India’s Big Oil Lobby Benefited From Russian Crude Oil Purchase: व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी सोमवारी प्रकाशित झालेल्या द फायनान्शियल टाईम्ससाठी लिहिलेल्या एका लेखात भारताबाबत काही स्फोटक दावे केले आहेत. नवारो यांनी असा दावा केला आहे की, फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वी , भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीत रशियन तेलाचा वाटा १% पेक्षा कमी होता. पण, रशियाच्या युक्रेनवरील आक्रमनानंतर भारत दिवसाला १.५ दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त रशियन तेलाची आयात करत आहे, जी भारताच्या एकूण तेल खरेदीच्या ३०% पेक्षा जास्त आहे.

भारतातील मोठ्या तेल लॉबीचा नफा

पीटर नवारो यांनी लेखात दावा केला आहे की, “या वाढत्या आयातीमागे भारतातील देशांतर्गत वापर नसून, याला खऱ्या अर्थाने चालना देणारी गोष्ट म्हणजे भारतातील मोठ्या तेल लॉबीचा नफा आहे.” त्यांनी असा दावा केला आहे की, हे रिफायनर्स रशियन कच्चे तेल मोठ्या सवलतीत खरेदी करतात, त्यावर प्रक्रिया करतात आणि नंतर युरोप, आफ्रिका आणि आशियामध्ये निर्यात करतात.

त्यांनी पुढे म्हटले की, भारत आता रशियन तेलासाठी एक प्रमुख शुद्धीकरण केंद्र बनला आहे. तसेच निर्बंध टाळण्यासाठी भारत तटस्थतेचा दावा करत आहे. या व्यापाराचे प्रमाण खूप मोठे आहे, कारण भारत दररोज १० लाख बॅरलपेक्षा जास्त शुद्धीकरण केलेले तेल निर्यात करतो.

रशियन तेलासाठी जागतिक क्लिअरिंगहाऊस

“भारत रशियन तेलासाठी जागतिक क्लिअरिंगहाऊस म्हणून काम करत आहे. या व्यवसायातून मिळणारा नफा शक्तिशाली भारतीय ऊर्जा कंपन्यांना जातो आणि टीकाकारांच्या म्हणण्यानुसार, रशियाच्या युद्धाला निधी देण्यास देखील मदत करतो”, असा दावाही नवारो यांनी त्यांच्या लेखात केला आहे.

भारताचे रशियन तेलावरील अवलंबित्व “संधीसाधू”

ते पुढे म्हणतात की, भारताचे रशियन तेलावरील अवलंबित्व “संधीसाधू” आहे आणि पुतिन यांच्या “युद्ध अर्थव्यवस्थेला” थांबवण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना कमकुवत करते. नवारो म्हणतात की, भारत रशियन तेलासाठी “जागतिक क्लिअरिंगहाऊस” सारखे काम करतो, बंदी घातलेल्या कच्च्या तेलाचे मौल्यवान निर्यातीत रूपांतर करतो आणि रशियाला आवश्यक असलेले पैसे देतो.

भारतावर अतिरिक्त टॅरिफ का लादले?

नवारो यांनी लेखाच्या शेवटी स्पष्ट केले आहे की, भारतावर लादलेल्या दुप्पट टॅरिफ हेतू, रशियाला कच्च्या तेलाच्या खरेदीच्या माध्यमातून होणारा आर्थिक पाठिंबा कमी करणे हा आहे. जर भारताला अमेरिकेचा “सामरिक भागीदार” म्हणून पाहिले जायचे असेल तर त्यांनी आपले वर्तन बदलले पाहिजे, असे ते म्हणाले.