वर्ष १९९५ मध्ये, कॅडिला समूहाची पुनर्रचना करण्यात आली आणि झायडस समूहाच्या नेतृत्वाखाली कॅडिला हेल्थकेअरची स्थापना झाली. गेल्या तीस वर्षांत या समूहाने लक्षणीय प्रगती साधली असून आर्थिक वर्ष २०२५ मध्ये १४,२५३ कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल नोंदवली. भारतीय औषध उद्योगात समूह चौथ्या क्रमांकावर असून या समूहाची ३८ उत्पादन केंद्रे आणि ७ संशोधन सुविधा भारतातील गुजरात, महाराष्ट्र, गोवा, हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम या पाच राज्यांमध्ये तसेच परदेशात म्यानमार, श्रीलंका, फिलिपिन्स आणि अमेरिका व ब्राझीलमध्ये पसरलेल्या आहेत. ती तिच्या वार्षिक उत्पन्नाच्या अंदाजे ७ ते ८ टक्के संशोधन आणि विकासात गुंतवते.
झायडसचा जागतिक व्यवसाय अमेरिका, युरोपच्या (फ्रान्स आणि स्पेन) नियंत्रित बाजारपेठांमध्ये, लॅटिन अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेच्या उच्च प्रोफाइल बाजारपेठांमध्ये मजबूत उपस्थिती आहे. जगभरातील इतर २५ उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये देखील कंपनीच्या उत्पादंनांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे. कंपनीमध्ये सध्या २७,००० कर्मचारी कार्यरत आहेत.
व्यवसाय विभाग
१) यूएस फॉर्म्युलेशन: कंपनी अमेरिकी बाजारामध्ये दोनशेहून अधिक जेनेरिक उत्पादने वितरित करते. अमेरिकेतील पाचवी सर्वात मोठी जेनेरिक कंपनी म्हणून, तिने आर्थिक वर्ष २०२३ ते आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत ६७ नवीन उत्पादने सादर केली, ज्यात इंडोमेथेसिन सपोसिटरी आणि झितुविमेट यांचा समावेश आहे. कंपनीच्या एकूण उलाढालींपैकी सुमारे ४९ टक्के उलाढाल अमेरिकेतील आहे.
२) देशांतर्गत व्यवसाय विभाजन:
अ) फॉर्म्युलेशन कंपनी कार्डिओलॉजी, अँटी-डायबेटिस, रेस्पिरेटरी, गायनेकॉलॉजी, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल, डर्मेटोलॉजी आणि ऑन्कोलॉजी आणि नेफ्रोलॉजी या सुपर स्पेशालिटी क्षेत्रांसह उपचारात्मक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणारे ब्रँडेड फॉर्म्युलेशन उत्पादित करते. तिच्या प्रमुख पोर्टफोलिओमध्ये विवित्रा, एक्झेम्प्तिया, अटोर्वा, फोरग्लिन, लिपग्लिन, उजविरा इत्यादींचा समावेश आहे. कंपनीच्या नाममुद्रा भारतीय औषध बाजारपेठेतील आघाडीच्या ३०० नाममुद्रांमध्ये आहेत.
ब) ग्राहक कल्याण : कंपनी दोन वेगवेगळ्या विभागांमध्ये कार्यरत आहे, म्हणजेच वैयक्तिक निगा विभाग ज्यामध्ये नायसिल आणि एव्हरीथ आणि अन्न आणि पोषण विभाग ग्लुकॉन-डी, शुगर फ्री, कॉम्प्लान आणि न्यूट्रालाईट याद्वारे समाविष्ट आहेत. या सहापैकी पाच नाममुद्रा त्यांच्या संबंधित श्रेणींमध्ये आघाडीचे स्थान राखतात.
३) आंतरराष्ट्रीय बाजारपेठ: कंपनीच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठ विभागात उदयोन्मुख बाजारपेठा (आशिया पॅसिफिक, मध्य पूर्व, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकामधील निवडक प्रदेश) आणि युरोप (फ्रान्स, स्पेन आणि यूके) यांचा समावेश आहे. ती उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये कार्डिओलॉजी, डायबेटोलॉजी, न्यूरो-सायकियाट्री आणि वेदना व्यवस्थापनासह ब्रँडेड जेनेरिक्स विभागात कार्यरत आहे. श्रीलंकेत झायडसचा बाजार हिस्सा ७.५ टक्के आहे. तसेच झायडस दक्षिण आफ्रिकेतील दुसरी सर्वात मोठी कंपनी असून सहभागी बाजारपेठेत फिलीपिन्समध्ये नववी सर्वात मोठी कंपनी आहे.
४) एपीआय: कंपनी विविध उपचारात्मक क्षेत्रांमध्ये २५०हून अधिक एपीआय आणि इंटरमीडिएट्स पुरवते. कंपनीचा एपीआय आणि इंटरमीडिएट्सच्या उत्पादनासाठी ताकेडा फार्मास्युटिकल्स कंपनीसोबत ५०:५० चा संयुक्त उपक्रम आहे. गेल्याच वर्षांत कंपनीने महाराष्ट्रातील अंबरनाथ येथे वॉटसन फार्माची एपीआय मॅन्युफॅक्चरिंग सुविधा विकत घेतली आहे.
५) व्यवसाय भागीदारी : ऑन्कोलॉजी इंजेक्टेबल उत्पादने तयार करणाऱ्या हॉस्पिरा इंक., अमेरिकेसोबत ५०:५० चा करार उत्पादन संयुक्त उपक्रम आहे.
कंपनीचे मार्च २०२५ साठी संपलेल्या आर्थिक वर्षात १९ टक्के वाढीने २३,२४१ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ४,७३८ कोटी रुपयांचा नक्त नफा कमवला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तो २३ टक्क्यांनी वधारला आहे. कंपनीचे जून २०२५ अखेर सरलेल्या तिमाहीचे निकाल लवकरच जाहीर होतील. मात्र कंपनीला यंदा आणि आगामी काळात अमेरिकी व्यवसायात दुहेरी अंकी वाढ अपेक्षित आहे. येत्या दोन वर्षांत कंपनी उत्तम कामगिरीचे प्रदर्शन घडवेल, अशी अपेक्षा आहे. सध्याच्या दरात अत्यल्प कर्ज असलेली आणि अनुभवी प्रवर्तक असलेली झायडस समूहाची ही कंपनी एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून योग्य वाटते.
शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
झायडस लाइफ सायन्सेस लिमिटेड (बीएसई कोड ५३२३२१)
प्रवर्तक: झायडस समूह
वेबसाइट: www.zyduscadila.com
बाजारभाव: रु. ९७४/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: बल्क ड्रग्स/ फार्मा
भरणा झालेले भाग भांडवल: रु. १००.८२ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ७५.००
परदेशी गुंतवणूकदार ७.३१
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार १०.९५
इतर/ जनता ६.७४
पुस्तकी मूल्य: रु. २३८
दर्शनी मूल्य: रु.१/-
लाभांश: ११००%
प्रति समभाग उत्पन्न: रु. ४५
किंमत उत्पन्न गुणोत्तर: २१.२
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३३.५
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.१३
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ३८.६
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (आरओसीई): २४.४
बीटा : ०.७
बाजार भांडवल: रु. ९८,४७५ कोटी (लार्ज कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १३२४/७९५
गुंतवणूक कालावधी: ३६ महिने
अजय वाळिंबे
stocksandwealth@gmail.com
• हा लेख एक अभ्यासपूर्ण विवेचन असून गुंतवणूक सल्ला नव्हे
• प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही.
• लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.