Salesforce Layoffs: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आयटी क्षेत्रातील अनेक नोकऱ्या धोक्यात आल्याचे वारंवार सांगितले जाते. भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसनेही काही दिवसांपूर्वी १२ हजार कर्मचारी कमी केले जाणार असल्याचे म्हटले होते. आता अमेरिकेतील सॉफ्टवेअर क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या सेल्सफोर्सनेही ४५ टक्के कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे सीईओ मार्क बेनिओफ यांनी सांगितले की, कंपनीच्या सपोर्ट विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या ९,००० वरून ५,००० इतकी करण्यात आली आहे.
ग्राहक सेवेशी संबंधित अनेक कामे आता एआय एजंटद्वारे केली जात आहेत. “आमच्या सपोर्ट विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत आहोत”, असे मार्क बेनिओफ यांनी शुक्रवारी लोगन बार्टलेट या पॉडकास्टमध्ये सांगितले होते, असे वृत्त बिजनेस इनसाइडरने दिले आहे. आमच्या कर्मचाऱ्यांची संख्या आता नऊ हजारांवरून पाच हजार करण्यात आली आहे. कारण आता आम्हाला कमी लोक हवे आहेत.
ग्राहकांना सेवा देण्यासाठी सेल्सफोर्सने आता एआय एजंट्स तैनात केले आहेत, त्यामुळे ही नोकर कपात करण्यात आली आहे. कंपनीच्या एकूण कामापैकी ५० टक्के काम एआय एजंट करत आहेत. उर्वरित काम मानवी कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. बेनिओफ यांनी एआय तंत्रज्ञानाबाबत बोलताना सांगितले की, मागचे आठ महिने माझ्या आयुष्यातील रोमांचकारी दविस होते.
स्वतःच्याच विधानापासून घुमजाव
बेनिऑफ यांनी जुलै महिन्यात केलेल्या एका विधानाच्या विपरित जाऊन कर्चमारी कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यांनी तेव्हा म्हटले होते की, एआय मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण करणार नाही. फॉर्च्यूनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, एआयमुळे उलट नोकऱ्या वाढणार आहेत. मानव कुठेही जाणार नाही. एआयमुळे होणारी संभाव्य नोकर कपातीला तेव्हा त्यांनी खोटे ठरवले होते.
कोणत्या नोकऱ्यांवर अधिक परिणाम?
कस्टमर सपोर्ट या कामाच्या पलीकडे जाऊन आता सेल्स ऑपरेशन्समध्येही एआय एजंटचा वापर केला जात आहे. बेनिऑफ यांनी म्हटले की, पुरेशी कर्मचाऱ्यांची संख्या नसल्यामुळे मागच्या २६ वर्षांत सेल्सफोर्सकडे १०० दशलक्षाहून अधिक अनकॉल्ड सेल्स लीड्सचा संग्रह झाला.
“मागच्या २६ वर्षांत पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे आम्ही १०० दशलक्ष सेल्स कॉल्सना पुन्हा उत्तर देऊ शकलो नाहीत. पण आता आम्ही एआय सेल्स एजंट नेमले असून आमच्याशी संपर्क साधणाऱ्या प्रत्येकाशी पुन्हा संपर्क साधला जात आहे. तसेच कंपनी “ऑम्निचॅनेल सुपरवायझर” ही सिस्टिम वापरत आहे, ज्यामुळे मानवी आणि एआय एजंट्स यांच्यात सहकार्य आणि समन्वय साधला जात आहे.
जानेवारी २०२५ पर्यंत सेल्सफोर्सच्या सर्व विभागांमध्ये ७६,४५३ कर्मचारी होते. त्यापैकी आता सपोर्ट विभागातून ४००० कर्मचारी काढले आहेत. एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ही ५ टक्के इतकी कपात आहे.