SIP Investment Increased In India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादल्याने शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून किरकोळ घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. जुलैमध्ये मुंबई शेअर बाजारावर मंदीचे सावट होते, पण म्युच्युअल फंडांमध्ये मात्र चांगलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील उत्साह कमी असतानाही गुंतवणूकदारांनी या महिन्यात इक्विटी-केंद्रित म्युच्युअल फंडांमध्ये विक्रमी ४२,७०२ कोटी रुपये गुंतवले आहेत.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये असेट अंडर मॅनेजमेंट १.३% वाढून ७५.३६ लाख कोटी रुपये झाले आहे. अमेरिकन डॉलर आणि परदेशी निधी भारतीय शेअर बाजारातून सातत्याने बाहेर पडत असूनही ही वाढ झाली आहे.

सरासरी असेट अंडर मॅनेजमेंट ७७ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर म्युच्युअल फंड फोलिओची संख्या २४.५७ कोटी झाली आहे.

किरकोळ गुंतवणूकदार खरे हिरो

शेअर बाजारात किरकोळ गुंतवणूकदार हे महिन्याचे खरे हिरो असल्याचे दिसून येते. जूनमध्ये इक्विटी, हायब्रिड आणि सोल्युशन-ओरिएंटेड फंडांमधील फोलिओ १९.०७ कोटींवरून १९.४१ कोटींवर पोहोचले आहेत. याचबरोबर सिस्टिमॅटिक प्लॅनमधून २८,४६४ कोटी रुपये गुंतवणुकीत आल्याने एसआयपीमध्ये तेजी आली आहे. तसेच विक्रमी ६८.६९ लाख नवीन एसआयपी खात्यांची नोंदणी झाल्याने योगदान देणाऱ्या खात्यांची एकूण संख्या ९.११ कोटी झाली आहे.

दरम्यान भारतीय शेअर बाजारातील एसआयपी असेट आता १५.१९ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.

शिस्तबद्ध गुंतवणुकीचे प्रतीक

“मजबूत अमेरिकन डॉलर आणि सातत्याने परदेशी निधी बाहेर जाण्याचा दबावा असूनही असेट अंडर मॅनेजमेंटखालील एकूण मालमत्ता १.३% ने वाढली. हे गुंतवणूकदारांच्या सततच्या विश्वासाचे आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीचे प्रतीक आहे”, असे एएमएफआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकट एन चालासानी म्हणाले. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.

“अस्थिरतेतही शिस्तबद्ध गुंतवणुकीचा स्पष्ट पुरावा म्हणून विक्रमी एसआयपी योगदानाचे कौतुक आहे”, असे ते पुढे म्हणाले.

म्हणून म्युच्युअल फंडांमध्ये विक्रमी प्रवाह

मोतीलाल ओसवाल एएमसीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य व्यवसाय अधिकारी अखिल चतुर्वेदी यांनी लार्ज कॅप, फ्लेक्सी कॅप, स्मॉल कॅप, थीमॅटिक आणि लार्ज आणि मिडकॅप श्रेणींमध्ये २५% पेक्षा जास्त वाढ झाल्याने, म्युच्युअल फंडातील ही वाढ “उल्लेखनीय” असल्याचे म्हटले आहे, असे इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

“भारतीय किरकोळ गुंतवणूकदार प्रौढ झाले आहेत. सातत्यपूर्ण सकारात्मक संदेश आणि भारतीय बाजारपेठेवरील दीर्घकालीन विश्वासामुळे म्युच्युअल फंडांमध्ये विक्रमी प्रवाह आला आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टी डळमळीत पण…

जुलैमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी डळमळीत होत असतानाही, एसआयपी गुंतवणूकदारांच्या संयमामुळे आणि घसरण म्हणजे संधी असते या वाढत्या विश्वासामुळे म्युच्युअल फंडांना हा पल्ला गाठता आला आहे.