Rapido Fined 10 Lakh: केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने राईड-हेलिंग कंपनी रॅपिडोला खात्रीशीर सेवा आणि कॅशबॅक लाभांचे आश्वासन देणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती चालवल्याबद्दल १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या जाहिरातींमुळे प्रभावित झालेल्या ग्राहकांना पैसे परत देण्याचे निर्देशही यावेळी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने कंपनीला दिले आहेत.
“गॅरंटीड ऑटो” आणि “५ मिनिटांत ऑटो न आल्यास ५० रुपये मिळवा” यासारख्या रॅपिडोच्या जाहिरातींनी हमी सेवांचा आभास निर्माण करून ग्राहकांची दिशाभूल केल्याच्या तक्रारींनंतर हा दंड आकारण्यात आला आहे.
ज्या ग्राहकांपाशी ५ मिनिटांत ऑटो आली नाही, त्यांना ५० रुपयांची भरपाई रोख स्वरूपात देण्याऐवजी ती “रॅपिडो कॉइन्स”च्या माध्यमातून देण्यात आली, जी फक्त सायकल राईडसाठी वापरली जाऊ शकत होती आणि फक्त सात दिवसांसाठी वैध होती.
या जाहिराती केवळ दिशाभूल करणाऱ्याच नव्हत्या तर दीर्घकाळ चालवल्या गेल्या, ज्यामुळे त्यांचा प्रभाव वाढला, असे प्राधिकरणाने म्हटले आहे. आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, या जाहिराती १२० हून अधिक शहरांमध्ये अनेक भाषांमध्ये ५४८ दिवस किंवा सुमारे दीड वर्ष प्रसारित केल्या गेल्या.
जून २०२४ ते जुलै २०२५ दरम्यान रॅपिडोला १,२०० हून अधिक ग्राहकांच्या तक्रारी आल्या. यापैकी जवळजवळ निम्म्या तक्रारींचे निराकरण झाले नाही. तक्रारींमध्ये जास्त शुल्क आकारणे, परताव्यास विलंब, ड्रायव्हरचे गैरवर्तन आणि कंपनीचे कॅशबॅकची आश्वासने पूर्ण करण्यात अपयश यासारख्या प्रकरणांचा समावेश होता.
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने आपल्या आदेशात असे निरीक्षण नोंदवले की, रॅपिडोने ग्राहकांना थेट प्रभावित करणाऱ्या महत्त्वाच्या अटी लपवल्या होत्या.
आर्थिक दंडासोबतच, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून रॅपिडोला दिशाभूल करणाऱ्या जाहिराती ताबडतोब मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीला सर्व प्रभावित ग्राहकांना वचन दिलेले ५० रुपये पूर्णपणे परत करण्याचे आणि १५ दिवसांच्या आत अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
भारतातील वाढत्या डिजिटल सेवा बाजारपेठेत दिशाभूल करणाऱ्या जाहिरात पद्धतींवर देखरेख कडक करण्यासाठी सीसीपीएने उचललेल्या पावलांपैकी हा एक आदेश आहे.