक घ्या, मुंबई उच्च न्यायालयाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला आदेश

अग्रिम कराचा तिसरा हफ्ता कोणाला भरावयाचा नाही?

(१) निवासी ज्येष्ठ नागरिक, ज्यांच्या उत्पन्नात धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश नाही, अशांना अग्रिम कराच्या तरतुदी लागू होत नाहीत. (२) करदाता अनुमानित कराच्या योजनेचा लाभ घेणार असेल, म्हणजेच कलम ४४ एडी किंवा ४४ एडीएनुसार अनुमानित कर भरण्यासाठी पात्र असेल आणि या कलमाअंतर्गत कर भरत असेल तर अशा करदात्यांना १००% देय कर १५ मार्च, २०२४ पूर्वी भरावा लागेल.

अग्रिम कर कसा गणावा आणि किती भरावा?

करदात्याने २०२३-२४ या आर्थिक वर्षात अंदाजित उत्पन्नाचा आढावा घेऊन, त्या उत्पन्नातून प्राप्तिकर कायद्याप्रमाणे मिळणाऱ्या वजावटी (गृहकर्ज, कलम ८० क, वगैरे) विचारात घेऊन बाकी उत्पन्नावर एकूण किती कर भरावा लागेल याची गणना करावी किंवा करदाता नवीन करप्रणालीनुसार (वजावट आणि सवलती न घेता सवलतीच्या दरात कर) कर भरणार असेल तर त्यानुसार देय कर गणावा. या रकमेतून उद्गम कर आणि टीसीएस वजा करावा आणि बाकी कर हा अग्रिम कराच्या रुपाने भरावा. अग्रिम कराचा पहिला हफ्ता या एकूण अंदाजित कराच्या (उद्गम कर वजा जाता) १५% इतका १५ जून पूर्वी आणि ४५% इतका १५ सप्टेंबर पूर्वी भरला असेलच. आता या तिसऱ्या हफ्त्यात अंदाजित कराच्या एकूण ७५% इतका कर भरला गेला पाहिजे आणि हा हफ्ता १५ डिसेंबरपूर्वी भरावा लागेल. करदात्याला नियमित उत्पन्नाव्यतिरिक्त काही उत्पन्न अग्रिम कराचा हा हफ्ता भरल्यानंतर मिळाले असेल, (उदा. भांडवली नफा, करपात्र भेट, वगैरे) तर असे उत्पन्न अग्रिम कराचा पुढील हफ्ता भरताना विचारात घ्यावे.

अग्रिम कर कसा भरावा?

अग्रिम कर ऑनलाईन किंवा बँकेत चलन देऊन भरता येतो, या साठी २८० क्रमांकाचे चलन वापरून अग्रिम कर भरता येतो.

हेही वाचा – तलाठी, मंडल अधिकाऱ्यांच्या कामावर स्वत:च ठेवा वॉच

अग्रिम कर न भरल्यास, कमी किंवा उशिरा भरल्यास?

अग्रिम कर न भरल्यास, कमी भरल्यास किंवा मुदतीनंतर भरल्यास व्याज भरावे लागते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अग्रिम कर जास्त भरल्यास?

अग्रिम कर जास्त भरल्यास विवरणपत्र भरून कर परताव्याचा (रिफंड) दावा करता येतो.