Stock Market Updates – BSE, NSE & Nifty : आठवड्यातील कामकाजाच्या (व्यवसाय) शेवटच्या दिवशी भारतीय भांडवली बाजार गडगडला आहे. सकाळपासूनच अनेक कंपन्यांचे समभाग घसरू लागले. ११ वाजेपर्यंत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची ६५० अंकांनी घसरण झाली आहे. गुरुवारी देखील सेन्सेक्स ३४५.८० अंकांनी घसरला होता. दुपारी बाजार ८३,१९० अंकांवर बंद झाला होता. तर, एनएसई निफ्टीची १२०.८५ अंकांनी घसरण होऊन २५,३५५ अंकांवर बंद झाला होता.

दरम्यान, सेन्सेक्स शुक्रवारी सकाळी ११.०५ वाजता ६६५.४९ अंकांनी म्हणजेच ०.७९ टक्क्याने घसरून ८२.५३६ अंकांवर थांबला. सेन्सेक्स सध्या ८२,५०० अंकांच्या आसपास व्यवहार करत आहे. तर, निफ्टीची १८९.७१ (०.७५ टक्के) अंकांची घसरण पाहायला मिळाली. निफ्टी सध्या २५,१६५ अंकांवर व्यवसाय करत आहे.

मोठ्या कंपन्यांची घसरण

भारतीय शेअर बाजारातील प्रमुख कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा, टेक महिंद्रा, एचसीएल टेक आणि बजाज फिनसर्व या कंपन्यांचे शेअर्स गडगडले आहेत. तर, हिंदुस्तान युनिलीव्हर, अ‍ॅक्सिस बँक, एनटीपीसी आणि एशियन पेंट्स या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना लाभ मिळाला आहे.

कशी आहे आशियाई बाजारांची स्थिती?

दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई निर्देशांक, शांघायचा एसएसई कम्पोझिट निर्देशांक आणि हाँगकाँगच्या हँगसेंगमध्ये मात्र वाढ झाली आहे. तसेच अमेरिकेच्या शेअर बाजारातही सकारात्मकता दिसतेय. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ०.३५ डॉलर्सने वाढून ६८.८८ डॉलर्सवर गेल्या आहेत. त्याचा भारतीय बाजारावर परिणाम दिसत आहे. दरम्यान, परदेशी संस्थांत्मक गुंतवणूकदारांनी गुरुवारी २२१.०६ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीसीएसची घसरण होण्याचं कारण काय?

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने जून तिमाहीमधील त्यांच्या व्यवसायाची माहिती जाहीर केल्यानंतर या कंपनीचे समभाग दोन टक्क्यांनी घसरले आहेत. देशातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी टीसीएसने गुरुवारी जाहीर केलं की त्यांनी जूनच्या तिमाहीत १२,७६० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. यामध्ये सहा टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. कंपनीचा महसूल १.३ टक्क्यांनी वाढून ६३,४३७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यामध्ये Non-operating income चं प्रमाण अधिक आहे. तर, थेट महसूल जैसे थे स्थितीत आहे.